मराठी पत्रकार

गोव्याच्या दैनिक नवप्रभाचे संपादक श्री. परेश प्रभू यांचा हा अधिकृत ब्लॉग समस्त पत्रकार मित्रांसाठी...

माध्यम चर्चा

पत्रकार मित्रांच्या आपल्या क्षेत्राबद्दलच्या जाणिवा अधिक प्रगल्भ व्हाव्यात या उद्देशाने हा ब्लॉग तयार करण्यात आला आहे. या ब्लॉगवर समाविष्ट करण्यासारखी माहिती आपल्या नजरेस आली, किंवा या ब्लॉगवरील एखाद्या लेखाविषयी प्रतिक्रिया द्यावीशी वाटली तर जरूर कळवा - goa.paresh@gmail.com


Friday, March 16, 2007

ऊर्ध्व
ऊर्ध्व या शब्दाचा अर्थ उंच, वर , वरील. मरणापूर्वी लागलेली घरघर, असाही त्याचा एक अर्थ आहे. ऊर्ध्वपातन हा रसायनशास्त्रातील शब्द तुमच्या परिचयाचा असेल. ऊर्ध्व या शब्दात, तसेच ऊर्ध्वपातन, ऊर्ध्वगती (उंच उडण्याची वा चढून जाण्याची क्रिया), ऊर्ध्व मुख (वर तोंड करून पाहणारा) अशा सामासिक शब्दांत ऊ दीर्घ आहे, हे ध्यानात ठेवावे. चुकून तो र्‍हस्व लिहिला जातो ते टाळावे.

ऊर्मी
ऊर्मिया संस्कृत शब्दाचे अनेक अर्थ आहेत, हा शब्द प्रामुख्याने लाट, उसळी, इच्छा, उत्कंठा या अर्थांनी मराठीत वापरला जातो. मराठीत अंत्याक्षर दीर्घ लिहायचे, म्हणून हा शब्द 'ऊर्मी' असा लिहायचा. मात्र यातील पहिले अक्षरदेखील दीर्घ आहे, ही लक्षात ठेवायची गोष्ट. हा शब्द चुकून 'उर्मी' असा लिहिला जाण्याची दाट शक्यता असते. ऊर्मिला या नावातदेखील पहिले अक्षर दीर्घच आहे.

श्लेष
एका शब्दातून अनेकार्थ निघणे किंवा समान उच्चार असलेले यास श्लेष अलंकार म्हणतात. द्व्यर्थी शब्द योजून सांधला जाणारा हा अलंकार आहे. या शब्दात पहिले अक्षर शहामृगातला 'श' व दुसरे अक्षर षट्कोनातला 'ष' वापरावे.

एकाहत्तर
एकाहत्तर ही संख्या आपल्या परिचयाची आहे; परंतु ती अक्षरी लिहिताना मात्र चूक होण्याची शक्यता असते. या चुकीचे मूळ चुकीच्या उच्चारणात आहे. अनेक जण ही संख्या एक्काहत्तर अशी उच्चारतात. त्यामुळे लिहितानाही ते तीच चूक करतात. या शब्दात क ला क जोडलेला नसून कि एकदाच आहे, हे लक्षात घ्यावे. 'एकाहात्तर' असेही लिहिले जाण्याची शक्यता असते; तीही चूक टाळावी.

राष्ट्रीयीकरण, राष्ट्रीकरण
एखादी गोष्ट राष्ट्राच्या मालकीची, या अर्थी राष्ट्रीय होणे, या क्रियेला राष्ट्रीयीकरण म्हणतात. (उदाहरणार्थ - सुमारे तीस वर्षांपूर्वी खासगी क्षेत्रातील काही प्रमुख बॅंकांचे राष्ट्रीयीकरण झाले.) राष्ट्रीयीकरण या शब्दातील जोडाक्षरावर, तसेच तिसर्या अक्षरावर दीर्घ वेलांटी आहे, हेदेखील ध्यानात ठेवावे; म्हणजे राष्ट्रीयकरण, राष्ट्रीयिकरण असे लिहिण्याच्या चुका होणार नाहीत. दुसरा, तसाच वाटणारा शब्द आहे राष्ट्रीकरण. राष्ट्र + ई + करण अशी या शब्दाची फोड आहे. या शब्दातील ई हा प्रत्यय दीर्घ आहे. म्हणून तो शब्द दीर्घ बनतो. तो लक्षात घ्यावा. राष्ट्रीकरण म्हणजे राष्ट्र बनवणे. राष्ट्रीयीकरण व राष्ट्रीकरण हे दोन वेगवेगळे शब्द आहेत. दोन्हीही बरोबर आहेत. पण त्यांची एकमेकांशी गल्लत मात्र सहज होऊ शकते हे ध्यानात घ्यावे व त्या चुका टाळाव्यात.

आविष्कार
एखादी गोष्ट व्यक्त करणे, प्रकट करणे, यात जी क्रिया अभिप्रेत असते, तिला आविष्कार म्हणतात. (उदा. गायनाविष्कार, नाट्याविष्कार.) आविष्कार या शब्दातील पहिले अक्षर 'अ' नसून 'आ' आहे, हे लक्षात घ्यावे. 'आविस्' आणि 'कृ' या शब्दांपासून हा शब्द बनला आहे. 'आविस्' चाअर्थ प्रकट वा उघड. कृ या धातूचा अर्थ करणे. आविष्करण याही शब्दाचा अर्थ 'आविष्कार' प्रमाणेच आहे.

निषेधार्ह
एखादी घटना अथवा कृत्य निषेधार्ह आहे, असे म्हटले जाते; त्यातील निषेधार्ह या शब्दाचा अर्थ निषेध करण्याजोगे असा असतो. निषेध + अर्ह अशी या शब्दाची फोड आहे. अर्ह या शब्दाचे अनेक अर्थ आहेत. लायक हा त्यांतील एक अर्थ आहे. निषेधार्ह व निषेधार्थ या शब्दांची गल्लत होऊ देऊ नये. निषेधार्थ म्हणजे निषेधाकरिता. निषेध+अर्थ अशी त्याची फोड आहे.

दृष्टिकोन
एखाद्या गोष्टीबाबतचे धोरण,मनोवृत्ती,रोख या अर्थांनी दृष्टिकोन हा शब्द वापरला जातो. मूळचा दृष्टि हा शब्द मराठीत दृष्टी असा लिहिला जात असला, तरी दृष्टिकोन या शब्दात मात्र ष्टवर पहिली वेलांटी आहे. अमुक गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टीकोन, असे बरेच जण लिहितात; पण त्यात पुनरुक्ती होते. (पाहणे हा भाग दृष्टीमध्ये येतोच.) अमुक गोष्टीविषयीचा दृष्टिकोन अशी रचना करावी.

प्रातिनिधिक
एखाद्या व्यक्तीतर्फे, संस्थेतर्फे वा देशातर्फे काही कामासाठी दूत म्हणून पाठविलेल्या जाणार्‍या व्यक्तीला प्रतिनिधी म्हणतात. 'प्रतिनिधि हा संस्कृत शब्द. मराठी शुद्धलेखनाच्या नियमानुसार अंत्याक्षर दीर्घ होऊन तो 'प्रतिनिधी' असा लिहिला जातो. प्रतिनिधि स्वरूपात सादर होते, ते प्रातिनिधिक. विशिष्ट चित्र, कविता, पुस्तक हे त्या-त्या कलावंताचे प्रातिनिधिक असू शकते. प्रातिनिधिक या शब्दातील मधल्या तिन्ही अक्षरांवरील वेलांट्या र्‍हस्व (पहिल्या) आहेत, हे लक्षात घ्यावे.

निर्भर्त्सना
एखाद्याची निर्भर्त्सना (निर् + भर्त्सना) करणे, म्हणजे त्याची अतिशय निंदा करणे वा त्याला खूप रागावणे. भर्त्सना या शब्दाचा अर्थ निंदा वा धिक्कार. निर् या शब्दाचे अनेक अर्थ असून त्यांत 'निषेध' हादेखील एक अर्थ आहे. निर्भर्त्सना या शब्दात 'भ'वर आणि 'त्स'वरही रफार आहे, हे लक्षात घ्यावे; म्हणजे 'निर्भत्सना' असा तो चुकीचा लिहिला जाणार नाही.

कंदील
कंदील हा शब्द सर्वांच्या परिचयाचा आहे. हा मूळचा अरबी शब्द. मूळचा तो स्त्रीलिंगी आहे पण मराठीत पुिंल्लगी आहे. यात दवर दुसरी वेलांटी; पण चुकून ती पहिली दिली जाण्याची शक्यता (कंदिल) असते. त्याचे सामान्यरूप होताना मात्र पहिली वेलांटी द्यायची, हे लक्षात ठेवावे. कंदिलावर, कंदिलाची, कंदिलात ही याची काही उदाहरणे. (कंदीलात, कंदीलाचे असे लिहिणे चूक.)

भीष्मप्रतिज्ञा
कधीही न मोडणारा निश्चय, अचाट प्रतिज्ञा या अर्थांनी भीष्मप्रतिज्ञा हा शब्द वापरला जातो. महाभारतातील भीष्मांनी केलेल्या प्रतिज्ञेवरून तो रूढ झाला आहे. भीष्म या शब्दात 'भ'वर दुसरी वेलांटी आहे आणि त्यापासून तयार होणार्‍या शब्दांतही ती बदलत नाही. (भीष्म या शब्दाच्या सामान्यरूपांतही 'भ'वर दुसरी वेलांटीं असते. उदा.- भीष्माने, भीष्मांना.) भीष्मप्रतिज्ञा हा शब्द 'भिष्मप्रतिज्ञा' असा लिहिणे चुकीचे आहे.

कर्कश
कर्कश या शब्दांचे अनेक अर्थ आहेत; पण 'कर्णकटू हा त्याचा अर्थ अधिक रूढ आहे. हा शब्द 'कर्कश्श' वा 'कर्कश्य' असा उच्चारण्याची चूक अनेकांकडून होते. यातील शेवटचे अक्षर 'श' आहे; त्याला कोणतेही अक्षर जोडलेले नाही; हे ध्यानात घ्यावे. क्रू र, कठोर, वाईट स्वभावाचा, हे देखील 'कर्कश'चे अर्थ आहेत. 'कर्कशा'चा अर्थ भांडकुदळ स्त्री, त्राटिका असा आहे.

कर्तृत्व
कर्तृत्व या संस्कृत विशेषणाचा अर्थ 'करणारा'. त्यापासून कर्तृत्व हे भाववाचक नाम तयार झाले आहे. कर्तेपणा, सामर्थ्य, कार्य करण्याची क्षमता या अर्थांनी कर्तृत्व हा शब्द वापरला जातो. यातील दुसरे अक्षर नीट लक्षात ठेवा. हा शब्द 'कतुर्त्व' असा लिहिलेला कदाचित आढळेल; पण तो अपभ्रंश आहे. 'कर्तृत्व'मध्ये शेवटचे अक्षर 'त्त्व' नसून 'त्व' आहे, हेही ध्यानात घ्या.

प्रीतिसंगम
कऱ्हाडला कृष्णा-कोयनेचा संगम आहे; त्याला प्रीतिसंगम म्हणतात. प्रीती म्हणजे प्रेम. संस्कृत शब्द प्रीति असा आहे. मराठीत तो प्रीती असा लिहिला जातो; मात्र सामासिक शब्दांत प्रीती शब्द प्रथम असल्यास तवर पहिली वेलांटी असते. प्रीतिसंगम हे याचे उदाहरण. या शब्दांत प्रवर दुसरी वेलांटी असते, हेही ध्यानात ठेवावे. (प्रितिसंगम प्रीतीसंगम, प्रितीसंगम असे लिहिणे चूक.)

षड्रिपू
काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, हे जे सहा मनोविकार आहेत, त्यांना संस्कृतमध्ये षड्रिपू म्हणतात. मराठीतही हा शब्द वापरतात. षट् + रिपू असा हा तृतीय व्यंजन संधी आहे. त्यामुळे ट् चा ड होतो व षड्रिपू असा शब्द तयार होतो. या शब्दात षट्कोनातले ष अक्षर लक्षात ठेवावे. शब्दाचा अर्थ लक्षात घेतला की हे सोपे होईल. षट् म्हणजे सहा व रिपू म्हणजे शत्रू.

क्षुद्र
किरकोळ, हलका, लहान या अर्थी क्षुद्र हे विशेषण वापरले जाते. क्षुद्र या नामाचा अर्थ वैगुण्य असा आहे. मराठीत हे नाम रूढ नाही. क्षुद्र या शब्दात 'क्षला पहिला उकार आहे. तो दुसरा लिहिला जाण्याची चूक ('क्षूद्र) होऊ शकते; ती टाळावी. क्षुद्रदृष्टी या शब्दाचा अर्थ कोते मन वा अनुदार वृत्ती. क्षुद्रचंपक(नागचाफा), क्षुद्रचंदन(रक्तचंदन) आदी शब्द 'क्षुद्र'पासून तयार झाले आहेत.


किल्मिष
किल्मिष हा शब्द काळेबेरे, पाप, शका या अर्थांनी , मनाच्या बाबतीत वापरला जातो.(मनात काळेबेरे असणे.)मळ हादेखील या शब्दाचा अर्थ आहे. या शब्दाच्या लेखनात दोन प्रकारांच्या चुका होण्याची शक्यता असते. जोडाक्षरावरील वेलांटी चुकून दीर्घ दिली जाते वाष ऎवजी चुकून श लिहिला जातो. ष षट्कोनातला; तसेच दोन्ही वेलांट्या पहिल्या, हे या बाबतीत लक्षात ठेवावे.

कीटक
कीटक म्हणजे किडा. कीटकमध्ये कवर दुसरी वेलांटी आहे हे ध्यानात ठेवावे. चुकून पहिली वेलांटी दिली जाण्याची शक्यता असते. सामान्यरूप होतानाही ही वेलांटी बदलत नाही. किटकाला, किटकावर, किटकाचे असे लिहिण्याच्या चुका अनेकांकडून होतात. कीटकाला, कीटकावर, कीटकाचे असे लिहावे. कीटक या शब्दापासून होणार्या सामासिक शब्दातही की हे अक्षर दीर्घच राहते.(उदाहरणार्थ - कीटकदंश, कीटकनाशक).
कुतूहल
कुतूहल म्हणजे उत्सुकता, जिज्ञासा, एखाद्या गोष्टीविषयी कुतूहल वाटणे म्हणजे ती जाणून घेण्याची, तिची माहिती मिळविण्याची इच्छा उत्पन्न होणे. आश्चर्य असाही कुतूहल या शब्दाचा एक अर्थ आहे. कुतूहलमध्ये तला दुसरा उकार असतो व सामान्यरुपातही त्यात बदल होत नाही. (उदाहरणार्थ - कुतूहलाने). या शब्दातील तू हे अक्षर अनेक जण चुकून र्‍हस्व उच्चारतात व लिहितानाही तशी चूक होऊ शकते.

कुसुम
कुसुम म्हणजे फूल. हे विशेषनाम म्हणूनही वापरतात. हा शब्द संस्कृत (तत्सम) आहे. तत्सम शब्दांतील अकारान्तापूर्वीचे इकार व उकार र्‍हस्वच राहतात. या नियमानुसार हा शब्द कुसूम असा लिहू नये. क व स ला पहिला उकारच द्यावा.

कूर्म
कूर्म म्हणजे कासव. भगवान विष्णूंच्या दशावतारापैकी हा दुसरा अवतार. या शब्दात कल दुसरा उकार आहे, हे ध्यानात ठेवावे. (कुर्म असे लिहिणे चूक.) सामान्यरूपातही हा उकार बदलत नाही. (उदाहरणार्थ कूर्माला, कूर्माचे). कासवाचा चालण्याचा वेग फार मंद असतो; म्हणून मंदगतीला कूर्मगती म्हणतात. सामासिक शब्दांतही कूर्ममधील कू दीर्घच राहतो. (उदाहरणार्थ कूर्मावतार, कूर्मगती.)

कॢप्ती
कॢप्ती (मूळ संस्कृत शब्द कॢप्ति) या शब्दांचे, युक्ती, रचना सिद्धी, समृद्धी असे विविध अर्थ असले, तरी हा शब्द मराठीत प्रामुख्याने युक्ती वा शक्कल याच अर्थी वापरला जातो. कॢप्त या संस्कृत विशेषणाचे अर्थ केलेले, रचलेले, ठरविलेले इत्यादी आहेत. कॢप्ती हा शब्द 'क्लुप्ती' असा लिहिण्याची चूक होऊ शकते; ती टाळावी. ऌ हा वर्णमालेतील एक स्वर आहे; उकार नव्हे.

कोट्यधीश
कोट्यधीश या शब्दाची फोड कोटि+ अधीश अशी आहे. कोटिहा संस्कृत शब्द मराठीत कोटी असा लिहिला जातो. त्याचा एक अर्थ शंभर लाख असा आहे. अधीश म्हणजे धनी, मालक. ज्याच्याकडे एक कोटी रुपये वा त्याहून अधिक मालमत्ता आहे, तो कोट्यधीश. हा शब्द कोट्याधीश असा लिहिण्याची चूक होऊ शकते; ती टाळावी. कोट्यवधी (अनेक कोटी) याही शब्दातील जोडाक्षर ट्य आहे; ट्या नव्हे.

क्रांतिकारक
क्रांती (मूळ संस्कृत शब्द क्रांति) या शब्दापासून क्रांतिकारक हा शब्द तयार झाला आहे. क्रांती या शब्दाचे उलथापालथ, सर्वगामी बदल हे अर्थ आहेत. भ्रमण, प्रगती असेही त्याचे अर्थ आहेत. क्रांतिकारक म्हणजे क्रांती करणारा. या शब्दात तवर पहिली वेलांटी आहे, हे लक्षात घ्यावे. (क्रांतीकारक असे लिहिणे चूक.) क्रांतिवृत्त, क्रांतिवीर अशा शब्दांतही तवर पहिली वेलांटी आहे.

क्रीडा
क्रीडा म्हणजे खेळ. 'क्रीड्' या संस्कृत धातूचा अर्थ खेळणे; त्यापासून हा शब्द बनला. क्रीडा, क्रीडांगण हे शब्द नेहमी वापरले जातात. त्यांतील पहिले अक्षर अनेकजण चुकून र्‍हस्व (क्रिडा) लिहितात. 'क्र'वर दुसरी वेलांटी, हे लक्षात ठेवावे. सामान्यरूप होतानाही ती बदलत नाही. (उदा.- क्रीडेला, क्रीडेच्या) क्रीडक या संस्कृत शब्दाचा अर्थ खेळाडू. खेळात तरबेज असणार्‍याला क्रीडापटू म्हणतात.

विश्वसनीय
खात्रीलायक, प्रामाणिक, विश्वासू या अर्थांनी विश्वसनीय हे विशेषण वापरले जाते. विश्वास या शब्दावरून हा शब्द बनला आहे. भरवसा, मनाचा अनुकूल ग्रह, खात्री, निश्चय हे विश्वासचे अर्थ आहेत. विश्वासणे म्हणजे भरवसा धरणे, विश्वास ठेवणे, अवलंबून राहणे. विश्वसनीय या शब्दात नवर दुसरी वेलांटी असते. हा शब्द विश्वासनीय असा लिहिण्याची चूक होणार नाही, याचीही काळजी घ्यावी.

विश्वसनीय
खात्रीलायक, विश्वास ठेवण्यासारखा, पतदार या अर्थांनी विश्वसनीय हे विशेषण वापरले जाते. हा शब्द विश्वास या शब्दाशी संबंधित आहे. विश्वास म्हणजे भरवसा. विश्वसनीय हा शब्द 'विश्वासनीय' असा लिहिला जाण्याची शक्यता असते; ती चूक टाळावी. या शब्दात नवर दुसरी वेलांटी आहे, हेदेखील लक्षात ठेवावे. (विश्वसनिय असे लिहिणे चूक.) विश्वसनीयता या शब्दाचा अर्थ विश्वासार्हता.

विषाद
खेद, दु:ख, निराशा या अर्थांनी विषाद हा शब्द वापरला जातो. उत्साहभंग, ग्लानी हेदेखील त्याचे अन्य अर्थ आहेत. या शब्दातील 'ष षट्कोनातला आहे हे लक्षात घ्यावे. हा शब्द 'विशाद असा लिहिण्याची चूक होण्याची शक्यता असते. विशद या शब्दाचा 'विषाद'शी काहीही संबंध नाही, हेदेखील ध्यानात घ्यावे. विशदचा अर्थ स्वच्छ, स्पष्ट असा आहे. एखादी गोष्ट विशद करणे म्हणजे तिचे स्पष्टीकरण करणे.

