आत्मीयता
आत्मन् या संस्कृत शब्दाचा एक अर्थ 'आपण' (स्वत:) असा आहे. आत्मीय या विशेषणाचे अर्थ स्वत:चे, स्वत:संबंधीचे, स्वकीय असे आहेत. 'आत्मीय' वरून आत्मीयता हे भाववाचक नाम बनले आहे. एखाद्या गोष्टीविषयी आत्मीयता असणे म्हणजे तीविषयी जवळीक, आपुलकी, जिव्हाळा असणे. आत्मीयता या शब्दातील जोडाक्षरावर दुसरी वेलांटी आहे, हे ध्यानात घ्यावे. (आत्मियता असे लिहिणे चुकीचे.)
आद्याक्षर
आद्याक्षर म्हणजे शब्दातील सुरवातीचे अक्षर . 'आद्य + अक्षर' अशी या शब्दाची फोड आहे. आद्य म्हणजे सुरवातीचे. लेखनात काही शब्द संपूर्ण वापरण्याऎवजी त्यांची आद्याक्षरे वापरली जातात. (उदाहरणार्थ - श्रीयुतऎवजी श्री, प्राध्यापकऎवजी प्रा., तारीख ऎवजी ता. इत्यादी.) आद्याक्षर हा शब्द अद्याक्षर असा लिहिण्याची चूक होऊ शकते. तसे झाल्यास अर्थही चुकीचा होतो. (अद्य याचा अर्थ आज असा आहे.)
आस्था
आपलेपणा, जिव्हाळा, कळकळ या अर्थांनी आस्था हा शब्द वापरला जातो. आसक्ती, प्रेम, काळजी, आशा हेदेखील त्याचे अर्थ आहेत. हा शब्द अस्था असा लिहिला जाण्याची चूक होऊ शकते. ती टाळण्यासाठी या शब्दाचे पहिले अक्षर लक्षात ठेवावे. आस्थेवाईक म्हणजे आस्था बाळगणारा, कळकळ असणारा, उत्कंठित, उत्सुक, अनास्था हा शब्द आस्था या शब्दाच्या उलट अर्थाचा आहे
स्वीकार
आपल्याला दिलेली वस्तू स्वीकारणे, या क्रियेला स्वीकार म्हणतात. अंगीकार, संमती हेदेखील या शब्दाचे अर्थ आहेत. जे स्वीकारले गेले, त्याला स्वीकृत म्हणतात. स्वीकारणे म्हणजे स्वीकार करणे. या शब्दांतील वेलांटीबाबत संभ्रम निर्माण होऊ शकतो. 'स्विकार' असा चुकीचा उच्चार अनेक जण करतात व लिहितानाही ती चूक होऊ शकते. स्वीकार, स्वीकृत, स्वीकारणे या सर्व शब्दांत 'स्व'वर दुसरी वेलांटी आहे, हे ध्यानात घ्यावे.
आबालवृद्ध
आबालवृद्ध म्हणजे बालांपासून वृद्धांपर्यंत; म्हणजेच सर्व वयांची माणसे. हा शब्द अबालवृद्ध असा लिहिण्याची चूक होऊ शकते. मग त्यात अपेक्षित अर्थ राहत नाही. (अबाल हे संस्कृतमधील एक विशेषण आहे. त्याचा अर्थ तरूण; पूर्ण वाढलेला, असा आहे.) आबालवृद्ध हा शब्द चुकीचा लिहिला जाऊ नये, यासाठी 'आ ' हा उपसर्ग लक्षात ठेवावा. त्याचे जे विविध अर्थ आहेत, त्यांतील पासून आणि पर्यंत येथे अभिप्रेत आहेत. आपादमस्तक (पायापासून डोक्यापर्यंत), आमूलाग्र (मुळापासून टोकापर्यंत, म्हणजे संपूर्णपणे) हेही शब्द असेच तयार झाले आहेत.