गरिबी
गरिबी हा शब्द गरीब या मूळच्या अरबी शब्दावरून तयार झाला आहे. दरिद्री, शांत, निरुपद्रवी या अर्थांनी गरीब हा शब्द मराठीत वापरला जातो. 'गरीब'मध्ये 'रवर दुसरी वेलांटी असली, तरी 'गरिबी'मध्ये 'र'वर पहिली वेलांटी आहे, हे विसरू नये. (हिंदी भाषेत हा शब्द 'गरीबी' असा लिहिला जातो.) दारिद्र्य, सात्त्विक वृत्ती, नम्रता हे गरिबी या शब्दाचे अर्थ आहेत.

गिरिजा
गिरिजा म्हणजे पार्वती. गिरि+ जा अशी या शब्दाची फोड आहे. गिरिम्हणजे पर्वत. (पार्वती ही हिमालयाची कन्या). जा म्हणजे जन्मलेली. गिरिहा संस्कृत शब्द मराठीत गिरी असा लिहायचा; पण त्याचा समास होताना त्यात रिर्‍हस्वच असतो. गिरीजा असे लिहिणे चुकीचे आहे. गिरिजन गिरिकंदर आदी सामासिक शब्दांमध्येही रवर पहिली वेलांटी आहे, हे ध्यानात ठेवावे.

गिरीश
गिरीश (गिरि+ ईश) म्हणजे शंकर. गिरिव ईश हे दोन्ही संस्कृत शब्द आहेत. गिरि म्हणजे पर्वत; ईश म्हणजे परमेश्वर. संधी होऊन 'गिरीश'मध्ये 'री' दीर्घ होते. या शब्दात 'श' शहामृगातला आहे हे ध्यानात घ्यावे. हा शब्द चुकून 'गिरीष' असा लिहिला जाण्याची शक्यता असते. ('ईष हादेखील संस्कृतमधील एक शब्द आहे; पण त्याचा अर्थ 'आश्विन' महिना असा आहे.)

गुंजारव
गुंजारव या शब्दाचा अर्थ आहे भ्रमराचा गुणगुण नाद. हा संस्कृत शब्द मराठीतही वापरला जातो. रव म्हणजे स्वर, नाद, आवाज. भ्रमराच्या गुणगुणण्याला गुंजारव असे म्हंटले जाते. हा शब्द लिहिताना गला पहिला उकार व अनुस्वारच द्यावा. गुन्जारव असे लिहू नये.

गृहस्थ
गृहस्थ या शब्दाचा अर्थ गृहस्थाश्रमी, प्रापंचिक. हा शब्द व्यक्ती या अर्थानेही वापरला जातो. गृह + स्थ अशी त्याची फोड आहे. गृह म्हणजे घर. स्थ म्हणजे राहणारा. गृहस्थ हा शब्द चुकून ग्रहस्थ असा लिहिला जाण्याची शक्यता असते; तथापिगृऎवजी ग्र लिहिल्यास अर्थ बदलतो. (ग्रहस्थचा अर्थ ग्रहावर राहणारा असा होईल.) त्यामुळे या अक्षराविषयी काळजी घ्यावी.

गृहीत
गृहीत या विशेषणाच्या अर्थांमध्ये मनात धरलेले, घेतलेले, समजलेले, आदींचा समावेश आहे. 'गृहीत'मध्ये 'ह'वर दुसरी वेलांटी आहे, हे लक्षात ठेवावे. ('गृहित' असे लिहिणे चूक.) 'ग्रह्' या संस्कृत धातूपासून हे विशेषण तयात झाले आहे. 'ग्रह् च्या अर्थांमध्ये घेणे, जाणणे, मानणे आदींचा समावेश आहे.

मिष्टान्न
गोडधोड पदार्थ या अर्थी मिष्टान्न हा शब्द वापरला जातो. रुचकर अन्न असाही त्याचा एक अर्थ आहे. मिष्ट + अन्न ही मिष्टान्न या शब्दाची फोड आहे. गोड,चवदार, लज्जतदार हे मिष्ट या शब्दाचे अर्थ आहेत. मिष्टान्न या शब्दात ट ऐवजी ठ वापरला जाण्याची चूक होऊ शकते; ती टाळावी. त्यासाठी मिष्ट हा शब्द लक्षात ठेवावा.

गौरीनंदन
गौरीनंदन हे गणपतीचे एक नाव आहे. गौरी म्हणजे पार्वती. नंदन म्हणजे पुत्र, म्हणजेच मुलगा. गणपती हा पार्वतीचा मुलगा, म्हणून गौरीनंदन. हे नाव चुकून गौरिनंदन असे लिहिले जाण्याची शक्यता असते; तसे लिहिणे चुकीचे आहे. कवितेचा छंद बिघडू नये, म्हणून तेथे तसे लिहिले गेले, तरीही मुळात रवर दुसरी वेलांटी आहे, हे लक्षात ठेवावे. याचप्रमाणे गौरीपूजन या शब्दात री दीर्घच आहे.

घनश्याम
घनश्याम (घन+श्याम) हा शब्द कृष्णाचे वा रामाचे वर्णन करताना वापरला जातो. घनचे अनेक अर्थ आहेत; त्यांतील 'ढग' येथे गृहीत आहे. 'श्याम'चेही अनेक अर्थ आहेत. काळा वा निळा या अर्थी तो 'घनश्याम'मध्ये वापरला जातो. हा शब्द चुकून 'घन:श्याम' असा लिहिला जातो. वास्तविक त्यात विसर्ग नाही. 'श्याम'मध्ये 'श'ला 'य' जोडायचा, हेही लक्षात घ्यावे. 'शाम' असे लिहिणे चुकीचे आहे.

सच्छील
चांगले वागणार्या, सुस्वभावी व्यक्तीचे वर्णन करताना सच्छील हा शब्द वापरला जातो. सत् +शील अशी याची फोड आहे. संधीच्या नियमानुसार त् या व्यंजनापुढे श् हे व्यंजन आले, तर त् चा च् , तसेच श् चा छ् होतो. ही फोड लक्षात ठेवलीत, तर हा शब्द लिहिताना चूक होणार नाही. सच्छिष्य (सत् + शिष्य) हा शब्दही अशाच रीतीने तयार झाला आहे.

प्रतीक
चिन्ह, खूण, प्रतिमा या अर्थांनी प्रतीक हा शब्द वापरला जातो. उदाहरण, सारखेपणा दाखविण्यासाठी उल्लेखिलेली गोष्ट, असेही त्याचे अर्थ आहेत. या शब्दात तवर दुसरी वेलांटी आहे. ती चुकून पहिली दिली जाण्याची शक्यता असते. या शब्दाचे सामान्यरूप होतानाही त वरील वेलांटी बदलत नाही. (उदाहरणार्थ - प्रतीकाचे, प्रतीकाला.) प्रतीकात्मक या शब्दातही ती दीर्घच आहे, हे ध्यानात ठेवावे.

गुढीपाडवा
चैत्र शुद्ध प्रतिपदेचा दिवस म्हणजे गुढीपाडवा. हिंदू वर्षारंभाचा दिवस. गुढी म्हणजे आनंदाप्रीत्यर्थ उभारलेले निशाण. हा शब्द लिहिताना ड व ढ या अक्षरांचा गोंधळ होतो. मूळ शब्द गुढी लक्षात ठेवून गुढीपाडवा असे लिहावे.

जागरूकता
जागरूकता हे भाववाचक नाम आहे. ते जागरूक या विशेषणापासून बनले आहे. जागरूक हा तत्सम (संस्कृतमधून आलेला) शब्द आहे. तो जागृ या धातूपासून बनला आहे. जागणे, जागे (सावध) असणे, हे या धातूचे अर्थ आहेत. जागरूक म्हणजे सावध, दक्ष. जागरूकता म्हणजे सावधानता. जागरूक व जागरूकता या दोन्ही शब्दांत रला दुसरा उकार आहे, हे ध्यानात ठेवावे. (जागरुकता असे लिहिणे चूक.)

जीवित
जीवित म्हणजे अस्तित्व, आयुष्य, प्राण. जीवित हे विशेषण म्हणून वापरले, तर मात्र त्याचा अर्थ 'जिवंत झालेला' वा 'जिवंत केलेला' असा होतो. या शब्दात 'व'वर पहिली वेलांटी आहे, हे लक्षात घ्यावे. जीवितेश हा शब्द जीवित शब्दावरुन तयार झालेला आहे. जीवितेश म्हणजे जिवलग. जीवित्व याही शब्दाचा अर्थ प्राण, आयुष्य आहे.

दुढ्ढाचार्य
जो विद्वान नाही; पण विद्वान असल्याची प्रौढी मारतो, त्याच्यावर टीका करताना दुढ्ढाचार्य हा शब्द वापरला जातो. 'दोड्ड' हा कन्नड शब्द व आचार्य हा संस्कृत शब्द यापासून हा शब्द तयार झाला आहे. दोड्ड या शब्दाचा अर्थ मोठा, प्रतिष्ठित. दुढ्ढाचार्य हा शब्द चांगल्या अर्थी वापरला जात नाही. 'डुढ्ढाचार्य' व 'ढुड्डाचार्य' हे या शब्दाचे अपभ्रंश आहेत.

विभक्ती तत्पुरुष
ज्या तत्पुरुष समासात कोणत्या तरी विभक्तीचा किंवा शब्दयोगी अव्ययाचा लोप करून दोन्ही पदे जोडली जातात , त्यास विभक्ती तत्पुरुष म्हणतात. उदा. गावदेवी, घरजावई, राजपुत्र, वनभोजन, भिक्तवश इ. या शब्दांचा विग्रह करताना हे शब्द विभक्ती प्रत्ययाने जोडलेले कळतात. या शब्दांचा वाक्यात उपयोग करतानाही ते जसेच्यातसे वापरावेत.

तत्पुरुष समास
ज्या समासातील दुसरे पद महत्त्वाचे असते व अर्थाच्या दृष्टीने गाळलेला शब्द किंवा विभक्ती प्रत्यय विग्रह करताना घालावा लागतो, त्याला तत्पुरुष समास म्हणतात. उदा. तोंडपाठ, कंबरपट्टा, महादेव, बटाटेपोहे इ. हे शब्ददेखील जोडूनच लिहावेत.

दृढमूल
ज्याचा पाया पक्का आहे, त्याला दृढमूल म्हणतात. दृढ या शब्दाच्या अर्थांमध्ये पक्का, कठीण,समर्थ आदींचा समावेश आहे. संस्कृतमधील मूल या शब्दाचे अर्थ मूळ, पाया असे आहेत. दृढमूल या शब्दातील पहिले व तिसरे अक्षर नीट ध्यानात ठेवावे. दृढमूल ऐवजी द्रु ढमूल लिहिले जाणार नाही ना, याची काळजी घ्यावी. मला दुसरा उकार आहे, हेही लक्षात ठेवावे. (दृढमुल असे लिहिणे चूक.)

अल्पसंख्याक
ज्यांची संख्या अल्प आहे, म्हणजेच तुलनेने कमी आहे, ते अल्पसंख्याक. हा शब्द अनेकांकडून चुकून अल्पसंख्यांक असा लिहिला जातो. अल्पसंख्याक या शब्दाची फोड अल्प +संख्या +क अशी आहे. या शब्दात फक्त सवर अनुस्वार आहे, हे लक्षात घ्यावे. (अल्प +संख्या + अंक अशी फोड नाही). बहुसंख्याक हा शब्द अल्पसंख्याकच्या विरुद्ध अर्थी आहे. ज्यांची संख्या तुलनेने अधिक , ते बहुसंख्याक.

ज्योत्स्ना
ज्योत्स्ना या शब्दाच्या अर्थामध्ये चांदणे, चांदणी रात्र, उजेड आदींचा समावेश आहे. ते एक विशेषनामही आहे. अनेक जण ज्योस्ना अशा चुकीच्या रीतीने हा शब्द लिहितात. यातील दोन्ही जोडाक्षरे नीट लक्षात ठेवावीत. विशेषत: दुसर्या जोडक्षरात प्रथम त् नंतर स् आणि नंतरच ना आहे, हे लक्षात ठेवावे. ज्योत्स्नाप्रिय असाही एक संस्कृत शब्द असून त्याचा अर्थ चकोर असा आहे.

टिपूर
टिपूरचा अर्थ पांढरेशुभ्र, प्रकाशमान, तेजस्वी, चकचकीत असा आहे. पौर्णिमेच्या चांदण्याचे वर्णन करताना टिपूरचांदणे हा शब्दप्रयोग वापरला जातो. नगार्‍यावर टिपर्‍या मारून खेळण्याच्या प्रकाराला टिपूरखेळे म्हटले जाते. टिपूर हा शब्द लिहिताना चुकून टीपुर (ट ला दुसरी वेलांटी व पला पहिला उकार) असा लिहिला जाण्याची शक्यता असते. या शब्दात टला पहिली वेलांटी व पला दुसरा उकार आहे, हे लक्षात ठेवावे.

टीका
टीका म्हणजे विवरण, स्पष्टीकरण, भाष्य , गुणदोषविवरण. दोषदर्शन असाही या शब्दाचा अर्थ रूढ आहे. टीकामध्ये ट वर दुसरी वेलांटी आहे. सामान्यरूपांतही ती दुसरीच राहते. (उदाहरणार्थ - टीकेत) ती पहिली देण्याची चूक अनेकांकडून होते. वेलांटी बदलली, की या शब्दाचा अर्थ बदलतो. टिका म्हणजे टिळा. टिक्याचा धनी असा एक वाक्प्रचार आहे. त्याचा अर्थ नामधारी मालक असा होतो.

तत्काळ
तत्काळ म्हणजे ताबडतोब. संस्कृतमधील तत्कालम् या शब्दापासून तत्काळ हा शब्द बनला आहे. तत् + कालम् अशी तत्कालम् ची फोड आहे. तत्काळ हा शब्द अनेक जण चुकून तात्काळ असा लिहितात. या शब्दातील पहिले अक्षर ता नसून त आहे, हे लक्षात राहण्यासाठी तत् हा संस्कृत शब्द लक्षात ठेवावा. तत्क्षणी याही शब्दाचा अर्थ ताबडतोब असाच आहे.

तपश्चर्या
तपस् आणि चर्या या दोन शब्दांपासून तपश्चर्या हा सामासिक शब्द झाला आहे. तपस् म्हणजे तप. त्याचे विविध अर्थ आहेत. ध्यान, मनन अशा स्वरूपाची केलेली कष्टयुक्त साधना, असा अर्थ सर्वसाधारणपणे रूढ आहे. तप म्हणजे १२ वर्षांचा काळ, असाही एक अर्थ आहे. चर्या म्हणजे आचरण, वर्तणूक. तपश्चर्या या शब्दात विसर्ग नाही, हे लक्षात घ्यावे. तप:श्चर्या असे लिहिणे चुकीचे आहे.

तब्येत
तब्येत हा शब्द आपण अनेकदा ऎकतो. या शब्दाचे मूळ अरबी भाषेतील तबीअत या शब्दात आहे. तबीअतच्या अर्थांमध्ये प्रकृती, स्वभाव, आरोग्य, सवय, रुची, मन आदींचा समावेश आहे. तब्येत हा शब्द प्रमुख्याने प्रकृती, आरोग्य या अर्थी वापरला जातो. तो चुकून तब्बेत असा लिहिला जाण्याची शक्यता असते. ही चूक टाळण्यासाठी तब्येतमधील जोडाक्षर नीट लक्षात ठेवावे.

द्रविड
तमीळ, मल्याळी, कन्नड व तेलगू या भाषांना द्राविडी भाषा व त्या भाषकांना द्रविड म्हणतात.द्रविड हे एक आडनावही आहे. या शब्दात ववर पहिली वेलांटी आहे, हे ध्यानात घ्यावे. (द्रवीड असे लिहिणे चूक.) द्राविडी या शब्दाचा अर्थ द्रविडांविषयी; द्रविडांचे. एखादी गोष्ट सोप्या रीतीने न करता कष्टप्रद मार्गाने करणे, याला द्राविडी प्राणायाम म्हणतात.

तिळतिळ
तिळतिळ म्हणजे थोडाथोडा. हा शब्द लिहिताना तिळ-तिळ असा तोडून लिहू नये. हा शब्द अभ्यस्त आहे. एकाच शब्दाची किंवा अक्षराची पुनरावृत्ती होते तेव्हांत्याला अभ्यस्त शब्द म्हणतात. म्हणून हे शब्द तोडून किंवा डॅश मारून लिहू नयेत. आणखी उदाहरणे - हळूहळू, समोरासमोर, मधूनमधून.

द्वीपकल्प
तीन बाजूंनी पाण्याने वेढलेल्या व एका बाजूने जमिनीशी जोडलेल्या प्रदेशाला 'द्वीपकल्प' म्हणतात. 'द्वीप' म्हणजे बेट. या शब्दात 'द'ला 'व' जोडून दुसरी वेलांटी द्यावी , 'ल'ला 'प' जोडून लिहावा.

छळणूक
त्रास देणे, सतावणे या क्रियेला छळणूक म्हणतात. छळणे या क्रियापदापासून हा शब्द तयार झाला आहे. (संस्कृत नाम छल असे आहे. ते मराठीत येताना लचा ळ झाला.) छळणूक हा शब्द छळवणूक असा लिहिण्याची चूक होऊ शकते; ती टाळावी. क्रियापद छळवणे असे नसून छळणे असे आहे. हे या संदर्भात ध्यानात घ्यावे. छळ करणार्‍या व्यक्तीला छळवादी म्हणतात.

त्र्यंबक
त्र्यंबक हे एक विशेषनाम आहे. त्रि+ अंबक अशी त्याची फोड आहे. त्रिम्हणजे तीन. अंबक या संस्कृत शब्दाचा अर्थ डोळा. त्र्यंबक म्हणजे तीन डोळे असलेला, म्हणजेच भगवान शंकर. त्र्यंबक हा शब्द अनेक जण त्रिंबक असा लिहितात; तथापि त्र्यंबक असेच लिहिणे बिनचूक आहे, हे शब्दाची फोड लक्षात घेतल्यास स्पष्ट होते. (संधीच्या नियमानुसार इ आणि अ या स्वरांपासून य बनतो.)

त्वरित
त्वरित म्हणजे तातडीने, घाईने, लवकर. त्वरा म्हणजे घाई, चपळाई. त्वरावरून त्वरित हा शब्द बनला. त्यात रला पहिली वेलांटी आहे, हे ध्यानात घ्यावे. चुकून ती दुसरी दिली जाण्याची (त्वरित) शक्यता असते. त्वर्य म्हणजे तातडीचे. कामासंबंधीच्या कागदपत्रांवर कधी त्वर्य, अतित्वर्य असे शेरे असतात. अर्जंट , मोस्ट अर्जंट या इंग्रजी शब्दांना पर्यायी शब्द म्हणून ते वापरले जातात.

थालीपीठ
थालीपीठ हा पदार्थ आपल्याला चांगला परिचित असला, तरी हा शब्द लिहिताना मात्र थालिपीठ, थालपीठ, थालीपीट अशा विविध चुका होण्याची शक्यता असते. 'थाली' म्हणजे थाळी, ताट, परात. मूळ संस्कृत शब्द 'स्थाली'. थालीपीठ या शब्दाचे मूळ 'स्थालीपिष्ट' या शब्दात असावे, असे सांगितले जाते. पिष्ट म्हणजे पीठ. 'पिष्ट' हे विशेषण म्हणून वापरले, तर तिंबलेले, मळलेले (पीठ) असा त्याचा अर्थ होतो.

ज्येष्ठ
थोरली व्यक्ती या अर्थी ज्येष्ठ हा शब्द वापरला जातो. ते एका महिन्याचेही नाव आहे. या शब्दाचा उच्चार नेमकेपणाने केला जातोच असे नाही; त्यामुळे 'जेष्ठ' असाच हा शब्द आहे, अशी समजूत होण्याची शक्यता असते. यातूनच तो तसा लिहिण्याची चूक होते. ती टाळण्यासाठी यातील पहिले जोडाक्षर नीट लक्षात ठेवावे. ज्येष्ठा हे एका नक्षत्राचे नाव; त्याही बाबतीत ही काळजी घ्यावी.

ज्येष्ठ
थोरली व्यक्ती या अर्थी ज्येष्ठ हा शब्द वापरला जातो. ते एका महिन्याचेही नाव आहे. या शब्दाचा उच्चार नेमकेपणाने केला जातोच असे नाही; त्यामुळे जेष्ठ असाच हा शब्द आहे, अशी समजूत होण्याची शक्यता असते. यातूनच तो तसा लिहिण्याची चूक होते. ती टाळण्यासाठी यातील पहिले जोडाक्षर नीट लक्षात ठेवावे. ज्येष्ठा हे एका नक्षत्राचे नाव; त्याही बाबतीत ही काळजी घ्यावी.

दत्तात्रेय
दत्तात्रेय हे दैवत आपल्याला परिचित आहे. दत्तात्रेय हे विशेषनामही आहे. हा शब्द अनेक जण दत्तात्रय असा लिहितात. 'दत्त + आत्रेय' अशी दत्तात्रेयची फोड आहे. दत्त हे अत्री (मूळ संस्कृत शब्द अत्रि) ऋषींचे पुत्र. आत्रेय म्हणजे अत्रींचे वंशज. दत्तात्रेय या शब्दात त्र वर मात्रा असणे आवश्यक आहे. ती काढणे हे अर्थाशी सुसंगत होणार नाही.

पौर्णिमा
दर महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पंधराव्या तिथिला पौर्णिमा म्हणतात व त्या रात्री चंद्रबिंब संपूर्ण दिसते, हे आपल्याला माहित आहे. पूर्णिमा याही शब्दाचा अर्थ पौर्णिमा असाच आहे. पूर्णिमा या शब्दात 'प'ला दुसरा उकार आहे, हे ध्यानात घ्यावे. (पुर्णिमा असे लिहिणे चूक.) पौर्णिमा हा शब्द चुकून 'पोर्णिमा' असा उच्चारला जाण्याची शक्यता असते. लिहितानाही ती चूक होऊ शकते; ती टाळावी.

दरवाजा
दरवाजा या शब्दाचे सामान्यरूप करताना बर्‍याच वेळा दरवाज्याला असे केलेले आढळते. यातील नियम लक्षात घ्या. शब्दाच्या शेवटी जा अक्षर असेल, तर त्याचे सामान्यरूप ज्या न करता जा असेच ठेवावे. आणखी उदाहरणे - फौजा, राजा, मोजा इत्यादी. या शब्दांनाही हा नियम लागू होतो.


दीक्षा
दीक्षा हा शब्द तुमच्या वाचनात आला असेल. उपदेश घेणे वा व्रत घेणे, या अर्थी 'दीक्षा घेणे' असा शब्दप्रयोग केला जातो. दीक्षामध्ये 'द'वर दुसरी वेलांटी आहे, हे लक्षात घ्यावे. दीक्षा घेतलेला, तो दीक्षित. ते एक आडनावही आहे. त्यातील पहिले अक्षर दीर्घ व दुसरे र्‍हस्व आहे, हे लक्षात घेतले, की दिक्षित वा दिक्षीत असे लिहिण्याची चूक होणार नाही.

दीपावली
दीपावली म्हणजे दिवाळी. दीप+आवली ही दीपावली या शब्दाची फोड आहे. दीप म्हणजे दिवा. आवली म्हणजे रांग, ओळ. दीपावली हा शब्द दिपावली असा लिहिण्याची चूक अनेकांकडू न होते. ती टाळण्यासाठी दीप हा शब्द लक्षात ठेवावा. दीपमध्ये दवर दुसरी वेलांटी ; त्यामुळे दीपावलीमध्येही दवर दुसरी वेलांटी असते. दीपक या शब्दातही दवर दुसरी वेलांटी असते.

दुरवस्था
दुरवस्था म्हणजे वाईट अवस्था. हा शब्द अनेक जण चुकून दुरावस्था असा लिहितात. दुरवस्थाची फोड दुर् + अवस्था अशी आहे. र् आणि अ यांचा संधी होऊन र बनतो. ही फोड लक्षात घ्यावी. दुर्दशा (दुर् + दशा) हा शब्दही त्याच अर्थाने वापरला जातो. अशाच रीतीने दुरूत्तर (दुर् + उत्तर), दुर्गंध (दुर् + गंध), दुराचरण (दुर् + आचरण) इत्यादी शब्द बनले आहेत.

सदृश
दुष्काळसदृश स्थिती, युद्धसदृश स्थिती असे शब्दप्रयोग आपल्या ऎकण्यात वा वाचनात येतात. सारखेपणा दाखविण्यासाठी सदृश हे विशेषण वापरले जाते. तुल्य, योग्य, अनुरुप असेही या शब्दाचे अर्थ आहेत. हा शब्द सदृश्य असा लिहिण्याची चूक होऊ शकते; ती टाळावी . सादृश्य या भाववाचक नामाचा अर्थ सारखेपणा असा आहे; त्यात मात्र सुरवातीचे अक्षर स नसून सा आहे आणि अखेरीस श्य हे जोडाक्षर आहे.

दूतावास
दूतावास या शब्दाची फोड दूत + आवास अशी आहे. दूत म्हणजे वकील. प्रतिनिधी. निरोप्या असाही त्याचा एक अर्थ आहे.आवास म्हणजे घर, धाम, निवासस्थान. राजदूताच्या कार्यालयाला दूतावास म्हणतात. राजदूत म्हणजे सरकारचा परदेशातील वकील. दूत या शब्दात दला दुसरा उकार आहे व सामासिक शब्दांत , तसेच सामान्यरूप होतानाही तो बदलत नाही. दुतावास,दुतावसात ,दुतावासात, दुताला असे लिहिणे चुकीचे आहे.

दृष्टिक्षेप
दृष्टिक्षेप (दृष्टि+क्षेप) म्हणजे नेत्रकटाक्ष. क्षेप या शब्दाचे अनेक अर्थ आहेत; त्यांत फेकण्याची क्रिया हादेखील एक अर्थ आहे. दृष्टिक्षेप टाकणे म्हणजे नजर टाकणे. दृष्टिक्षेपमध्ये 'ष्ट' या जोडाक्षरावर पहिली वेलांटी आहे, हे ध्यानात ठेवावे. दृष्टि हा संस्कृत शब्द मराठीत दृष्टी असा लिहिला जातो. पण त्यापासून होणार्‍या सामासिक शब्दात ष्टवर पहिली वेलांटी असते. (दृष्टीक्षेप असे लिहिणे चूक.)

देदीप्यमान
देदिप्यमान या विशेषणाचा अर्थ तेजस्वी . अनेकांच्या हातून हा शब्द दैदिप्यमान, दैदीप्यमान,देदिप्यमान अशा चुकीच्या रीतींनी लिहिला जाण्याची शक्यता असते. या चुका टाळण्यासाठी या शब्दाच्या बाबतीत दोन गोष्टी लक्षात ठेवणे जरूरीचे आहे. यातील पहिले अक्षर दै नसून दे आहे आणि दुसरे अक्षर दि नसून दी आहे. (पहिल्या दवर एकच मात्रा आणि दुसऱ्या दवर दुसरी वेलांटी.)

भूपाळी
देवाला जागे करण्यासाठी पहाटे जी गाणी म्हणतात, त्यांना 'भूपाळी' म्हणतात. 'भूप' हा संस्कृत शब्द आहे. मराठीतही तो त्याच अर्थाने वापरतात. 'भूप' हा भारतीय संगीतातला एक राग आहे. या शब्दात 'भ' ला दुसरा उकार द्यावा. 'भुपाळी' असे लिहू नये.

द्वितीया
द्वितीया हे तिथीचे नाव आहे. हे तुम्हाला माहीत आहेच. द्वितीया हा शब्द लिहिताना आपण बरोबरच लिहीत आहोत ना, याची काळजी घ्या. यात त ला दुसरी वेलांटी आहे, हे लक्षात ठेवायचे. त्याचप्रमाणे द्विहे जोडाक्षर लिहिताना द च्या पोटात व काढायचा; व्दिअसे लिहायचे नाही, हेदेखील विसरू नका. द्वितीया या शब्दाचे सामान्यरूप होत नाही; ती दीर्घच राहतो. (उदाहरणार्थ - द्वितीयेला, द्वितीयेपासून.)

सांप्रदायिक
धर्माचा वा तत्त्वज्ञानाचा पंथ या अर्थाने संप्रदाय हा शब्द रूढ आहे. वहिवाट, प्रघात, रीत, प्रमाणभूत तत्त्व हेही त्याचे अर्थ आहेत. सांप्रदायिक म्हणजे संप्रदायाविषयीचे वा संप्रदायातील. सांप्रदायिक या शब्दात पहिले अक्षर संनसून सांआहे, हे ध्यानात ठेवावे. चौथे अक्षर यिआहे. त्याऐवजी 'ई' हे अक्षर लिहिण्याची (सांप्रदाईक) चूक होऊ शकते; ती टाळावी.

धीरोदात्त
धीरोदात्तचा अर्थ आहे उत्तुंग, उदात्त, विनयी, प्रतिज्ञा पालन करणारा, हर्ष-शोक इत्यादींच्या पलीकडे गेलेला. हे संस्कृत विशेषण आहे. धीर हा शब्दच मुळात संस्कृत आहे व तो दीर्घ आहे. म्हणून हा शब्द लिहिताना धला दुसरी वेलांटी व तला त म्हणजे त्त लिहायला विसरू नका.

धूमकेतू
धूमकेतू हा शब्द तुमच्या परिचयाचा असणार. तुम्ही धूमकेतू छायाचित्रात तरी पाहिला असेल. त्याला शेंडेनक्षत्र असेही म्हणतात. धूमकेतु हा संस्कृत शब्द . धूम म्हणजे धूर वा धुके. 'केतु'च्या अनेक अर्थांमध्ये, किरण असाही एक अर्थ आहे. मराठी शुद्धलेखनाच्या नियमानुसार शेवटचे अक्षर दीर्घ होऊन 'धूमकेतू' असा हा शब्द लिहायचा. 'धू' दीर्घच आहे. 'धुमकेतू' असे लिहिणे चुकीचे आहे.

ध्वनिफीत
ध्वनिफीत, ध्वनिचित्रफीत हे शब्द आपल्या वाचनात येतात. ऑडिओ टेप अथवा ऑडिओ कॅसेटला मराठीत ध्वनिफीत म्हणतात. ध्वनिहा संस्कृत शब्द आपण मराठीत ध्वनी असा लिहितो. समास होताना मात्र त्या शब्दात निर्‍हस्व असतो. ध्वनिफीत हा असा सामासिक शब्द आहे. (ध्वनीफीत असे लिहिणे चुकीचे.) या शब्दाच्या सामान्य रूपात फिर्‍हस्व असतो. (उदाहरणार्थ - ध्वनिफितीवर ) अनेकवचनातही (ध्वनिफिती) तसेच होते.

नदीतीर
नदीतीर म्हणजे नदीचा काठ. तीर म्हणजे काठ वा किनारा. (तीर या शब्दाचा दुसरा अर्थ बाण असाही होतो.) हा शब्द चुकून नदितीर असा लिहिला जाण्याची शक्यता असते. सामान्यरूप होताना नदितिरावर , नदीतिरावर अशा चुका होऊ शकतात. नदीतीरी, नदीतीरावर असे व्हायला हवे. नदी आणि तीर हे दोन्ही शब्द मुळात संस्कृतमधील आहेत. त्यांत द वर व त वर दुसरी वेलांटी आहे, हे ध्यानात ठेवावे.

अपूर्वाई
नवलाई, अपूर्वता,असाधारणपणा या अर्थांनी अपूर्वाई हा शब्द वापरला जातो. अपूर्व या शब्दापासून तो बनला आहे. पूर्वी न घडलेले हा अपूर्वचा अर्थ आहे. विलक्षण, असाधारण, अद्भुत हेही त्याचे अन्य अर्थ आहेत. अपूर्वाई या शब्दात पला दुसरा उकार आहे. तो पहिला देण्याची चूक (अपुर्वाई) अनेकांकडू न होते; ती टाळावी. त्यासाठी अपूर्व हा शब्द लक्षात ठेवावा.

नावीन्य
नवीन हा शब्द तुमच्या चांगलाच परिचयाचा आहे. त्यात 'व'ला दुसरी वेलांटी आहे. तो 'नविन' असा लिहिणे चुकीचे आहे. नावीन्य म्हणजे नवेपणा. त्यातही 'वी' दीर्घ आहे. अनेक जण तो 'नाविन्य' असा लिहितात; पण ती चूक आहे. प्रावीण्य (नैपुण्य) असाच शब्द आहे. प्रवीण या शब्दापासून तो तयार झाला आहे. त्यात 'व'वर दुसरी वेलांटी आहे.

नूतनीकरण
नवीन, तरूण, ताजे या अर्थांनी नूतन हे विशेषण वापरले जाते. या शब्दात नला दुसरा उकार आहे, हे ध्यानात घ्यावे. (नुतन असे लिहिणे चूक.) नूतनवरून नूतनीकरण हा शब्द बनला आहे. त्यात पहिल्या अक्षराला दुसरा उकार (नू) आणि तिसर्‍या अक्षरावर दुसरी वेलांटी (नी) आहे. (नुतनीकरण, नूतनिकरण असे लिहिणे चूक.) एखाद्या गोष्टीचे नव्यात रूपांतर करण्याला नूतनीकरण म्हणतात.

पुनरवलोकन
नव्याने विचार करणे, नव्याने आढावा घेणे, या क्रियेसाठी पुनरवलोकन हा शब्द वापरला जातो. पुनर् + अवलोकन अशी याची फोड आहे. र् आणि अ यांचा संधी होऊन र बनतो. पुनरवलोकन हा शब्द पुरावलोकन असा लिहिणे चुकीचे कसे आहे हे यावरून ध्यानात येईल. यात रा नसून र आहे हे लक्षात ठेवावे. पुरागमन (पुनर् + आगमन) या शब्दात मात्र 'रा' आहे. र् आणि आ यांचा त्यात संधी होऊन रा बनतो.

नागरिक
नागरिक हा शब्द नगर या शब्दापासून तयार झाला आहे. नगर म्हणजे शहर. जो शहरात राहणारा, तो नागरिक. सभ्य, चतुर हेदेखील या शब्दाचे अर्थ आहेत. हा शब्द रहिवासी याही अर्थी वापरला जातो. (उदाहरणार्थ - भारतीय नागरिक म्हणजे भारताचा रहिवासी.) नागरिक शब्दात रवर पहिली वेलांटी आहे, हे लक्षात घ्यावे. (नागरीक असे लिहिणे चूक.) सामान्यरूपातही ती बदलत नाही. (उदाहरणार्थ - नागरिकांना.)

नि:स्पृह
नि:स्पृह म्हणजे निरिच्छ, निर्लोभी. नि:स्पृहता हा थोर व्यक्तींचा एक गुण मानला जातो. स्पृह् या संस्कृत धातूचा अर्थ इच्छिणे. निर् वा निस् या उपसर्गाचा अर्थ अभाव. संधी होताना या उपसर्गाच्या अखेरच्या व्यंजनाचा विसर्ग होतो व नि:स्पृह हा शब्द तयार होतो. हा शब्द चुकून 'निस्पृह' असा लिहिला जाण्याची शक्यता असते. ती चूक टाळण्यासाठी यातील विसर्ग नीट लक्षात ठेवावा.

निगडित
निगडित म्हणजे संबधित. हा शब्द संस्कृतमधून आलेला आहे. निगड या संस्कृत शब्दाचा अर्थ साखळी असा आहे. त्यावरुन निगडित हा शब्द बनला. त्याचा मूळ अर्थ बद्ध (बांधलेला). हा शब्द 'निगडीत' असे लिहिणे चुकीचे आहे. 'निगडी' या गावात असे आपल्याला म्हणायचे असेल, तेव्हा मात्र 'निगडीत' लिहीणे योग्य. वेलांटी बदलली,की अर्थ असा बदलतो.

निगडित
निगडित म्हणजे संबंधित. हा शब्द संस्कृतमधून आलेला आहे. निगड या संस्कृत शब्दाचा अर्थ साखळी असा आहे. त्यावरून निगडित हा शब्द बनला. त्याचा मूळ अर्थ 'बद्ध' (बांधलेला) . हा शब्द निगडीत असा लिहिणे चुकीचे आहे. निगडी या गावात असे आपल्याला म्हणायचे असेल, तेव्हांमात्र निगडीत लिहिणे योग्य. वेलांटी बदलली की अर्थ असा बदलतो.

नियमित
नियमित हे विशेषण नियम या शब्दापासून तयार झाले आहे. नियमच्या अर्थांमध्ये कायदा, ठराव, ठराविक रीत, वहिवाट, आचारपरंपरा आदींचा समावेश आहे. नियमानुसार केल्या जाणार्या कृतीचे वर्णन करताना नियमित हे विशेषण वापरले जाते. या शब्दात न आणि म या दोन्हीवर पहिली वेलांटी आहे. नीयमित किंवा नियमीत असे लिहिणे चुकीचे आहे. नियमितपणा या भाववाचक नामातही निव मिर्‍हस्व आहेत.

निरीक्षण
निरीक्षण म्हणजे लक्षपूर्वक अवलोकन. यातील मूळ शब्द ईक्षण. पाहणे हा त्याचा अर्थ. ईक्षा म्हणजे दृष्टी. निरीक्षण मध्ये र वर दुसरी वेलांटी आहे ती चुकून पहिली दिली जाण्याची (निरिक्षण) शक्यता असते. ही चूक होऊ नये, म्हणून ईक्षण शब्द लक्षात ठेवावा. निरीक्षण करणार, तो निरीक्षक . बारकाईने पाहिलेले, तपासलेले, ते निरीक्षित. या शब्दात र वर दुसरी व क्ष वर पहिली वेलांटी , हे ध्यानात घ्यावे.

निरूपण
निरूपण म्हणजे एखाद्या विषयावर केलेले विवेचन; जरुरीनुसार उदाहरणे व आधार देऊन त्या विषयाचे केलेले स्पष्टीकरण. निरूपण या शब्दात रला दुसरा उकार आहे, हे ध्यानात घ्यावे. (निरुपण असे लिहिणे चूक.) निरूपणीय म्हणजे निरूपण करण्यास योग्य. निरूप्य याचाही अर्थ निरूपण करण्याजोगे. निरूपित म्हणजे निरूपण केलेले. निरूपक म्हणजे निरूपण करणारा. या सर्व शब्दांत रला दुसरा उकार आहे.

नीतिवंत
नीती हा संस्कृतमधून आलेला शब्द आहे. मूळ संस्कृत शब्द नीति असा आहे. मराठीत तो आपण नीती असा लिहितो. त्यापासून होणार्‍या सामासिक शब्दांत मात्र तवर पहिली वेलांटी असते, हे ध्यानात घ्यावे. नीती म्हणजे व्यवहारशास्त्र; आचारव्यवहाराचे शिष्टाचार. नीतिवंत म्हणजे सदाचारी, सत्प्रवृत्त. नीतिशिक्षण म्हणजे नीतीचे, सदाचाराचे शिक्षण. मनाला पटणारी गोष्ट प्रतिकूल परिस्थितीतही करण्याचे घाडस म्हणजे नीतिधैर्य.

नीरद
नीर म्हणजे पाणी, द म्हणजे देणारा. पाणी देणारा मेघ म्हणजेच नीरद. नीरज प्रमाणेच नीरद हा शब्द चुकीचा लिहिला जातो. हा शब्द मूळ संस्कृतातच दीर्घ आहे. मराठीतही तो तसाच वापरला जातो. म्हणून नीरज व नीरद दोन्ही शब्दात नी दीर्घच लिहावे.

नीलिमा
नीलिमा या शब्दाचा अर्थ निळा रंग, निळेपणा. हा शब्द पुल्लिंगी आहे; पण स्त्रीलिंगी विशेषनाम म्हणूनही तो रूढ आहे. नील या शब्दापासून तो बनला आहे. नील मध्ये नवर दुसरी वेलांटी आहे;तशीच ती नीलिमामध्येही आहे. (निलिमा असे लिहिणे चूक.) या शब्दात लवर पहिली वेलांटी आहे, हेही ध्यानात ठेवावे. (नीलीमा वा निलीमा असे लिहिणेही चूक.)