आमिष
आमिष या संस्कृत शब्दांचा अर्थ लालू च. 'आमिष दाखविणे' म्हणजे एखाद्याला वश करून घेण्यासाठी, तो मोहात पडेल असे काही देण्याची तयारी दाखविणे. या शब्दात चुकून 'आऐवजी'अ लिहिला जाण्याची, तसेच 'मि'ऐवजी 'मी' लिहिले जाण्याची शक्यता असते. 'आमिष'चा अर्थ मांस असाही आहे. सामिष (मांसासह) व निरामिष (मांसविरहित) हे शब्द त्यावरूनच तयार झाले. ते हिंदीत रूढ आहेत.
आरूढ
आरूढ या शब्दाचा अर्थ वर बसलेला; चढू न गेलेला. सिंहासनारूढ म्हणजे सिंहासनावर बसलेला. आधिकारारूढ म्हणजे अधिकारपदावर असलेला. आरोहण म्हणजे वर जाण्याची, चढू न जाण्याची क्रिया. यावरूनच गिर्यारोहण (गिरि आरोहण) हा शब्द बनला आहे. आरूढ या शब्दात रला दुसरा उकार आहे, हे ध्यानात ठेवावे. (आरुढ असे लिहिणे चूक.) अरूढ असे लिहिणेही चूक. ही चूक टाळावी.
अनावृत
आवरण नसलेले, उघडे, जाहीर, प्रकट या अर्थांनी हे विशेषण वापरले जाते. वृ या संस्कृत धातूपासून हा शब्द बनला आहे. वृ चा अर्थ आच्छादणे असा आहे. आवृत म्हणजे आच्छादलेले; आवरण घातलेले. 'आवृत'च्या उलट अर्थाचा शब्द अनावृत. पण 'अनावृत्त' म्हणजे मात्र आवृत्ती नसलेला; पुन्हा न येणारा. अनावृत या शब्दाशी अनावृत्त या शब्दाचा काहीही संबंध नाही.
आशीर्वाद
आशीर्वाद देणे म्हणजे दुवा देणे, भले व्हावे अशी इच्छा व्यक्त करणे. आशीर्वाद या शब्दात 'श'वर दुसरी वेलांटी असते. अनेकजण 'श'वरती पहिली वेलांटी देऊन 'आशिर्वाद' असे लिहितात. ते चुकीचे आहे हे लक्षात ठेवावे. तसेच या शब्दातील रफार हा 'वा' वर आहे, 'शी' वर नाही. काहीजण चुकून हा शब्द 'आर्शीवाद' असा लिहितात.
कोजागरी
आश्विन महिन्यातील पौर्णिमेला कोजागरी म्हणतात. या शब्दाचे मूळ को जागर्ति? (कोण जागा आहे?) या प्रश्नात आहे. त्या पौर्णिमेच्या रात्री सर्वांना देवी लक्ष्मी हा प्रश्न विचारते, अशी समजूत आहे. जो जागा असतो, त्याला देवी संपत्ती देते, असे म्हणतात. कोजागरी हा शब्द लिहिताना 'ग' ऎवजी गििलहिला जाण्याची (कोजागिरी) चूक होऊ शकते. ती टाळण्यासाठी को जागर्ति? हा प्रश्न लक्षात ठेवावा.
माध्यम चर्चा
पत्रकार मित्रांच्या आपल्या क्षेत्राबद्दलच्या जाणिवा अधिक प्रगल्भ व्हाव्यात या उद्देशाने हा ब्लॉग तयार करण्यात आला आहे. या ब्लॉगवर समाविष्ट करण्यासारखी माहिती आपल्या नजरेस आली, किंवा या ब्लॉगवरील एखाद्या लेखाविषयी प्रतिक्रिया द्यावीशी वाटली तर जरूर कळवा - goa.paresh@gmail.com
Friday, March 16, 2007
Subscribe to:
Post Comments (Atom)
0 comments:
Post a Comment