नूपुर
नूपुर हा शब्द संस्कृतमधून आलेला आहे. पैजण हा त्याचा अर्थ. 'नूपुर'मध्ये पहिल्या दोन शब्दांच्या बाबतीत र्‍हस्व-दीर्घ यांची गल्लत होण्याची शक्यता असते. 'नुपूर' किंवा 'नुपुर' असा तो लिहिण्याची चुक होते. या शब्दाचे पहिले अक्षर दीर्घ आणि दुसरे अक्षर र्‍हस्व, असे लक्षात ठेवण्याची जरुरी आहे. सामान्यरूपातही त्यात बदल होत नाही. उदा. 'नूपुरांचा नाद'

नैरृत्य
नैरृत्य हे एका दिशेचे नाव. पश्चिम आणि दक्षिण यांच्या दरम्यानची ही दिशा. हा शब्द नैऋत्य असा चुकीचा लिहिला जाण्याची शक्यता असते. ऋ वर रफार आहे, हे विसरायचे नाही. उच्चारताना हे कदाचित अवघड वाटेल; पण लिहिताना अवघड वाटायचे कारण नाही. नैरृत असाही एक संस्कृत शब्द आहे. त्याचा एक अर्थ नैरृत्य दिशेचा स्वामी , तर दुसरा अर्थ राक्षस असा आहे.

पुनर्वसन
नैसर्गिक आपत्तीमुळे वा अन्य कारणाने एखाद्या ठिकाणाहून वसतिस्थान हलवावे लागले, तर ते नव्याने उभारणे, या क्रियेला पुनर्वसन म्हणतात. या शब्दांत रफार ववर दिला जाण्याची चूक (पुर्नवसन) काही जणांकडू न होऊ शकते; ती टाळावी. ज्यांचे पुनर्वसन होते, त्यांना पुनर्वसित म्हणतात. त्या शब्दात सवर पहिली वेलांटी आहे, हेही ध्यानात ठेवावे.

आश्विन
पंचांगातील महिन्यांची नावे तुम्हाला तोंडपाठ असतील. मराठी महिने असाही त्यांचा उल्लेख होतो. त्यांतील भाद्रपदानंतरच्या महिन्याचे नाव तुम्ही कदाचित अश्विन असे लिहीत असाल. वास्तविक त्या शब्दातील पहिले अक्षर अ नसून आ आहे. अश्विनी हे २७ नक्षत्रांतील पहिले नाव; त्यात मात्र आ नसून अ आहे. पहिल्या अक्षराबाबत या दोन शब्दात गल्लत होऊ देऊ नका.

पारंपरिक
परंपरा हा शब्द आपल्या परिचयाचा आहे. एखादी रूढी वा पद्धती एका पिढीकडून पुढच्या पिढ्यांकडे चालत येणे, याला परंपरा म्हणतात. परंपरा केवळ कुटुंबातीलच असते, असे नव्हे. गुरुशिष्यपरंपराही असते. पारंपरिक म्हणजे परंपरेने चालत आलेले; परंपरागत. हा शब्द पारंपारिक असा लिहिण्याची चूक अनेकांकडून होते; ती टाळावी. या शब्दातील रला पहिली वेलांटी आहे, तसेच पारिक नसून परिक आहे हे देखील लक्षात घ्यावे.

अनभिज्ञ
परिचय नसलेला, अजाण या अर्थी अनभिज्ञ हे विशेषण वापरले जाते. अभिज्ञ म्हणजे जाणणारा. अनभिज्ञ हा शब्द अभिज्ञच्या विरुद्धअर्थी आहे. या दोन्ही शब्दांत भवर पहिली वेलांटी असते, हे लक्षात ठेवावे. अनाभिज्ञ असे लिहिणे चुकीचे आहे, हेही ध्यानात घ्यावे. अभिज्ञात असाही एक शब्द आहे. पूर्ण माहीत असलेले, असा त्याचा अर्थ आहे.

परिणती
परिपाक, विकास, परिणाम, शेवट या अर्थांनी परिणती हा शब्द (संस्कृत शब्द परिणति) वापरला जातो. तो परिणिती असा लिहिला जाण्याची चूक होऊ शकते. ती टाळण्यासाठी परिणत हा शब्द लक्षात ठेवावा. पूर्ण वाढलेले, पक्व, शेवटास गेलेले असे परिणतचे अर्थ आहेत. परिणतवरून परिणती हा शब्द बनला. त्यात र वर पहिली वेलांटी आहे, हेही लक्षात ठेवावे.

परिसर
परिसर म्हणजे आसपासचा भाग. तीर, काठ, सीमा हेदेखील या शब्दाचे अर्थ आहेत. या शब्दांत 'र'वर पहिली वेलांटी आहे. ('परीसर' असे लिहिणे चूक.) या शब्दाबाबत दुसरी काळजी अशी घ्यायची; की आसपासचा परिसर, जवळचा परिसर, असे उल्लेख टाळायचे. 'परिसर' शब्दातच आसपासचा भाग अभिप्रेत असल्यामुळे त्या शब्दामागे आसपासचा, जवळचा असे शब्द वापरल्यास 'पिवळा पीतांबर'प्रमाणे द्विरुक्ती होते.

परीक्षा
परीक्षा हा शब्द तुम्हा सर्वांच्या परिचयाचा आहे. मात्र तो आपण चुकीचा तर लिहीत नाही ना, हे पाहावे. यात र वर दुसरी वेलांटी आहे. र वर पहिली वेलांटी दिली, तर परिक्षा असा शब्द होईल. परीक्षा आणि परिक्षा हे दोन्ही शब्द संस्कृत. परिक्षा चा अर्थ 'चिखल' असा होतो. आपल्याला चिखलात जायचे नसून परीक्षेला बसायचे आहे त्यामुळे र वर दुसरी वेलांटीच द्यायची, हे लक्षात ठेवायचे.

दशेंद्रिये
पाच ज्ञानेंद्रिये आणि पाच कर्मेंद्रिये मिळून होणार्‍या दहा इंद्रियांना दशेंद्रिये म्हणतात. यातील मूळ शब्द 'इंद्रिय' हा संस्कृत आहे. या शब्दात 'द्र'ला पहिली वेलांटी आहे.

नकुल
पांडवांपैकी चौथ्याचे नाव नकुल होते. ते एक सामान्यनामही आहे.मुंगूस असा त्याचा अर्थ आहे. नकुल हा शब्द लिहिताना दोन चुका होऊ शकतात. ल ऎवजी काही जण ळ उच्चारतात व लिहितानाही ती चूक (नकुळ) होऊ शकते. कला पहिला उकार आहे; तो दुसरा देण्याचीही (नकूल) चूक होऊ शकते. या चुका टाळण्यासाठी कु व ल ही दोन्ही अक्षरे लक्षात ठेवावीत.

पापभीरू
पापभीरू म्हणजे पाप करण्यास घाबरणारा. भीरू या संस्कृत विशेषणाचा अर्थ घाबरणारा असा आहे. मराठीत अंत्याक्षरातील इकार वा उकार दीर्घ लिहिले जात असल्याने भीरु हा शब्द 'भीरू' असा लिहिला जातो. भीरू व पापभीरू या शब्दांत भवर दुसरी वेलांटी आहे. (पापभिरू असे लिहिणे चूक.) रणभीरू हा शब्द अशाच तर्‍हेचा आहे. रणाला, म्हणजे युद्ध करण्यास घाबरणारा, असा त्याचा अर्थ.

पाश्चिमात्य
पाश्चिमात्य हा शब्द तुम्ही अनेकदा ऎकला वा वाचला असेल, 'पश्चिमेकडील' हा त्याचा अर्थही तुम्हाला माहीत असेल. 'पाश्चिमात्य'मध्ये 'त'ला 'त'नाही. 'त'(अर्धा) एकदाच आहे. ('पाश्चिमात्त्य' हे चूक.) पाश्चात्त्य हा शब्द त्याच अर्थी वापरला जातो. त्यात मात्र 'त'ला 'त' व त्याला 'य', असे तिहेरी जोडाक्षर आहे. तो शब्द 'पश्चात्'वरुन आला आहे. 'पश्चात्' चा एक अर्थ पश्चिमेकडे असा आहे.

पाश्चिमात्य
पाश्चिमात्य हा शब्द तुम्ही अनेकदा ऎकला वा वाचला असेल. पश्चिमेकडील हा त्याचा अर्थही तुम्हाला माधीत असेल. पाश्चिमात्य मध्ये तला त नाही. त (अर्धा) एकदाच आहे. (पाश्चिमात्त्य हे चूक). पाश्चात्त्य हा शब्द त्याच अर्थी वापरला जातो. त्यात मात्र तला त व त्यालाय असे तिहेरी जोडाक्षर आहे. तो शब्द पश्चात्वरुन आल आहे. पश्चातचा एक अर्थ पश्चिमेकडे असा आहे.

क्लेश
पीडा, यातना, त्रास, हालअपेष्टा या अर्थांनी क्लेश हा शब्द वापरला जातो. या शब्दात श शहामृगातला आहे; षट्कोनातला नव्हे, हे ध्यानात ठेवावे. (क्लेष असे लिहिणे चूक.) क्लेश देणारे असते, ते 'क्लेशकारक'. क्लेश हा शब्द नेहमी अनेकवचनात वापरला जातो. (हाल हा देखील शब्द अनेकवचनातच वापरला जातो.) क्लेश झाला असे न लिहिता क्लेश झाले असे लिहावे.

पीतांबर
पीतांबर (पीत+अंबर) म्हणरे पिवळे वस्त्र. पीत या शब्दाचा अर्थ पिवळे. अंबर म्हणजे वस्त्र. पीतांबर शब्दात 'प'वर दुसरी वेलांटी आहे, हे ध्यानात घ्यावे. ('पितांबर' असे लिहिणे चूक) कोणी 'पिवळा पीतांबर' असा शब्दप्रयोग करतात; त्यात द्विरुक्ती होते. 'पीतांबर'मध्ये 'पीत' शब्द समाविष्ट असल्यामुळे त्यामागे 'पिवळा' हा शब्द अनावश्यक. पीतांबर या शब्दाचा एक अर्थ विष्णू असाही होतो.

पीयूष
पीयूष म्हणजे अमृत. दूध असाही त्याचा एक अर्थ आहे. ज्ञानेश्वरीच्या पसायदानात हा शब्द आला आहे. (बोलते जे अर्णव पीयूषाचे) दह्यापासून बनविलेल्या एका पेयालाही पीयूष म्हणतात, हे तुम्हाला माहीत असेल. पीयूष हा शब्द चुकून 'पियूष' वा 'पीयुष' असा लिहिला जाण्याची शक्यता असते. या शब्दातील 'प'वर दुसरी वेलांटी आहे आणि 'य'ला दुसरा उकार आहे, हे विसरु नये.

पुनर्जन्म
पुनर्जन्म याचा अर्थ पुन्हा झालेला जन्म. हा शब्द लिहिताना रफाराबाबत गोंधळ होण्याची शक्यता असते. यात जवर रफार आहे, हे लक्षात ठेवावे. (पुर्नजन्म असे लिहिणे चूक.) दुसरी चूक जन्म या शब्दातील जोडाक्षराबाबत होण्याची शक्यता असते. हा शब्द काही जण जल्म असा उच्चारतात. या चुकीतून पुनर्जन्म हा शब्द पुनर्जल्म असा लिहिण्याची चूक होते. ती टाळण्यासाठी जन्म हा शब्द नीट लक्षात ठेवावा.

पुरुषोत्तम
पुरुषोत्तम हे भगवान विष्णूंचे एक नाव आहे. पुरुष + उत्तम ही या शब्दाची फोड आहे. पुरुषोत्तम म्हणजे पुरुषश्रेष्ठ. हा शब्द पुरषोत्तम अथवा पुर्षोत्तम असा उच्चारण्याची चूक होऊ शकते व लिहितानाही ती होण्याची शक्यता असते. ती टाळण्यासाठी या शब्दाची फोड लक्षात ठेवावी. पुरुषोत्तममध्ये रला पहिला उकार आहे, हेदेखील लक्षात ठेवावे. (पुरूषोत्तमअसे लिहिणे चूक.)

अक्षता
पूजेसाठी, तसेच मंगलकार्यात; औक्षणप्रसंगी वापरल्या जाणार्‍या कुंकूमिश्रित तांदळांना अक्षता म्हणतात. अक्षत हा मूळ संस्कृत शब्द. ते विशेषण म्हणून वापरले तर दु:खविरहित, सुरक्षित असे त्याचे अर्थ होतात. अ+क्षत अशी त्याची फोड आहे. (क्षत म्हणजे जखम.) कल्याण हादेखील अक्षत या संस्कृत नामाचा एक अर्थ आहे. अक्षता हा शब्द अक्षदा असा लिहिला जाण्याची चूक होऊ शकते; ती टाळावी.

पूर्वपीठिका
पूर्वपीठिका म्हणजे पूर्ववृत्त वा पूर्वीची पद्धत. ग्रंथाच्या प्रास्ताविक भागालाही पूर्वपीठिका म्हणतात. 'पूर्व + पीठिका' अशी या शब्दाची फोड आहे. पूर्व या शब्दाचे जे अर्थ आहेत, त्यांत पहिला, अगोदरचा, गतकालीन, हेही आहेत. आसन, पाया, ग्रंथभाग हे पीठिक या शब्दाचे अर्थ आहेत. पूर्वपीठिका या शब्दाच्या पहिल्या अक्षरात 'पला दुसरा उकार व तिसर्‍या अक्षरात 'प'वर दुसरी वेलांटी आहे, हे लक्षात घ्यावे.

क्षत्रिय
पूर्वी वर्णव्यवस्था होती; तिच्यातील दुसर्‍या वर्णाचे नाव क्षत्रिय होते. हा शब्द क्षत्र या शब्दापासून बनला आहे. योद्धा, वीरपुरूष हा क्षत्र चा अर्थ आहे. क्षत्रिय या शब्दात त्रवर पहिली वेलांटी आहे. (क्षत्रीय असे लिहिणे चूक.) क्षात्र या शब्दाचा अर्थ क्षत्रियांसंबंधी असा आहे. क्षात्रधर्म म्हणजे शौर्य, धैर्य . क्षात्रवृत्ती, क्षात्रतेज याही शब्दांचा उगम क्षत्र या शब्दात आहे.

पृथक्करण
पृथक्करण म्हणजे विश्लेषण. पृथक् या संस्कृत शब्दाचा अर्थ वेगळे, निराळे. अभ्यास करण्यासाठी एखाद्या गोष्टीचे भाग पाडणे, हे पृथक्करणात अपेक्षित असते. पृथक्करण या शब्दात विसर्ग नाही, हे ध्यानात घ्यावे. हा शब्द 'पृथ:करण' असा लिहिला जाण्याची चूक होऊ शकते; ती टाळावी. 'पृथक् + करण' ही या शब्दाची फोड लक्षात ठेवली, की यातील 'क्क' हे जोडाक्षर लक्षात राहील.

प्रगतिशील
प्रगती म्हणजे सुधारणा, उत्कर्ष. मूळ संस्कृत शब्द प्रगति असा आहे. प्रगतिशील शब्दात ति र्‍हस्वच असतो. प्रगतीची प्रवृत्ती असलेला, प्रगतिप्रिय, असा प्रगतिशील चा अर्थ आहे. हा शब्द प्रगतशील असा लिहिला जाण्याची शक्यता असते; पण तो तसा लिहिणे चुकीचे आहे. प्रगत आणि प्रगती हे वेगवेगळे शब्द आहेत. प्रगती झालेला, तो प्रगत. प्रगती हे नाम आहे; तर प्रगत हे विशेषण.

प्रदक्षिणा
प्रदक्षिणा म्हणजे फेरी. मंदिरात देवाला प्रदक्षिणा घालतात, हे तुम्हाला माहीत आहेच. प्रदक्षिण या संस्कृत शब्दावरुन हा शब्द बनला आहे. प्रदक्षिणचा अर्थ डावीकडून उजवीकडे असा आहे. देवळात प्रदक्षिणा अशीच घालायची असते. दक्षिण म्हणजे उजवी बाजू. प्रदक्षिणा हा शब्द चुकून प्रदक्षणा असा उच्चारलेला वा लिहिलेलाही तुम्हाला कदाचित आढळेल; पण 'क्ष'वर वेलांटी हवीच, हे लक्षात ठेवावे.

पुन:प्रसारण
प्रसारण हा शब्द नभोवाणीच्या वा दूरचित्रवाणीच्या कार्यक्रमांसंदर्भात अनेकदा वापरला जातो. तोच कार्यक्रम पुन्हा प्रसारित होतो, तेव्हा पुन:प्रसारण हा शब्द वापरला जातो. दूरचित्रवाणीच्या बाबतीत पुन:प्रक्षेपण हाही शब्द रूढ आहे. हे शब्द पुनर्प्रसारण वा पुनर्प्रक्षेपण असे लिहिणे चुकीचे आहे. नच्या नंतर विसर्ग आहे आणि प्रवर रफार नाही, हे ध्यानात घ्यावे. पुन:प्रत्यय याही शब्दाच्या बाबतीत या गोष्टी लक्षात ठेवाव्यात.

प्रसिद्धिपराङ्मुख
प्रसिद्धिपराङ्मुख म्हणजे प्रसिद्धि नको असलेला;प्रसिद्दी टाळणारा . प्रसिद्धि आणि पराङ्मुख हे दोन्ही संस्कृत शब्द आहेत. मराठीत प्रसिद्धि हा शब्द प्रसिद्धी असा लिहिला जातो. प्रसिद्धिपराङ्मुखमध्ये मात्र द्धवर पहिली वेलांटी आहे. पराङ्मुख म्हणजे तोंड फिरविलेला. प्रसिद्धिपराङ्मुख हा शब्द 'प्रसिद्धिपरांगमुख' वा प्रसिद्धिपरांमुख असा लिहिणे चुकीचे आहे. यात मला पहिला उकार आहे, हेही लक्षात ठेवावे.

प्राणिसंग्रहालय
प्राणी हा शब्द सर्वांच्या परिचयाचा आहे. मराठीत आपण त्यातील 'णी' दीर्घ लिहितो; पण संस्कृत शब्द 'प्राणिन्' असा आहे. त्याचा समास होताना 'ण'वर पहिली वेलांटी हवी. प्राणिसंग्रहालय हा सामासिक शब्द आहे. तो 'प्राणीसंग्रहालय' असा लिहिणे चुकीचे आहे. 'प्राणिमात्र' हा असाच सामासिक शब्द. त्यातही 'णि'र्‍हस्व हवा. प्राणिमात्र म्हणजे सर्व प्राणी. ('मात्र या शब्दाचा एक अर्थ 'सर्व' असा आहे.)

प्राप्तिकर
प्राप्तिकर या शब्दाची फोड प्राप्ति+कर अशी आहे. प्राप्ति हा संस्कृत शब्द; मराठीत तो प्राप्ती असा लिहिला जातो. त्यापासून समास होताना मात्र प्तवर पहिली वेलांटी असते. (प्राप्तीकर असे लिहिणे चूक.) कर या शब्दाचे अनेक अर्थ आहेत. सारा, पट्टी,जकात अशा तर्‍हेची सरकारकडे भरण्याची रक्कम, असा जो अर्थ आहे, त्याला अनुसरून इन्कम टॅक्स शब्दाला पर्यायी म्हणून प्राप्तिकर हा शब्द वापरला जातो.

प्रियंवदा
प्रियंवदा हे संस्कृत वृत्त आहे. याच्या चरणात १२ अक्षरे व चार गण असतात. मुलीचे नाव 'प्रियंवदा' असते. याचा अर्थ आहे गोड बोलणारी. या शब्दात 'प्र'ला पहिली वेलांटी व 'य'वरच अनुस्वार द्यावा; 'व' वर अनुस्वार देऊ नये.

प्रीत्यर्थ
प्रीत्यर्थ (प्रीति + अर्थ) या शब्दाचे मूळ अर्थ प्रेमासाठी, प्रेमामुळे असे आहेत. तथापि त्याचे रूढ अर्थ करिता, साठी, मुळे असे आहेत. म्हणजेच, प्रीत्यर्थ हे शब्दयोगी अव्यय म्हणून वापरले जाते. निमित्त अशाही अर्थाने त्याचा वापर होतो. (उदाहरणार्थ -वाढदिवसाप्रीत्यर्थ, स्मृतिप्रीत्यर्थ.) प्रीत्यर्थमध्ये प्रवर दुसरी वेलांटी आहे. प्रित्यर्थ असे लिहिणे चुकीचे आहे. ती चूक टाळण्यासाठी शब्दाची फोड लक्षात ठेवावी.

शब्द
फक्त शुद्धलेखनाच्या वहीतीलच नव्हे, तर आपले सर्वच लेखन शुद्ध असायला हवे , याची काळजी घेतली पाहिजे. आपण अनेक शब्द चुकीचे लिहितो, याची अनेकांना कल्पना नसते. शब्द या शब्दाचेच पाहा. शद्ब असा तो अनेक जण लिहितात. द च्या पोटात ब लिहिला, की त्याचा उच्चार शद्ब असा होतो.आपल्याला ब ला द जोडायचे आहे; द ला ब नव्हे. त्यात बचा गोल पूर्ण काढायचा आणि द च्या फुगवट्याची बाजू त्याला लागून काढायची. ही काळजी घेतलीत, तर शब्द चुकणार नाही.

फलित
फलित हा शब्द फल या शब्दावरून बनला आहे. फल म्हणजे फळ; परिणाम. फळे आलेले, सिद्धीस गेलेले, हे 'फलित' या शब्दाचे अर्थ आहेत. फलनिष्पत्ती हादेखील त्याचा अर्थ आहे. (उदा. अमुक समझोता, हे अमुक वाटाघाटींचे फलित आहे.) सुफलित हा शब्द 'फलित'वरूनच बनला आहे. ('सु' म्हणजे चांगले.) फलित व सुफलित या दोन्ही शब्दांत 'ल'वर पहिली वेलांटी आहे. ('फलीत' असे लिहिणे चूक.)

बक्षीस
बक्षीस म्हणजे पारितोषिक, हे आपल्याला माहीत आहे. इनाम, देणगी असेही या शब्दाचे अर्थ आहेत. या शब्दात क्षवर दुसरी वेलांटी आहे, हे लक्षात ठेवावे. बक्षिस असे लिहिणे चुकीचे आहे. बक्षीसचे सामान्यरूप होताना मात्र क्षीचा क्षिहोतो.(उदाहरणार्थ बक्षिसाचे, बक्षिसाला). बक्षिसी असाही एक शब्द आहे; तथापित्याला थोडी वेगळी छटा आहे. खूष होऊन दिलेली भेट, या अर्थी तो रूढ आहे.

उच्छृंखल
बंधने न पाळता स्वैर वर्तणूक करणार्या अविवेकी व्यक्तीला उच्छृंखल म्हटले जाते. उत् + शृंखल अशी या शब्दाची फॊड आहे. उत् हा उपसर्ग उलटपक्षी या अर्थाने तेथे वापरला आहे. शृंखल म्हणजे बंधन. त् आणि श् यांचा संधी होऊन च्छ् हे जोडाक्षर तयार होते. उच्छृंखल हा शब्द असाच संधी होऊन बनला आहे. तो उत्शृंखल असा लिहिणे चुकीचे आहे.

बधिर
बधिर या शब्दाचा अर्थ ऎकून शकणारा (बहिरा). संवेदनशून्य (उदाहरणार्थ - पाय बधिर होणे), सुन्न (उदाहरणार्थ - डोके बधिर होणे) याही अर्थांनी हा शब्द वापरला जातो. या शब्दात धवर पहिली वेलांटी आहे, हे ध्यानात ठेवावे. बधीर असे लिहिणे चुकीचे आहे. बधिरपासून बधिरता हे भाववाचक नाम तयार झाले आहे. त्यातही धिर्‍हस्व आहे. बधिरता म्हणजे संवेदनशून्य अवस्था.

नवग्रह
बुध, शुक्र, पृथ्वी... अशा नऊ ग्रहांचा समूह म्हणजे नवग्रह. हा शब्द हमखास 'नवगृह' असा लिहिला जातो. 'गृह' असे लिहिले की त्या शब्दाचा अर्थच बदलून जाईल.'गृह'चा अर्थ घर असा आहे. म्हणून 'नवगृह' असे लिहिल्यास नऊ घरं असा त्याचा अर्थ होईल. शब्दांचा अर्थ लक्षात घेऊन शब्द लिहावा.

चातुर्वर्ण्य
ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य व शूद्र अशा समाजाच्या चार वर्गांना चातुर्वर्ण्य म्हणतात. या शब्दात 'व'वर तसेच 'ण'ला 'य' जोडून त्यावरही रफार द्यावा. 'चातुवर्ण्य' , 'चातुर्वण्य' असे लिहू नये.

ध्रुव
भक्त ध्रुवाची गोष्ट तुम्हाला माहीत असेल. ध्रुव या विशेषणाचा अर्थ स्थिर, शाश्वत असा होतो. त्यावरुनच ध्रुव हे नाव तयार झाले. पृथ्वीच्या उत्तर व दक्षिण टोकांना अनुक्रमे उत्तर ध्रुव व दक्षिण ध्रुव म्हणतात. ध्रुव तारा तुम्ही बघितला असेल. हा शब्द चुकून 'ध्रूव' असा उच्चारला जातो व लिहितानाही ती चूक होऊ शकते. 'धृव' असाही तो लिहिणे चुकीचे आहे.

भागीरथी
भागीरथी हे गंगा नदीचे एक नाव आहे. भगीरथ या नावावरून ते तयार झाले आहे. भगीरथाने गंगा पृथ्वीवर आणली, अशी आख्यायिका आहे. भगीरथ या शब्दात गवर दुसरी वेलांटी आहे, म्हणून भागीरथी याही शब्दात गवर दुसरी वेलांटी आहे. (भगिरथी असे लिहिणे चूक.) भागीर्थी असा उच्चार चुकून होऊ शकतो; त्यामुळे तीही चूक लिहिताना होण्याची शक्यता असते. त्याही बाबतीत काळजी घ्यावी.

भानूदय
भानु म्हणजे सूर्य, भानूदय म्हणजे सूर्योदय. हा शब्द लिहिताना नला दुसरा उकार आहे, हे लक्षात ठेवावे. भानूदयमध्ये नला पहिला उकार लिहिला जाण्याची चूक होते. त्याचा नियम लक्षात ठेवा. दोन सजातीय स्वर एकत्र आल्यास त्याच जातीचा एक दीर्घ स्वर होतो. उ + उ = ऊ, म्हणून भानु + उदय = भानूदय.

सामासिक शब्द

भाषा लिहायला व बोलायला सोपी जावी म्हणून शब्दांचे एकत्रीकरण करून एक स्वतंत्र शब्द तयार केला जातो. त्याला सामासिक शब्द म्हणतात. या समासाचे खूप प्रकार आहेत. हे सामासिक शब्द जोडूनच लिहावेत. उदा. कांदेपोहे, बटाटावडा, साखरभात, भाजीपाला, वनभोजन. या जोडशब्दांतील विभक्ती प्रत्यय गाळल्यामुळे ते स्वतंत्र शब्द झाले. सामासिक शब्द ही भाषेची सोय आहे.

भित्तिचित्र
भित्तिचित्र म्हणजे भिंतीवर शोभेसाठी काढलेले चित्र. भित्तिपत्रिका म्हणजे भिंतीवर लावण्याकरिता केलेली जाहिरात. हा शब्द अनेक वेळा भिंत्तिचित्र , भींत्तीचित्र असा लिहिला जातो. यातील भवर अनुस्वार लिहू नये, तसेच तला पहिली वेलांटी व त ला त जोडून लिहिण्यास विसरू नये.

भीती
भीती हा शब्द माहीत नाही, असा माणूस विरळा. हा शब्द आपण अनेकदा वापरतो. मुळात तो संस्कृत. त्या भाषेत तो भीतिअसा लिहितात. जे शब्द मुळात इकारान्त वा उकारान्त आहेत, ते मराठीत लिहिताना मात्र शेवटचे अक्षर दीर्घच काढायचे, असा शुद्धलेखनाचा नियम. त्यामुळे मराठीत तो भीती असा लिहायचा. अनेक जण तो भिती असा चुकीचा लिहितात. तसे न करण्याची काळजी घ्या.

भूकंप
भूकंप हा शब्द सर्वांच्या परिचयाचा आहे. तो लिहिताना मात्र भला दुसरा उकार देण्याऎवजी पहिला दिला जाण्याची (भुकंप) चूक होऊ शकते; ती टाळावी. भू म्हणजे पृथ्वी, जमीन. भूगोल, भूगर्भशास्त्र , भूपृष्ठ, भूपती इत्यादी शब्द भूपासून बनले आहेत. त्यांच्या सामान्यरूपांतही भला दुसरा उकार असतो. उदाहरणार्थ - भूगोलाचे, भूपृष्ठावर, भूपतीचे, भूकंपामुळे, इत्यादी. भूमी म्हणजे पृथ्वी, जमीन. त्याही शब्दात भला दुसरा उकार आहे.

भ्रातृभाव
भ्रातृम्हणजे भाऊ, बंधू. जिवलग मित्र असाही या शब्दाचा अर्थ आहे. भ्राता हे या शब्दाच्या प्रथमा विभक्तीचे एकवचन. भ्रातृभाव म्हणजे बंधुभाव. हा शब्द चुकून भातृभाव , भ्रातुभाव वा भ्रात्रुभाव असा लिहिला जाण्याची शक्यता असते. त्याबाबत काळजी घ्यावी. भ्रातृत्व म्हणजे बंधुत्फ़्व; भ्रातृप्रेम म्हणजे बंधुप्रेम. भ्रातृहा शब्द लक्षात राहिला म्हणजे हे शब्द चुकणार नाहीत.

मथितार्थ
मथितार्थ म्हणजे सारांश. एखाद्या विषयावर वाद वा विचारविनिमय होऊन जो निष्कर्ष काढला जातो, त्यालाही मथितार्थ म्हणतात. मथित + अर्थ अशी या शब्दाची फोड आहे. मथणे म्हणजे घुसळणे; मंथन करणे. घुसळू न जे निघते, ते मथित. लोणी हा देखील मथितचा एक अर्थ आहे. विचारमंथन करणे, म्हणजेच तो विषय घुसळणे. मथितार्थ हा शब्द मतितार्थ असा लिहिण्याची चूक होणार नाही याची काळजी घ्यावी.

मंदिर
मंदिर हा शब्द सर्वांच्या परिचयाचा आहे. त्याचा मूळ अर्थ घर, निवासस्थान असा आहे. केवळ मंदिरएवढाच उल्लेख असतो, तेव्हा देवाचे मंदिर अभिप्रेत असते. (अन्य बाबतींत रंगमंदिर, विद्यामंदिर, न्यायमंदिर अशा तर्हेचे उल्लेख असतात.) मंदिरमध्ये द वर वेलांटी पहिलीच आहे, हे लक्षात ठेवायचे. अर्थातच सामान्यरूपातही (मंदिराचे, मंदिरात इत्यादी) ती वेलांटी पहिलीच राहते.

मधुसूदन
मधु हे संस्कृतमधील एक नाव आहे. त्या नावाचा एक राक्षस होता. भगवान विष्णूंनी त्याचा वध केला, अशी पुराणातील कथा आहे. सूदन या शब्दाचा अर्थ नाश करणारा . मधूचा नाश करणारा, तो मधुसूदन . या शब्दात धला पहिला उकार व सला दुसरा उकार आहे, हे ध्यानात ठेवावे. (मधुसुदन, मधूसुदन, मधूसूदन असे लिहिणे चूक.)

पूर्वग्रहदूषित
मन वा दृष्टी पूर्वग्रहदूषित असणे, म्हणजे एखाद्या व्यक्तीसंबंधी वा विषयासंबंधी आधीच बरे-वाईट मत बनविणे. पूर्वग्रहविरहित हा याच्या उलट अर्थाचा शब्द. पूर्वग्रहदूषितमध्ये प व द यांना दुसरा उकार आहे; तसेच ष वर पहिली वेलांटी आहे, हे ध्यानात घ्यावे. या शब्दातील ग्र हे जोडाक्षरही लक्षात ठेवावे. (पूर्वगृहदूषित असे लिहिणे चूक.) पूर्वग्रहविरहित मध्ये हवर पहिली वेलांटी आहे. (पूर्वग्रहविरहीत असे लिहिणे चूक).

मनीषा
मनीषा हा संस्कृत शब्द मराठीत इच्छा या अर्थी रूढ आहे. संस्कृतमध्ये मनीषाच्या अर्थांमध्ये बुद्धी, चातुर्य, कल्पना हेही समाविष्ट आहेत. मनीषित म्हणजे इच्छिलेले. मनीषा हे विशेषनाम म्हणूनही रूढ आहे. या शब्दात नवर दुसरी वेलांटी आहे. अनेकांच्या हातून हा शब्द मनिषा असे लिहिण्याची चूक होते; ती टाळावी. मनीष् या संस्कृत शब्दाचा अर्थ बुद्धी असा आहे.

मयूरेश्वर
मयूरेश्वर हे गणपतीचे एक नाव आहे. मयूर + ईश्वर अशी त्याची फोड आहे. मयूर म्हणजे मोर. मयूरमध्ये यला दुसरा उकार असल्यामुळे मयूरेश्वर याही शब्दात यला दुसरा उकार आहे. अनेकांकडू न पहिला उकार दिला जातो (मयुरेश्वर); ती चूक टाळावी. त्याचप्रमाणे मयूरनृत्य, मयूरेश, मयूरासन अशा शब्दांतही यू दीर्घ, हे ध्यानात ठेवावे. मयूरी हे मयूर या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप; त्यातही यू दीर्घच आहे.

हिरा आणि हीरक
मराठीत आपण ज्याला हिरा म्हणतो, त्याला हिंदीत हीरा म्हणतात. दूरचित्रवाणीवरून हिंदी बर्‍याच प्रमाणात कानावर पडत असल्यामुळे हिरा शब्दात 'ह'वर पहिली वेलांटी की दुसरी, असा प्रश्न पडू शकतो; म्हणून हे ध्यानात घ्यावे. हिर्‍याला संस्कृतमध्ये हीर व हीरक हे शब्द आहेत. साठ वर्षे पूर्ण होणे, या अर्थी हीरकमहोत्सव हा शब्द वापरला जातो. त्यात 'ह'वर दुसरी वेलांटी, हे लक्षात ठेवावे.

किडूकमिडूक
मराठीत काही शब्दांपुढे निरर्थक अक्षरे वापरून यमक साधण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. दुसर्‍या शब्दाला स्वतंत्र अर्थ नसतो. त्यामुळे असे शब्द एकत्रच लिहावेत. किडूक-मिडूक असे तोडून लिहू नये. मिडूक असा स्वतंत्र शब्द नाही. याचप्रकारची आणखी काही उदाहरणे अशी आहेत - बारीकसारीक, अघळपघळ, गोडधोड.

वाल्मीकी
महाकवी वाल्मीकी ऋषींनी रामायण लिहिले, हे आपल्याला माहीतच आहे. वाल्मीकि हा संस्कृत शब्द. मराठीत अंत्याक्षर दीर्घ लिहायचे, म्हणून तो वाल्मीकी असा लिहायचा. अनेक जण तो वाल्मिकी असा चुकीचा लिहितात. वल्मीक म्हणजे वारूळ. हे ऋषी तप करीत असताना त्यांच्या अंगावर मुंग्यांनी वारूळ केले, तरीही त्यांची एकाग्रता भंग पावली नाही, अशी कथा आहे.

महीपाल
मही म्हणजे पृथ्वी. एका सर्पाचे नावही मही आहे. महीपाल, महीधर हे विशेषनाम म्हणून वापरतात. मूळ संस्कृताप्रमाणेच या शब्दात हला दुसरी वेलांटीच हवी. या शब्दाचे सामान्यरूप करतानाही या शब्दात बदल होत नाही. उदा. महीपालाने.

सुसंबद्ध
मागच्या-पुढच्याशी उत्तम मेळ असलेले, हा सुसंबद्ध या विशेषणाचा अर्थ आहे. सु+संबद्ध ही सुसंबद्धची फोड आहे. निगडित, जोडलेले, नाते असलेले, हे संबद्धचे अर्थ आहेत. सुसंबद्ध हा शब्द सुसंबंद्ध वा सुसंबंध असा लिहिला जाण्याची चूक होऊ शकते. संबंध आणि संबद्ध हे वेगवेगळे शब्द आहेत, हे ध्यानात घ्यावे. (संबंध म्हणजे नाते.) सुसंबद्धमध्ये द च्या पोटात ध आहे, हेही लक्षात ठेवावे.

पीछेहाट
माघार घेण्याच्या क्रियेला पीछेहाट म्हणतात.पीछेहाट होणे असा शब्दप्रयोग रूढ आहे. या शब्दाचे मूळ पीछे या हिंदी शब्दांत आहे. पीछे म्हणजे मागे. हटणे म्हणजेही मागे येणे. पीछेहाट या शब्दात पवर दुसरी वेलांटी आहे. (पिछेहाट असे लिहिणे चूक.) आगेकूच हादेखील हिंदीतून आलेला शब्द असून तो पीछेहाटच्या विरुद्ध अर्थाचा आहे. त्यात कला दुसरा उकार आहे, हेही ध्यानात ठेवावे.

ढिगारा
माती, गवत, लाकडे यांचा जो ढीग असतो, त्याला ढिगारा म्हणतात. 'ढीग' हा शब्द लिहिताना 'ढ'ला दुसरी वेलांटी द्यावी, पण 'ढिगारा' शब्द लिहिताना ;पहिली वेलांटी द्यावी.

माहात्म्य
माहात्म्य शब्दाचे नाते महात्मा शब्दाशी आहे. महा + आत्मा ही महात्मा शब्दाची फोड आहे. अतिथोर मनाच्या व्यक्तीचे वर्णन करताना आपण हा शब्द वापरतो. माहात्म्य हे भाववाचक नाम. थोरवी हा जसा त्याचा अर्थ आहे, तसेच देवादिकांचा महिमा, प्रताप, वैभव आदी अर्थही आहेत. हा शब्द महात्म्य असा लिहिला जाण्याची चूक होऊ शकते; ती टाळावी. यातील जोडाक्षरही नीट ध्यानात घ्यावे.

मिलन
मिलन हा शब्द मराठीत संस्कृतमधून आलेला (तत्सम) आहे. मल या शब्दापासून तो बनला आहे. (मराठीतील मळ हा शब्द मलपासूनच बनला आहे.) मल या शब्दाचा अर्थ घाण, केरकचरा. दु:स्वभाव याही अर्थी तो वापरला जातो. मिलन म्हणजे मळलेला, खराब, आचारहीन, अपवित्र. या शब्दात लवर पहिली वेलांटी आहे, हे लक्षात घ्यावे. (मलीन असे लिहिणे चूक.)

संकीर्ण
मिश्रित, एकत्रित, संकलित या अर्थांनी संकीर्ण हा शब्द वापरला जातो. संक्षिप्त, अस्पष्ट, अशुद्ध, संकरित असेही त्याचे अन्य अर्थ आहेत. संकीर्ण या शब्दात कवर दुसरी वेलांटी आहे, हे ध्यानात ठेवावे. संकिर्ण असे लिहिणे चुकीचे आहे. ज्या गोष्टी विशिष्ट प्रकारात वा वर्गात समाविष्ट नसतात, त्यांचा एकत्रितपणे संकीर्ण असा उल्लेख केला जातो. मुख्यत: त्याच अर्थाने या शब्दाचा वापर होतो.

मीनाक्षी
मीनाक्षीचा अर्थ मत्स्याप्रमाणे चमकदार डोळे असलेली स्त्री, असा आहे. मीनाक्षी दक्षिण हिंदुस्थानातील प्रसिद्ध देवताही आहे. या शब्दातील मला दुसरी वेलांटी द्यावी. मला पहिली वेलांटी दलिी तर त्याचा अर्थ बदलतो. मिनाचा अर्थ काचेचा मुलामा असा आहे. शब्दाचा अर्थ लक्षात घेतला तर ही चूक होणार नाही. मीन म्हणजे मासा , अक्ष म्हणजे डोळा.

मीमांसा
मीमांसा म्हणजे विचारपूर्वक केलेला तत्वनिर्णय. शोध असाही या शब्दाचा अर्थ आहे. कारणमीमांसा म्हणजे कारणाचा शोध. मीमांसा शब्दाचे पहिले अक्षर र्‍हस्व उच्चारले जाण्याची (मिमांसा) चूक अनेकांकडून होते व लिहितानाही ती होऊ शकते. म वर दुसरी वेलांटी असते हे लक्षात ठेवावे. मीमांसा करणारा, तो मीमांसक. या दोन्ही शब्दांच्या सामान्यरूपांतही मी दीर्घच राहणार. (उदाहरणार्थ - मीमांसेचे, मीमांसकाला)

मुकुल
मुकुल हा शब्द संस्कृतमधून आलेला आहे. किंचित उमललेली कळी असा त्याचा अर्थ आहे. कमळ, आत्मा, देह हेही त्याचे अन्य अर्थ आहेत. ते एक विशेषनामही आहे. या शब्दात कला पहिला उकार आहे, हे ध्यानात ठेवावे. (मुकूल असे लिहिणे चूक.) मुकुलित हे विशेषण आहे. अर्धवट मिटलेले, संक्षिप्त, संकुचित हे त्याचे अर्थ आहेत.
मुष्टियुद्ध
मुष्टियुद्ध हा एक क्रीडाप्रकार आहे. इंग्रजीत त्याला बॉक्सिंग म्हणतात. मुष्टि या संस्कृत शब्दाचा अर्थ मूठ. मराठीत मुष्टिया शब्दात ष्ट वर दुसरी वेलांटी द्यायची ; पण समास होताना मात्र मूळच्या संस्कृत शब्दाप्रमाणे पहिली वेलांटी द्यायला हवी. (मुष्टीयुद्ध असे लिहिणे चूक.) मुष्टियोद्धा म्हणजे, मुष्टियुद्ध खेळणारा. त्या शब्दाचे सामान्यरूप होताना चुकून मुष्टियोध्याला असे लिहिले जाण्याची शक्यता असते. मुष्टियोद्ध्याला असे लिहावे.

मूर्तिकार
मूर्तिकार म्हणजे मूर्ती करणारा. मूर्ति + कार अशी या शब्दाची फोड आहे. मूर्ति हा संस्कृत शब्द मराठीत मूर्ती असा लिहिला जातो; मात्र त्यापासून होणार्‍या सामासिक शब्दांत र्ति हे जोडाक्षर र्‍हस्वच असते. (मूर्तीकार असे लिहिणे चुकीचे.) मला दुसरा उकार, हेही लक्षात ठेवावे. (मुर्तिकार असे लिहिणे चुकीचे.) मूर्तिमंत या सामासिक शब्दाचा अर्थ साक्षात, प्रत्यक्ष असा होतो.

मूलभूत
मूलभूत हा शब्द मूल या संस्कृत शब्दापासून बनला आहे. मूळ, उत्पत्तिस्थान, उगम, पाया हे मूल या शब्दाचे अर्थ आहेत. मूलभूत म्हणजे आधारभूत, मूलगामी. मूलभूत हा शब्द लिहिताना उकारांच्या बाबतीत चुका होण्याची शक्यता असते. या शब्दात म आणि भ या दोन्ही अक्षरांना दुसरा उकार आहे, हे लक्षात ठेवावे. (मुलभूत, मुलभुत, मूलभुत असे लिहिणे चूक.)

मूल्य
मूल्य म्हणजे किंमत. मोल हादेखील त्याच अर्थाचा शब्द आहे. मूल्य या शब्दात 'म'ला दुसरा उकार आहे, हे लक्षात घावे. सामन्यरूपातही हा उकार बदलत नाही. (उदा. - मूल्याचा, मूल्यात, मूल्यापेक्षा.) बहुमूल्य म्हणजे भारी किंमतीचे. मौल्यवान या शब्दाचाही तोच अर्थ आहे. योग्यता, महत्त्व, गुण या अर्थांनीही मूल्य हा शब्द वापरला जातो. मूल्यांकन करणे म्हणजे किंमत निश्चित करणे. मूल्यांकन मध्येही मू दीर्घ आहे.

सौहार्द
मैत्री, स्नेह या अर्थी सौहार्द हा शब्द वापरला जातो. हा शब्द चुकून 'सौदार्ह ' असा लिहिला जाणार नाही, याची काळजी घ्यावी. सौहृद् याही शब्दाचा अर्थ सौहार्द हाच आहे. सुहृद् वा सुहृत् या शब्दाचा अर्थ प्रेमळ मित्र, सोबती. यापासूनच सौहार्द हा शब्द तयार झाला आहे. हृद् म्हणजे अंत:करण, हृदय. सुहृद्चे मूळ हृद् शब्दात आहे.

हाहाकार
मोठे संकट आल्यावर जो कल्लोळ होतो, त्याला हाहाकार असे म्हणतात. हा शब्द 'हाहा:कार' असा उच्चारण्याची व तसाच लिहिण्याची चूक अनेकांकडून होते. वास्तविक त्यात विसर्ग नाही. 'हाहा' हा संस्कृतमधील दु:खोद्गार आहे. त्याला 'कार' प्रत्यय लागून हाहाकार हा शब्द तयार झाला. हुंकार, ॐकार हे शब्द अशाच रीतीने तयार झाले आहेत. धिक्कार(धिक्+कार) हादेखील असाच शब्द आहे.

यथास्थित
यथास्थित हा शब्द संस्कृतमधून आला आहे. त्याचे अनेक अर्थ आहेत. भरपूर, हवे तितके, पुरेपूर या अर्थांनी तो अधिक रूढ आहे. जसे होते तसे, पूर्वीप्रमाणे, परिस्थितीप्रमाणे, असेही त्याचे अर्थ आहेत. हा शब्द यतास्थित, यथास्तित असा लिहिण्याची चूक होऊ शकते; ती टाळावी. 'यथा + स्थित' ही या शब्दाची फोड लक्षात ठेवावी; म्हणजे चूक होणार नाही.

परिशीलन
या शब्दाचा अर्थ आहे अभ्यास. हा शब्द लिहिताना नेमके उलटे लिहिले जाण्याची शक्यता असते. 'परीशलिन' असे न लिहिता 'र'ला पहिली वेलांटी व 'श'ला दुसरी वेलांटी द्यावी.

मूर्च्छा
या शब्दाचा अर्थ आहे चक्कर, घेरी. हा संस्कृत शब्द आहे. मराठी लिहिताना मूळ संस्कृताप्रमाणे 'म' ला दुसरा उकार व 'च' ला 'छ' जोडून त्याला काना व त्यावर रफार द्यावा. मूरछा, मूर्छा असे लिहू नये.

जितेंद्रिय
या शब्दाचा अर्थ आहे ज्याने आपली इंद्रिये जिंकली आहेत असा, संयमी. हा शब्द लिहिताना ज, द्रला पहिली वेलांटी व तेवर अनुस्वार द्यावा. अनुस्वार ने देता न्द्रि असे रूप करू नये. जितेंद्रिय असे लिहिणेच योग्य.

इत्थंभूत
या शब्दाचा अर्थ आहे तपशीलवार, सविस्तर, घडल्याप्रमाणे. हा संस्कृत शब्द आहे. या शब्दात 'त' ला 'थ' जोडून त्यावर अनुस्वार द्यावा. 'इत्यंभूत' , 'इत्थंभुत' असे लिहिणे चुकीचे आहे.

निष्कलंक
या शब्दाचा अर्थ आहे निर्मळ, कलंकरहित. हा शब्द लिहिताना (नि) पुढे विसर्ग देऊ नये, तसेच शहामृगातला 'श' न लिहिता षट्कोनातला (ष) लिहावा.

स्वादुपिंड
या शब्दाचा अर्थ आहे पचनास पोषक रस देणारी पोटातील ग्रंथी. हा शब्द लिहिताना स्वादूपींड , सादुपिंड, स्वादूपिंड अशा अनेक चुकीच्या पद्धतीने लिहिला जातो. यातील मूळ शब्द स्वादु हा संस्कृत शब्द र्‍ह्स्व असल्यामुळे तो स्वादुपिंड लिहितानाही तसाच लिहावा.

गुपचूप
या शब्दाचा अर्थ आहे मुकाट्याने एखादी गोष्ट करणे, चोरून करणे. या शब्दात गला पहिला उकार व चला दुसरा उकार द्यावा. गूपचुप असे लिहिणे चुकीचे आहे.

फूत्कार
या शब्दाचा अर्थ आहे रागाचा आवेशयुक्त सुस्कारा. हा संस्कृत शब्द आहे. या शब्दात 'फ'ला दुसरा उकार आहे व अर्धा 'त 'कला जोडावा. फुत्कार, फूतकार असे लिहू नये.

दुष्कृत्य
या शब्दाचा अर्थ आहे वाईट कृत्य, पापकर्म. हा शब्द लिहिताना बर्‍याच वेळा दुच्या पुढे विसर्ग लिहिलेला आढळतो. या शब्दात विसर्ग लिहू नये. याचा नियम लक्षात ठेवा. विसर्गाच्या मागे इ किंवा उ असून पुढे क्, ख्, प्, फ् यापैकी कोणताही वर्ण आल्यास विसर्गाचा ष होतो. म्हणून या शब्दात विसर्ग न लिहिता दुष्कृत्य असे लिहावे. याला अपवाद - दु:ख, नि:पक्ष.

परिपाक
या शब्दाचा अर्थ आहे विकास, परिणाम. 'परि' हा संस्कृतमधील उपसर्ग आहे. उपसर्ग लागून काही शब्द तयार होतात, त्यातलाच हा एक शब्द. 'परि' म्हणजे पूर्ण. या शब्दात 'र'ला पहिली वेलांटी द्यावी.

सुषुम्ना
या शब्दाचा अर्थ आहे शरीरांतर्गत इडा व पिंगळा या दोन नाड्यांमधील नाडी. आध्यात्मशास्त्रात, योगाभ्यासात या शब्दाचा वापर केलेला आढळतो. हा संस्कृत शब्द मराठीत जसाच्या तसा वापरतात.

विकेंद्रीकरण
या शब्दाचा अर्थ आहे सत्ता, संपत्ती, उत्पादन एका केंद्रात न साठवता सर्वत्र पसरणे, किंवा वाटप करणे, विभागणे. या शब्दात 'व' ला पहिली वेलांटी व 'द्र'ला दुसरी वेलांटी द्यावी. विकेंद्रिकरण असे लिहिणे चुकीचे आहे.

धूमधडाका
या शब्दाचा अर्थ आहे सपाटा, जोम, आवेश. 'धूम', 'धडाका' या दोन्ही शब्दांचा अर्थ तसा एकच आहे. दोन्ही शब्द एकत्र वापरून त्याचा अर्थ जास्त परिणामकारकरीत्या दाखवला जातो. या शब्दात 'ध'ला दुसरा उकार द्यावा. 'धुमधडाका' असे लिहू नये.

पाणिग्रहण
या शब्दाचा अर्थ विवाहधर्माने स्त्रीचा स्वीकार करणे असा आहे. हा शब्द लिहिताना चुका होण्याची शक्यता असते. यातील पाणि या शब्दाचा अर्थ जल नसून हस्त, हात असा आहे हे ध्यानात घ्यावे. णला दुसरी वेलांटी लिहिली असता त्याचा अर्थ जल होईल. शब्दाचा अर्थ लक्षात घेतल्यास चूक होणार नाही; तसेच या शब्दात गृ असे न लिहिता ग्र लिहावे. 'पाणिगृहण' असे लिहिणे चूक आहे.

मनस्ताप
या शब्दाची फोड पाहिल्यास हा शब्द लिहिताना चूक होणार नाही. याचा संधी पुढीलप्रमाणे आहे - मन: + ताप = मनस्ताप. विसर्गाच्या पुढे त, थ आल्यास त्याचा स होतो. म्हणून या शब्दातला विसर्ग जातो व मनस्ताप असा शब्द तयार होतो. या नियमाचे आणखी एक उदाहरण म्हणजे - निस्तेज (नि: + तेज).

गीता
या शब्दाचे सामान्यरूप करतानाही या शब्दात फरक पडत नाही. उदा. गीतेचा, गीतेसाठी. मराठीच्या नियमाप्रमाणे याचे रूप गितेला, गितेसाठी व्हायला हवे; पण हा शब्द तत्सम असल्यामुळे या शब्दात फरक पडत नाही, हे लक्षात ठेवा. याची आणखी काही उदाहरणे - परीक्षा, पूजा इ.

सच्छिष्य
या शब्दात छला च जोडून का लिहायचा हे लक्षात घेतले तर चुकीचा शब्द लिहिला जाणार नाही. नियम - त् या व्यंजनापुढे च् , छ् आल्यास त् बद्दल च् होतो. मूळ शब्द - सत् शिष्य. एकत्र येणारी व्यंजने व संधी - त् + श्= च् + छ. म्हणून सच्छिष्य असा जोडशब्द तयार होतो. याचा अर्थ चांगला शिष्य.

शिरस्त्राण
या शब्दात स्त्रऐवजी स्र असे लिहिले जाण्याची शक्यता असते. शब्दातील घटक वर्ण लक्षात घेतला, तर चुकीचा शब्द लिहिला जाणार नाही. स्त्रची फोड अशी आहे. स् +त् + र् + अ. म्हणून शिरस्त्राण शब्द लिहिताना सला त्र जोडून व शला पहिली वेलांटी लिहावी. शीरस्त्राण असे लिहिणे चूक आहे.

कर्मधारय समास
या समासात दोन पदांमधील पहिले पद पुढच्या पदाचे गुणविशेषण असते. उदा. पांढराशुभ्र, हिरवागार, काळाभोर, लालभडक. या शब्दांमुळे त्या शब्दांचा 'विशेष गुण' लगेच लक्षात येतो. मात्र या शब्दांत डॅश टाकू नये. उदा. लाल-भडक असे न लिहिता लालभडक असेच लिहावे.

द्वंद्व समास
या समासातील दोन्ही पदे समान दर्जाची असतात. ही पदे उभयान्वयी अव्ययांनी जोडलेली असतात. उदा. बहीणभाऊ, पापपुण्य, बरेवाईट, तीनचार, खरेखोटे इ. हे शब्द देखील जोडून लिहावेत.

पीयूष
याचा अर्थ आहे अमृत. हा संस्कृत शब्द आहे. या शब्दात श या अक्षराचा घोटाळा होतो. यात षट्कोनातला 'ष'च वापरावा. पीयूश असे लिहू नये.

द्राविडी प्राणायाम
याचा अर्थ आहे एखादी गोष्ट करण्याचा मुद्दाम स्वीकारलेला वाकडा मार्ग, लांबचा, कंटाळवाणा प्रवास. हा शब्द लिहिताना 'द्रविडी', 'द्रावीडी' असे न लिहिता 'द्राविडी' असे लिहावे.

टिप्पणी
याचा अर्थ आहे खुलासा, स्पष्टीकरण. हा शब्द 'टिपण्णी','टीप्पणी' असा न लिहिता 'टला पहिली वेलांटी व 'प'ला 'प' जोडूनच लिहावा. योग्य उच्चार केल्यास शब्द लिहिताना चूक होत नाही.

दृष्टिगोचर
याचा अर्थ आहे पाहता येणारे, दृष्टीस पडणारे. हे संस्कृत विशेषण आहे. या शब्दात 'ष्ट'ला पहिली वेलांटी द्यावी. कारण मुळात 'दृष्टि' हा शब्द संस्कृत असून तो र्‍हस्वच आहे. त्यामुळे सामासिक शब्दातही तो र्‍हस्वच लिहावा. 'गोचर' याचा अर्थ 'माहीत' असा आहे.

पूर्वपीठिका
याचा अर्थ आहे पूर्वीचा इत्यांभूत वृत्तांत, एखाद्या गोष्टीची पार्श्वभूमी. हा शब्द लिहिताना खूप चुका होण्याची शक्यता असते. या शब्दातील 'पूर्व' , 'पीठिका' या दोन्ही शब्दांतील मूळ र्‍हस्व, दीर्घ लक्षात घेतल्यास लिहिताना चूक होणार नाही. पूर्वपिठीका, पूर्वपीठीका, पुर्वपिठिका अशा चुकीच्या पद्धतीने लिहू नये.

व्यक्तीकरण
याचा अर्थ आहे प्रकटीकरण, स्पष्टीकरण. हा शब्द लिहिताना हमखास 'व्यक्तिकरण' असा लिहिला जातो. तसे लिहिणे चुकीचे आहे. या शब्दात क्तला दुसरी वेलांटीच हवी.

बुभुक्षित
याचा अर्थ आहे भुकेला, हपापलेला, गरजू इ. हे संस्कृत विशेषण आहे. हा शब्द लिहिताना 'ब', 'भ' ला पहिला उकार व 'क्ष'ला पहिली वेलांटी द्यावी. शब्दाचा उच्चार जर योग्य रीतीने केला, तर र्‍हस्व, दीर्घ चुकणार नाही.

दुश्चिन्ह
याचा अर्थ आहे वाईट लक्षण. हा शब्द लिहिताना विसर्ग द्यावा का देऊ नये, याविषयी शंका येते. विसर्गाचा नियम लक्षात घेतल्यास संभ्रम पडणार नाही. विसर्गाच्या पुढे च, छ आल्यास विसर्गाचा श होतो. या शब्दाचा संधी - दु: + चिन्ह = दुश्चिन्ह.

शिखा
याचा अर्थ आहे शेंडी, तुरा, कलगी, अग्नीची ज्वाला, पावसाची लहान सर. या शब्दात 'श'ला दुसरी वेलांटी न देता पहिली द्यावी. 'शीखा' असे लिहिणे चुकीचे आहे.

यच्चयावत
याचा अर्थ आहे सर्व, झाडून सगळे. बर्‍याच वेळा हा शब्द यच्चावत, यच्यावत, यच्ययावत असा निरनिराळ्या पद्धतींनी लिहिलेला आढळतो. या शब्दात चला च जोडून लिहावा. शब्दाचा उच्चार व्यवस्थित केला की लिहिताना चूक होत नाही.

सूचित
याचा अर्थ आहे सुचवलिे ले. हा संस्कृत शब्द मराठीतही वापरतात. या शब्दात 'स'ला दुसरा उकार व 'च'ला पहिली वेलांटी आहे हे लक्षात ठेवावे. 'सुचीत', 'सुचित' असे लिहू नये.

मौंजीबंधन
याचा अर्थ उपनयन, मुंज, व्रतबंध. हा मूळ संस्कृत शब्द आहे. विशेषत: पुत्राला गुरुगृही शिक्षणासाठी पाठविताना हा संस्कारविधी केला जाई. मौंजीबंधन, मौंजिबंधन असे न लिहिता मौंजीबंधन लिहिणे योग्य आहे.

निष्कांचन
याचा अर्थ दरिद्री, कफल्लक, कंगाल असा आहे. हा शब्द लिहिताना यात विसर्ग नाही, हे लक्षात ठेवा. शहामृगातल्या श ऐवजी षट्कोनातला ष लिहावा. नि:श्कांचन असे न लिहिता निष्कांचन असे लिहिणे योग्य.

शुचिर्भूत
यात मूळ शब्द 'शुचि' आहे. याचा अर्थ आहे स्वच्छ, शुद्ध, पवित्र. 'शुचिर्भूत' म्हणजे सदाचरणी असाही एक अर्थ आहे. हा शब्द लिहिताना ऱ्हस्व, दीर्घ यांकडे विशेष लक्ष द्यावे.

भिडस्त
यातला मूळ शब्द भीड आहे. भीड म्हणजे संकोच. लोकलज्जा असाही एक अर्थ. भिडस्त शब्द विशेषण म्हणून वापरला जातो. यात भ ला पहिली वेलांटी द्यावी. 'भीडस्त' असे लिहू नये.

मितभाषी
यातील 'मित' शब्द संस्कृत आहे. याचा अर्थ आहे मोजका, मर्यादित. 'मितभाषी' म्हणजे मोजके बोलणारा. या शब्दात 'म'ला पहिली वेलांटी व शेवटचे अक्षर षटकोनातील 'ष' असे वापरावे.

कुलाचार
यातील मूळ शब्द 'कुल' आहे. याचा अर्थ आहे कुटुंब. 'कुलाचार' म्हणजे पूर्वपरंपरेने चालत आलेले, रीतिरिवाज. या शब्दात 'क'ला पहिला उकार द्यावा. 'कूलाचार' असे लिहू नये.

कूर्मासन
यातील मूळ शब्द 'कूर्म' आहे. कूर्म म्हणजे कासव. योगासनातील एका प्रकाराला कूर्मासन म्हणतात. या शब्दात 'क'ला दुसरा उकार व 'म'वर रफार द्यावा.

ग्रहणीय
यातील मूळ शब्द 'ग्रहण' असा आहे. ग्रहणाचा अर्थ स्वीकार. 'ग्रहणीय' म्हणजे स्वीकारण्यास योग्य. हे संस्कृत विशेषणआहे. हा शब्द लिहिताना 'ग'ला पृथ्वी चिन्ह न देता - म्हणजे 'गृ' असे न लिहिता 'ग्र' असे लिहावे. 'गृहणीय' असे लिहू नये. 'गृह'चा अर्थ घर असा आहे.

मयूरासन
यातील मूळ शब्द 'मयूर' आहे. या संस्कृत शब्दाचा अर्थ आहे मोर. योगासनातील एका प्रकाराला 'मयूरासन' म्हणतात. हा शब्द लिहिताना मूळ शब्दात 'य'ला जो दुसरा उकार आहे, तो तसाच ठेवावा. 'मयुरासन' असे लिहू नये.

रक्तिमा
यातील मूळ शब्द 'रिक्त आहे. याचा अर्थ अनुराग, रंग. हा शब्द संस्कृत आहे. 'रक्तिमा''चा अर्थ तांबडेपणा. मूळ शब्दाप्रमाणेच या शब्दालाही 'क्त'ला पहिली वेलांटीच द्यावी. 'रक्तीमा' असे लिहिणे चुकीचे आहे.

शुद्धिपत्र
यातील मूळ शब्द 'शुद्धि' आहे व तो संस्कृत आहे. याचा अर्थ आहे निर्दोष, दुरुस्ती, पवित्र. 'शुद्धिपत्र' म्हणजे चुकांच्या दुरुस्तीचे पान. या शब्दात 'श'ला पहिला उकार व 'द' ला 'ध' जोडून पहिली वेलांटी द्यावी.

हीरक महोत्सव
यातील मूळ शब्द 'हीरक' आहे. याचा अर्थ हिरा. हा संस्कृत शब्द आहे. मराठीत हिर्‍याच्या तुकड्याला हिरकणी म्हणतात. व्यक्तीला किंवा संस्थेला ६ वर्षे पुरी झाली असता जो उत्सव करतात, त्याला हीरक महोत्सव म्हणतात. या शब्दात 'ह'ला पहिली वेलांटी देऊ नये.

भ्रमिष्ट
यातील मूळ शब्द भ्रम आहे. भ्रम+इष्ट असा त्याचा संधी आहे. मराठीत नामाला इष्ट हा प्रत्यय लागला असता त्याचे विशेषण तयार होते. संस्कृतमध्ये मात्र इष्ट हा प्रत्यय नाही. यातील मवर पहिली वेलांटी व शेवटचे अक्षर 'ष' ला 'ट' जोडला पाहिजे. 'ठ' लावू नये. भ्रमिष्टचा अर्थ विसंगती, विक्षिप्त, मानसिकदृष्या गोंधळलेला असा आहे.

योगिराज
यातील मूळ शब्द योगिन् असा आहे. हा शब्द तत्सम आहे. मराठीत येताना अंत्य न् चा लोप होतो व उपांत्य अक्षर दीर्घ होते. सामासिक शब्दात हा शब्द पूर्वपदात आला असता तो र्‍हस्व होतो. म्हणून योगिराज हा शब्द लिहिताना गी हे अक्षर र्‍हस्व होते. योगिराज हा शब्द विशेषनाम म्हणूनही वापरला जातो.

लक्ष्मीपुत्र
यातील लक्ष्मी हा शब्द तत्सम (संस्कृत) आहे. तो मुळात दीर्घान्त आहे. त्यामुळे सामासिक शब्दातही तो तसाच वापरावा. मराठीचा नियम अशा शब्दांत वापरू नये. लक्ष्मिपुत्र असा शब्द लिहिणे चुकीचे आहे.

योगिराज
योगिराज हा शब्द योगी या शब्दापासून बनला आहे. योगी म्हणजे योगाचे आचरण करणारा. मूळ संस्कृत शब्द योगिन् असा आहे. मराठीत अंत्याक्षरातील इकार वा उकार दीर्घ लिहिला जात असल्यामुळे हा शब्द योगी असा लिहिला जातो. योगिराज या शब्दात मात्र गवर पहिली वेलांटी, हे लक्षात घ्यावे. ज्ञानयोगी, कर्मयोगी अशा शब्दांत गी हे अक्षर शेवटी असल्यामुळे गवर दुसरी वेलांटी असते.

रवींद्र
रवींद्र हे नाव तुमच्या परिचयाचे आहे. हा शब्द लिहिताना मात्र 'व'वर पहिली वेलांटी द्यायची की दुसरी, असा कदाचित गोंधळ उडू शकेल. हा शब्द अनेकांकडून चुकून 'रविंद्र' असा लिहिला जातो. 'रवि+ इंद्र' अशी 'रवींद्र'ची फोड आहे. दोन्ही शब्दांची र्‍हस्व 'इ' स्वरांचा संधी होऊन दीर्घ 'ई' तयार होतो; म्हणून 'रवींद्र'मधील 'वी' दीर्घ आहे. ही फोड लक्षात घ्यावी.

रहित
रहित म्हणजे रद्द. वर्जित,खेरिज,व्यतिरिक्त या अर्थांनी रहित या शब्दाचा समासात वापर होतो. (उदाहरणार्थ - दु:खविरहित म्हणजे दु:खाखेरीज, द्रव्यरहित म्हणजे द्रव्याखेरीज, जलरहित म्हणजे पाण्याव्यतिरिक्त.) विरहित याही शब्दाचा अर्थ शिवाय, खेरीज असा होतो. रहित व विरहित या दोन्ही शब्दांत हवर पहिली वेलांटी आहे, हे ध्यानात घ्यावे. (रहीत, विरहीत असे लिहिणे चूक.)

रामानुज
रामनुज या शब्दाची फोड 'राम + अनुज' अशी आहे. अनुज हा शब्द संस्कृतमधील आहे. त्याचा अर्थ धाकटा भाऊ. अनुज या शब्दात नला पहिला उकार आहे; पण अनूज असा उच्चार करण्याची चूक होऊ शकते. त्यामुळे रामानुज हा शब्दही चुकून रामानूज असा उच्चारला व लिहिला जाऊ शकतो. त्याबाबत काळजी घ्यावी.

रुपे आणि रूपे
रुपे म्हणजे चांदी. रुपयाचा मूळ अर्थ चांदीचे नाणे. या दोन्ही शब्दांत पहिले अक्षर (रु) र्ह्स्व आहे. रु ऎवजी रू लिहिल्यास रूपे असा वेगळ्या अर्थाचा शब्द तयार होईल. (रूपचे अनेकवचन.) रूप हा शब्द (आकार, लक्षण या अर्थांनी) सर्वपरिचित आहे. त्यावरूनच स्वरूप हा शब्द बनला आहे. अशा रीतीने, उकार बदलल्यास अर्थ बदलू शकतो.

रूढी
रूढि हा संस्कृत शब्द मराठीत वापरला जातो, तेव्हा ढवर दुसरी वेलांटी दिली जाते. (रूढी). यातील रचा उकार मात्र बदलत नाही. चुकून पहिला उकार दिला जाण्याची शक्यता असते. (रुढी); ती चूक टाळावी. रूढी या शब्दाचे अनेक अर्थ आहेत. वहिवाट, शिरस्ता, प्रघात या अर्थांनी हा शब्द प्रामुख्याने वापरला जातो. विभक्ती प्रत्यय लागला, तरी यातील उकार बदलत नाहीत. (उदाहरणार्थ रूढीचा, रूढीला).

शिर-शीर
र्‍हस्वऐवजी दीर्घ उच्चार केल्यास शब्दाचा अर्थ कसा बदलतो हे या उदाहरणावरून दिसून येईल. शिर म्हणजे डोके, शीर म्हणजे रक्तवाहिनी. या शब्दाचा वाक्यात वापर करताना त्या वाक्याचा अर्थ लक्षात घेतल्यास शब्द लिहिताना अडचण येणार नाही.

लघुतम
लघुतम म्हणजे लहानांत लहान. हे विशेषण लघू या विशेषणापासून बनले आहे. (मूळ संस्कृत शब्द लघु.) लघुतममध्ये घला पहिला उकार आहे. हा शब्द चुकून लघुत्तम असा उच्चारला जातो व लिहितानाही ती चूक होऊ शकते. लघु+तम ही फोड लक्षात ठेवावी; म्हणजे या शब्दात तएकदाच आहे, हेही लक्षात राहील. मग लघुत्तम असे लिहिण्याची चूक होणार नाही.

दीर्घ
लांब , दीर्घकाळ टिकणारे, विस्तृत आदी अर्थांनी दीर्घ हे विशेषण वापरले जाते. व्याकरणात दुसरी वेलांटी , दुसरा उकार या अर्थानेही दीर्घ हा शब्द वापरला जातो. या शब्दात द वर दुसरी वेलांटी आहे, हे लक्षात ठेवावे. चुकून पहिली वेलांटी दिली जाण्याची शक्यता असते. दीर्घद्वेषी,दीर्घसूत्री, दीर्घजीवी आदी सामासिक शब्दांतही द वर दुसरी वेलांटी असते. बराच वेळ चालू असणारे या अर्थीही दीर्घ या विशेषणाचा वापर होतो.

षष्ट्यब्दीपूर्ती
वयाला साठ वर्षे होऊन एकसष्टाव्या वर्षात पदार्पण करणे, याला षष्ट्यब्दीपूर्ती म्हणतात. यातील जोडाक्षरे नीट लक्षात ठेवावीत. 'षष्टि+ अब्दी + पूर्ती' अशी या शब्दाची फोड आहे. षष्टि म्हणजे साठ. अब्दी हे अब्द (वर्ष) या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप. 'षष्ट्यब्धिपूर्ती असे लिहिणे चुकीचे आहे. 'अब्धि'चा अर्थ समुद्र असा होतो. 'षष्ठ्यब्दीपूर्ती' हादेखील शब्द चुकीचा अहे. 'षष्ठी'चा अर्थ सहावी तिथी असा होतो.

शिशिर
वसंत ऋतूच्या आधी व हेमंत ऋतूच्या नंतर येणार्‍या ऋतूचे नाव शिशिर. या शब्दातील दोन्हीवर पहिली वेलांटी आहे, हेही लक्षात ठेवायचे. तसे केलेत, म्हणजे हा शब्द 'शिशीर' वा 'शिषिर' असा लिहिला जाण्याची चूक होणार नाही. शिशिर या शब्दाचा अर्थ 'थंड' असा आहे. दव, बर्फ हेदेखील त्याचे अर्थ आहेत.

रूढी
वहिवाट, प्रघात, चाल, शिरस्ता आदी अर्थांनी रूढी हा शब्द वापरला जातो. मूळ संस्कृत शब्दात 'ढ' वर पहिली वेलांटी आहे. वाढ, प्रसार, फैलाव असेही या शब्दाचे अर्थ आहेत. या शब्दात रला दुसरा उकार आहे. सामान्यरूपातही तो बदलत नाही, हे ध्यानात ठेवावे. (उदाहरणार्थ रूढीचे, रूढीनुसार, रूढीला.) अनेक जण सामान्यरूपात रला पहिला उकार देतात; ती चूक टाळावी.

वाङ्मय
वाङ्मय म्हणजे साहित्य. ग्रंथसंपत्ती हादेखील त्याचा एक अर्थ आहे. 'वाक् + मय' अशी या शब्दाची फोड आहे. संधी होऊन 'क्' चा 'ङ्' होतो. हा शब्द 'वांग्मय' असा लिहिणे चुकीचे आहे. उच्चारातील चुकीमुळे लिहिण्यातही तशी चूक होऊ शकते. 'वाङमय' हादेखील चुकीचा शब्द आहे. 'वाङ्मय शब्दात 'ङ् हे अक्षर पाय मोडलेले आहे, हे ध्यानात घ्यावे.

मध्यस्थ
वाद वा भांडण मिटविण्यासाठी जी तिर्हाईत व्यक्ती प्रयत्न करते, तिला मध्यस्थ म्हणतात. पंचाचे काम करणारा , लवाद असेही या शब्दाचे अर्थ आहेत. मध्य + स्थ अशी या शब्दाची फोड आहे. स्थ म्हणजे असणारा. मध्यस्थ जे काम करतो, ती मध्यस्थी. या शब्दांमधील स्थ , स्थी ही जोडाक्षरे लक्षात ठेवावीत. हे शब्द मध्यस्त, मध्यस्तीअसे लिहिणे चुकीचे आहे.

बुभु:कार
वानराच्या ओरडण्याला बुभु:कार म्हणतात. या शब्दात 'ब'ला व 'भ'ला पहिला उकार व या अक्षरापुढे विसर्ग द्यावा. बुभुक्कार, बूभुक्कार असे लिहिणे चुकीचे आहे.

वाहन, वाहतूक
वाहन म्हणजे वाहतुकीचे साधन, हे सर्वांना माहीत आहे. हा शब्द चुकून वहान असा उच्चारला जाण्याची व तसाच लिहिला जाण्याची शक्यता असते. विशेषत: अनेकवचनात वाहने ऎवजी वहाने असे लिहिण्याची चूक होते. वाहतूक हा शब्दही वहातूक असा लिहिण्याची चूक अनेकांकडून होते. वाहतूकमध्ये तू दीर्घ; पण सामान्यरूप होताना तचा उकार बदलू न पहिला होतो. (उदाहरणार्थ - वाहतुकीला, वाहतुकीचे.)

विचलित
विचलित या विशेषणाचा अर्थ अस्थिर असा आहे. विचलन या शब्दापासून हे विशेषण बनले आहे. ठरलेला मार्ग सोडण्याच्या क्रियेला विचलन म्हणतात. चंचलता असाही त्याचा अर्थ आहे. वि+चलित ही विचलित या शब्दाची फोड आहे. वि या उपसर्गाचे अनेक अर्थ आहेत; त्यांतील बदल हा अर्थ येथे अभिप्रेत आहे. या शब्दात लवर पहिली वेलांटी आहे, हे लक्षात घ्यावे. (विचलीत असे लिहिणे चूक.)

सीमोल्लंघन
विजयादशमीला सीमोल्लंघन (सीमा-उल्लंघन) करायचे, ही आपल्याकडील परंपरा. सीमा म्हणजे हद्द, मर्यादा. उल्लंघन करणे म्हणजे ओलांडणे. आपली मर्यादित कक्षा ओलांडून नवीन काही करण्याची सुरवात दसर्‍याच्या मुहूर्तावर करायची असते. त्या अर्थीही हा शब्द आहे. चुकून तो 'सीमोलंघन' असा लिहिला जाण्याची शक्यता असते. या शब्दातील 'उल्लंघन' हा भाग लक्षात ठेवल्यास, ही चूक होणार नाही.

विजिगीषा
विजिगीषा या शब्दाचा अर्थ आहे जिंकण्याची इच्छा. हा मूळ शब्द संस्कृत आहे. मराठीतही तो तसाच वापरला जातो. हा शब्द अनेक वेळा विजिगीषा, विजिगिषा, विजिगीशा अशा अनेक पद्धतीने लिहिलेला आढळतो. या शब्दात व , ज वर पहिली वेलांटी व गवर दुसरी वेलांटी, शिवाय शहामृगातला श न लिहिता षट्कोनातला षलिहावा. विजिगीषू म्हणजे जिंकण्याची इच्छा बाळगणारा.

विदुर
विदुर हे नाव तुम्ही ऎकले असेल. महाभारतातील विदुर प्रसिद्ध आहे. शहाणा, सभ्य, विद्वान असे या शब्दाचे अर्थ आहेत. विदुरमध्ये दला पहिला उकार आहे. हे ध्यानात घ्यावे. चुकून दुसरा उकार दिला गेला, तर अर्थ बदलतो. विदूर (वि+ दूर) या शब्दाचा अर्थ फार दूर असा होतो. हा दुसरा शब्दही लक्षात ठेवलात, तर विदुर हे नाव लिहिताना चूक होणार नाही.

वैध, अवैध
विधी (मूळ संस्कृत शब्द विधि) या शब्दाचे अनेक अर्थ आहेत. धर्मनियम. आज्ञा हेही अर्थ त्यांत आहेत. कायदा या शब्दाला विधी हा प्रतिशब्द म्हणून वापरला जातो. वैध याचा अर्थ कायद्याला धरून असणारे. अवैध हा त्याच्या उलट अर्थाचा शब्द. वैध व अवैध हे शब्द चुकून वैद्य व अवैद्य असे लिहिले जाण्याची शक्यता असते. ही चूक टाळण्यासाठी विधी हा शब्द लक्षात ठेवावा.

विनीत
विनय म्हणजे नम्रता. नीती, नियमन, निग्रह हेदेखील 'विनयचे अर्थ आहेत. विनीत म्हणजे विनयशील. सभ्य, नम्र व्यक्तीचे वर्णन करताना विनीत हा शब्द वापरला जातो. जितेंद्रिय (इंद्रियांवर ताबा असलेला) असाही त्याचा एक अर्थ आहे. 'विनीत'मध्ये 'न'ला दुसरी वेलांटी आहे, हे ध्यानात घ्यावे. हा शब्द चुकून 'विनित' असा लिहिला जाण्याची शक्यता असते; ती टाळावी.

प्रथितयश
विशिष्ट क्षेत्रातील कामगिरीमुळे कीर्ती मिळविलेल्या व्यक्तीचे वर्णन करताना प्रथितयश हे विशेषण वापरले जाते. हा शब्द प्रथित आणि यश या शब्दांपासून बनला आहे. 'प्रथित'चा अर्थ 'जाहीर झालेले' वा 'प्रसिद्ध'. 'प्रथित'चे मधील अक्षर 'थि' आहे; 'ति'नव्हे, हे ध्यानात घ्यावे. प्रथित हा शब्द लक्षात ठेवल्यास, प्रथितयश हा शब्द 'प्रतिथयश' असा लिहिण्याची चूक होणार नाही.

प्रथितयश
विशिष्ट क्षेत्रातील कामगिरीमुळे कीर्ती मिळविलेल्या व्यक्तीचे वर्णन करताना प्रथितयश हे विशेषण वापरले जाते. हा शब्द प्रथित आणि यश या शब्दांपासून बनला आहे. प्रथितचा अर्थ जाहीर झालेले वा प्रसिद्ध . प्रथितमधील अक्षर थि आहे ति नव्हे, हे ध्यानात घ्यावे. प्रथित हा शब्द लक्षात ठेवल्यास, प्रथितयश हा शब्द 'प्रतिथयश' असा लिहिण्याची चूक होणार नाही.

विश्लेषण
विश्लेषण म्हणजे पृथक्करण, चिकित्सा. हा शब्द विश्लेष या शब्दापासून बनला आहे. वेगळे करणे हा जसा विश्लेषचा अर्थ आहे, तसाच वियोग हादेखील एक अर्थ आहे. गणितातील वजाबाकीलाही, संस्कृतमध्ये विश्लेष म्हणतात. विश्लेषण या शब्दातील जोडाक्षर नीट लक्षात ठेवावे. हा शब्द विश्लेशण असे लिहिणे चूक आहे. तिसरे अक्षर श नसून ष आहे.

मत्स्यावतार
विष्णूने घेतलेल्या दहा अवतारांपैकी मत्स्यावतार हा पहिला अवतार आहे. मत्स्य म्हणजे मासा. य शब्दात 'त','स' व 'य' जोडूनच लिहावे लागतात. 'मत् स्यावतार' असे 'त' चा पाय मोडून लिहू नये.

विस्तीर्ण
विस्तीर्ण म्हणजे विशाल. विस्तार या शब्दाशी याचा संबंध आहे. वाढ, फैलाव, रुंदी हे विस्तार या शब्दाचे अर्थ आहेत. विस्तीर्ण या शब्दात स्तवर दुसरी वेलांटी आहे, हे ध्यानात घ्यावे. चुकून पहिली वेलांटी दिली जाण्याची (विस्तिर्ण) शक्यता असते. विस्तृत याही शब्दाचा अर्थ विस्तीर्ण असा होतो. तो शब्द 'विस्रुत' असा लिहिणे चुकीचे आहे. सविस्तर हाही विस्तृतचा एक अर्थ आहे.

विहित
विहित या शब्दाचे अनेक अर्थ आहेत. ठेवलेले, निर्माण केलेले, ठरविलेले, शास्त्रोक्त,योग्य आदींचा त्यांत समावेश आहे. विहित कर्म (अभिप्रेत असलेले काम) असा उल्लेख केला जातो. अर्ज विहित नमुन्यात करावेतअसा जाहिरतींमध्ये उल्लेख असतो. विहित या शब्दात ह वर पहिली वेलांटी आहे; त्याऎवजी दुसरी वेलांटी देण्याची चूक (विहीत) होऊ शकते; ती टाळावी.

शिर आणि शीर
वेलांटी बदलली, की अर्थ कसा बदलतो, याचे एक उदाहरण म्हणजे शिर आणि शीर हे शब्द. शिरचा अर्थ डोके; तर शीरचा अर्थ रक्तवाहिनी. अर्थ लक्षात घेतलात, तर वेलांटीबाबत चूक होणार नाही. पानातील शीर असे आपल्याला म्हणायचे असते, तेव्हांही 'श'वर दुसरी वेलांटी. शीरच्या सामान्यरूपात (उदा. - शिरेत, शिरेला) मात्र 'श'वर पहिलीच वेलांटी द्यायची.

वैचित्र्य
वैचित्र्य म्हणजे विलक्षणपणा, विस्मयकारिता, विविधता. हा शब्द विचित्र या शब्दापासून बनला आहे. विलक्षण, तर्‍हेवाईक, अनेकविध, आश्चर्यकारक या अर्थांनी विचित्र हा शब्द वापरला जातो. वैचित्र्य या शब्दातील जोडाक्षर लक्षात ठेवावे. हा शब्द वैचित्र असा उच्चारण्याची चूक होऊ शकते व लिहितानाही ती होण्याची शक्यता असते. वैचित्र्यपासून स्वभाववैचित्र्य, रंगवैचित्र्य आदी सामासिक शब्द बनले आहेत.

वैशिष्ट्य
वैशिष्ट्य म्हणजे विशेषता किंवा निराळेपणा. विशेष या शब्दावरून हा शब्द बनला आहे. असामान्य गुण हा जसा विशेषचा अर्थ आहे, तसाच विवक्षित प्रमाणापेक्षा अधिक असाही एक अर्थ आहे. वैशिष्ट्यमधील जोडाक्षर नीट लक्षात ठेवावे. ते ष्ठ्य(ष + ठ + य) असे लिहिले जाण्याची चूक होऊ शकते; ती टाळावी. ते जोडाक्षर खरे असे पाहिजे (ष + ट + य). वैशेष्य याही शब्दाचा अर्थ निराळेपणा असा आहे. अलौकिकत्व , अत्युच्चता असेही वैशिष्ट्यचे अर्थ आहेत.

व्यंगचित्र
व्यंग म्हणजे उणेपणा, न्यून. थोड्याशा रेषांनी मूळ वस्तूचे विनोदी वैशिष्ट्य दाखविणारे चित्र म्हणजे व्यंगचित्र. हा शब्द व्यंग्यचित्र असा लिहू नये. व्यंग्यचा अर्थ सुचवलिे ला, गर्भित अर्थ असा आहे.

व्यावसायिक
व्यावसायिक हा शब्द व्यवसाय या शब्दापासून बनला आहे. व्यवसाय म्हणजे पेशा. (उदाहरणार्थ - दुग्ध व्यवसाय, कृषिव्यवसाय, अध्यापन व्यवसाय इत्यादी.) धंदा असाही या शब्दाचा अर्थ आहे. व्यावसायिक हे विशेषण आहे. व्यवसायाविषयीचे असा त्याचा एक अर्थ; त्याचप्रमाणे व्यवसाय करणारा असाही एक अर्थ आहे. व्यावसायिक हा शब्द चुकून व्यवसायिक वा व्यावसाइक असा लिहिला जाऊ शकतो; तसे न लिहिण्याची काळजी घ्यावी.

शत्रुघ्न
शत्रुघ्न हे नाव आपल्याला माहीत आहे. प्रभू रामचंद्रांच्या एका भावाचे नाव शत्रुघ्न होते. शत्रु + घ्न अशी या शब्दाची फोड आहे. घ्न या विशेषणाचा अर्थ 'ठार करणारा'. शत्रुघ्न म्हणजे शत्रूला ठार करणारा; शत्रूचा नाश करणारा. हा शब्द काही जण शत्रुघन असा उच्चारीत असले, तरी मूळ शब्द तसा नाही, हे ध्यानात ठेवावे. शत्रुघ्न असाच तो लिहिण्याची काळजी घ्यावी.

शारीरिक
शरीर या शब्दाचा अर्थ आपणा सर्वांना माहीत आहेच. यातील दुसर्‍या अक्षरावर दुसरी वेलांटी आहे. सामान्यरूप झाले, तरी तीत बदल होत नाही. (उदा. - शरीराचे, शरीराला) शरीरासंबंधीचे, ते शारीरिक. या शब्दातील दुसर्‍या व तिसर्‍या अक्षरांच्या वेलांट्यांची अदलाबदल होऊन 'शारिरीक' असा चुकीचा शब्द लिहिला जातो. शरीर हा शब्द शुद्ध स्वरुपात लक्षात राहिला, की शारीरिक शब्दही बरोबर लिहीला जाईल.

सुज्ञ
शहाण्या, समंजस माणसाचे वर्णन करताना सुज्ञ हे विशेषण वापरले जाते. हा शब्द 'सु' आणि 'ज्ञ' या शब्दापासून बनला आहे. 'सु' म्हणजे चांगला आणि 'ज्ञ' म्हणजे जाणता, ज्ञानी. सुज्ञ हा शब्द अनेक जण 'सूज्ञ' असा उच्चारतात व लिहितानाही ती चूक होते. शब्दाची फोड लक्षात ठेवलीत, की 'सु' र्‍हस्व, हे लक्षात राहील व शब्द बरोबर लिहिला जाईल.

शालिनी
शालिनी म्हणजे शोभणारी (स्त्री). हे संस्कृत विशेषण विशेषनाम म्हणून वापरले जाते. हे एका वृत्ताचेही नाव आहे. याच्या एका चरणात ११ अक्षरे आणि म, त हे गण असून शेवटी दोन गुरू अक्षरे असतात. हा शब्द लिहिताना लला पहिली वेलांटी द्यावी.

बहि:स्थ
शाळा वा महाविद्यालय यांत न जाता बाहेरून परीक्षेला बसणार्यांना बहि:स्थ विद्यार्थी म्हणतात. बहिस् + स्थ अशी बहि:स्थ या शब्दाची फोड आहे. संधी होऊन बहिस् मधील स् या व्यंजनाच्या जागी विसर्ग येतो. हा शब्द बहिस्थ असा लिहिला जाण्याची चूक होऊ शकते; ती टाळावी. बाहेर, बाहेरून हे बहिस्चे अर्थ आहेत. स्थ याचे अर्थ असणारा , राहणारा इत्यादी आहेत. इंग्रजीत बहि:स्थला एक्स्टर्नल म्हणतात.

शिथिल
शिथिल या विशेषणाचा अर्थ ढिले , सैल, असा आहे. दमलेले, अर्धवट केलेले, गैरसावध, असेही त्याचे अर्थ आहेत. या शब्दातील पहिल्या दोन्ही अक्षरांवर पहिली वेलांटी आहे. दुसर्‍या अक्षराच्या बाबतीत ती चुकून दुसरी दिली जाण्याची ('शिथील) शक्यता असते. शैथिल्य हा शब्द 'शिथिलवरुनच बनला आहे. शैथिल्य म्हणजे ढिलेपणा. दुर्लक्ष वा आळस याही अर्थी शैथिल्य हा शब्द वापरला जातो.

शीला आणि शिला
शीला हे स्त्रीलिंगी विशेषनाम प्रसिद्ध आहे. सुस्वभावी , सद्वर्तनी हा त्याचा अर्थ. शिला असा त्याचा सदोष उच्चार अनेक जण करतात. तो शब्द तसा लिहिण्याचीही चूक होते. शिला या शब्दाचा अर्थ दगड असा होतो. (या संस्कृत शब्दावरूनच शिळा हा मराठीतील शब्द तयार झाला आहे). अशा रीतीने र्‍हस्व-दीर्घाबाबतच्या चुकीमुळे अनर्थ होऊ शकतो. सुशीला हे नावही शीला या अर्थीच वापरले जाते. ते सुशिला असे लिहिल्यास अनर्थ होईल.

शुद्ध
शुद्ध हा शब्द शुद् ध असाही लिहिला जातो. तो 'शुध्द' असा लिहिणे मात्र चुकीचे आहे. 'शुध् द' हेही चुकीचे. 'शुद्ध'मध्ये आधी 'द् 'आणि नंतर 'ध' आहे. त्यामुळे अखंड जोडाक्षर लिहिताना 'द'च्या पोटात 'ध'चा उभ्या रेघेव्यतिरिक्त भाग बसवायचा; तो रेघेला भिडवायचा नाही. बुद्धी, युद्ध, श्रद्धा, अनिरुद्ध, प्रसिद्ध, बुद्ध, अशा अनेक शब्दांबाबत, तसेच 'सुद्धा' या शब्दयोगी अव्ययाबाबत ही दक्षता घ्यावी.

मुहूर्त
शुभ कार्याची सुरवात करण्यासाठी निश्चित केलेली शुभ वेळ, हा मुहूर्त या शब्दाचा अर्थ आहे. कार्याची सुरवात याही अर्थी तो वापरला जातो. (उदाहरणार्थ - अमक्या कामाचा मुहूर्त केला.) या शब्दात म ला पहिला उकार व हला दुसरा उकार आहे, हे लक्षात ठेवावे. (मूहूर्त, मुहुर्त, मूहुर्त असे लिहिणे चूक.) सामान्यरूपातही हे उकार बदलत नाहीत. (उदाहरणार्थ - मुहूर्तावर, मुहूर्ताला.)

शुश्रूषा
शुश्रूषा हा शब्द सेवा या अर्थी वापरला जातो. रुग्ण्सेवा या अर्थी तो विशेष रूढ आहे. मूळ संस्कृतमधील शब्दाच्या अर्थामध्ये देण्याची इच्छा , उपासना यांचाही समावेश आहे. शुश्रूषा या शब्दातील पहिला श शहामृगातील व शेवटचा ष षट्कोनातील, हे ध्यानात घ्यावे. श्रला दुसरा उकार आहे. चुकून तो पहिला दिला जाण्याची (शुश्रुषा) शक्यता असते. इंग्रजीतील नर्सिंग होमला मराठीत शुश्रूषागृह म्हणतात.

शून्य
शून्य या शब्दाचे अनेक अर्थ आहेत. त्यांत अभाव, पोकळी, उजाड, बधिर आदींचा समावेश आहे. या शब्दात शला दुसरा उकार आहे. सामान्यरूपात तो बदलत नाही. (उदाहरणार्थ - शून्याचे, शून्यावर.) सामासिक शब्दांतही हा उकार कायम राहतो. (उदाहरणार्थ - शून्यचित्त, शून्याकार, शून्याधारित).

शेषशायी
शेषशायी (मूळ शब्द शेषशायिन् ) हे भगवान विष्णूंचे एक नाव. या शब्दातील शेवटचे अक्षर नीट लक्षात ठेवावे; म्हणजे तो शेषशाही व शेषशाई असे लिहिण्याची चूक होणार नाही. शेष या नागावर भगवान विष्णू पहुडले आहेत, असे चित्र तुम्ही पाहिले असेल. शेषशायी शब्दातून तेच वर्णन केलेले आहे. या शब्दातील पहिला श शहामृगातला आणि दुसरा ष षट्कोनातला, हेही लक्षात ठेवावे.

शोषण
शोषण म्हणजे शोषून घेण्याची क्रिया. शोषणे म्हणजे शोषून घेणे, सुकविणे. एखाद्याला पिळू न काढणे, त्याचे सर्वस्व हिरावून घेणे याही अर्थांनी हा शब्द वापरला जातो. ज्याचे शोषण केले गेले आहे, तो शोषित. या सर्व शब्दांत प्रथम शहामृगातील श आणि नंतर षट्कोनातील ष आहे, हे ध्यानात घ्यावे. या दोन अक्षरांच्या बाबतीत गल्लत होण्याची शक्यता असते.

श्वासोच्छ्वास
श्वसनाच्या क्रियेला श्वासोच्छ्वास असे म्हणतात. 'श्वास + उच्छ्वास' अशी या शब्दाची फोड आहे. उच्छ्वास या शब्दात श्वास घेण्याच्या उलट क्रिया (श्वास सोडणे) अभिप्रेत आहे. उच्छ्वास हा शब्द चुकून 'उछ्वास' असा लिहिला हाण्याची शक्यता असते. त्यामुळे श्वासोच्छ्वास हा शब्दही 'श्वासोछ्वास' असा लिहिण्याची चूक होऊ शकते; ती टाळावी. या शब्दात 'च्छ या जोडाक्षराचा पाय मोडलेला आहे, हेही ध्यानात घ्यावे.

कूपमंडूक
संकुचित विचाराच्या व्यक्तीला कूपमंडूक म्हटले जाते. 'कूप + मंडूक' अशी या शब्दाची फोड आहे. कूप या शब्दाचा अर्थ विहीर. मंडूक म्हणजे बेडूक. बेडूक जेथे राहतो, ती विहीर वा डबके हेच त्याचे जग असते. त्याप्रमाणे स्वत:पुरत्या अतिमर्यादित क्षेत्राखेरिज जे अन्य विचार करीत नाहीत, त्यांचे वर्णन कूपमंडूक या शब्दात केले जाते. या शब्दात 'क' आणि 'ड' या दोन्ही अक्षरांना दुसरा उकार आहे.

सक्रिय
सक्रिय म्हणजे क्रियेसहित. 'स + क्रिय' अशी या शब्दाची फोड आहे. 'स' या अव्ययाचा अर्थ सहित असा आहे. व्यक्तीच्या बाबतीत सक्रिय हे विशेषण वापरले जाते, तेव्हा क्रियाशील असा त्याचा अर्थ होतो. 'सक्रिय'मध्ये 'क्र'वर पहिली वेलांटी आहे. चुकून दुसरी वेलांटी दिली जाण्याची शक्यता असते; 'निष्क्रिय' हा 'सक्रिय'च्या उलट अर्थाचा शब्द; मात्र 'संन्यासी' असाही त्याचा एक अर्थ आहे.

संचालनालय
संचालनालय हा शब्द सरकारी कामकाजासंदर्भात अनेकदा वाचनात येतो. संचालन + आलय अशी त्याची फोड आहे. संस्था, उद्योग, सरकारी खाते आदींचा कारभार चालविण्याची क्रिया, या अर्थी संचालन हा शब्द वापरला जातो. आलय महणजे स्थान वा घर. संचालनाचे काम जेथून चालते, ते संचालनालय. हा शब्द संचलनालय असा लिहिणे चुकीचे आहे. संचालन व संचलन या शब्दांतील फरक लक्षात घ्यावा. पोलिस, सैनिक आदींची परेड म्हणजे संचलन.

सचिव
सचिव या मूळच्या संस्कृत शब्दाचे अनेक अर्थ आहेत. त्यांत प्रधान, मंत्री, सल्लागार, सहचर आदीचा समावेश आहे. सध्या सचिव हा शब्द विशिष्ट अधिकारपदासाठी वापरला जातो. इंग्रजी भाषेत सेक्रेटरी हा शब्द ज्या पदासाठी वापरतात, त्याच अर्थी मराठीत हा शब्द वापरला जातो. या शब्दात च वर पहिली वेलांटी आहे, हे लक्षात घ्यावे. (सचीव असे लिहिणे चूक).

सडीक
सडणे या धातूस 'ईक' हा मराठी प्रत्यय लागून 'सडीक' हे विशेषण तयार होते. प्रत्ययच दीर्घ असल्यामुळे विशेष्ण शब्दातील वेलांटी दीर्घच असते.

अखंडित
सतत चालू असलेल्या क्रियेचे वर्णन करण्यासाठी अखंडित हे विशेषण वापरले जाते. अखंडित हा शब्द खंडितच्या उलट अर्थी आहे. खंडित म्हणजे तुकडे झालेले. खंड म्हणजे तुकडा. खंडित, खंड या शब्दांचा उगम खंड् या संस्कृत धातूत आहे. तोडणे, फोडणे, नाश करणे, हे या धातूचे अर्थ. खंडित व अखंडित या दोन्ही शब्दांत डवर पहिली वेलांटी आहे. (खंडीत,अखंडीत असे लिहिणे चूक.)

सदसद्विवेक
सदसद्विवेक म्हणजे सारासार विचार; चांगले काय व वाईट काय, हे जाणणे. (यावरूनच सदसद्विवेकबुद्धी हा शब्द बनला). हा शब्द चुकून सद्सद्विवेक असा लिहिला जातो. सत् + असत् + विवेक ही सदसद्विवेकची फोड. यात जे संधी होतात, त्यांमुळे त चा द होतो. पहिला द पूर्ण आहे आणि दुसरा द अर्धा (पाय मोडलेला )आहे हे ध्यानात घेतले, की चूक होणार नाही.

सद्गुण
सद्गुण म्हणजे चांगला गुण. सत् + गुण अशी या शब्दाची फोड आहे. सत् या विशेषणाचा अर्थ चांगला . गुण या शब्दाचा एक अर्थ मूळधर्म असा आहे. सत् आणि गुण हे शब्द एकापुढे एक आल्यावर संधी होऊन सत्मधील त्चा द् होतो. त्यामुळे सत्गुण असे लिहिणे चुकीचे आहे. गुण या शब्दात गला पहिला उकार असतो. (सद्गूण असे लिहिणे चूक.)

संन्यासी
संन्यास या शब्दावरून संन्यासी हा शब्द बनला आहे. संन्यास हे प्राचीन परंपरेतील चौथ्या आश्रमाचे नाव आहे. संन्यास या शब्दाचा अर्थ त्याग. संन्यासी म्हणजे त्याग करणारा;तपस्वी;अन्न वर्ज्य करणारा. या शब्दात सवर अनुस्वार आहे. (सन्यासी असे लिहिणे चूक.) हा शब्द संन्याशी असाही लिहिण्याची चूक होऊ शकते; ती टाळावी. त्याच्या सामान्यरूपात मात्र सचा श होतो. (उदाहरणार्थ - संन्याशाचे, संन्याशाने, संन्याशाला.)

शिष्टाई
समजुतीच्या चार गोष्टी सांगून तंटा मिटविण्याकरिता केलेली मध्यस्थी जी असते, तिला शिष्टाई म्हणतात. हा शब्द लिहिताना 'श' व 'ष' या अक्षरांचा घोटाळा होऊ शकतो. पहिले अक्षर शहामृगातले 'श' व दुसर षट्कोनातला 'ष' आहे, हे लक्षात ठेवावे. तसेच 'ष' ला 'ठ' न जोडता 'ट' जोडावा.

उद्ध्वस्त
समूळ नष्ट झालेले, वाताहत झालेले, या अर्थी उद्ध्वस्त हे विशेषण वापरले जाते. 'उत् + ध्वस्त' अशी या शब्दाची फोड आहे. संधी होऊन 'उत्' मधील 'त्'चा 'द्' होतो. ध्वस्त म्हणजे नष्ट. 'उत्' या अव्ययाचा 'अत्यंत' हा अर्थ येथे अभिप्रेत आहे. उद्ध्वस्त हा शब्द अनेक जण चुकून 'उध्वस्त' असा लिहितात. शब्दाची फोड व संधी लक्षात घेतला, तर ही चूक होणार नाही.

ऋजू
सरळ स्वभाव असलेला, प्रामाणिक, साधा-भोळा हे ऋजू या विशेषणाचे अर्थ आहेत. (संस्कृत शब्द ऋजु. मराठीत अंत्याक्षराचा इकार वा उकार दीर्घ असल्यामुळे हा शब्द ऋजू असा लिहायचा.) ऋचा उच्चार अनेक जण चुकून रु असा करतात. त्यामुळे हा शब्द रुजू असा लिहिण्याची चूक होऊ शकते; ती टाळावी. ऋजुता म्हणजे प्रामाणिकपना, सरळपणा. ऋजुतामध्ये जु र्‍हस्व आहे, हे ध्यानात ठेवावे.

सरस्वतीवीणा
सरस्वतीवीणा हे दाक्षिणात्य संगीतातील एका वाद्याचे नाव आहे. वीणेचा तो एक प्रकार आहे. हा शब्द लिहिताना सरस्वतिवीणा किंवा सरस्वतिविणा अशा चुका होऊ शकतात; त्या टाळाव्यात. सरस्वती या शब्दाटील ती दीर्घ आहे; तसेच वीणा या शब्दातील वी दीर्घ आहे. सामान्यरूपातही तो दीर्घच राहतो. सरस्वतीवीणेवर, सरस्वतीवीणेचे अशा शब्दांच्या बाबतीत ही काळजी घ्यावी. सरस्वतीवंदना, सरस्वतीपूजन अशाही शब्दांत ती दीर्घ, हे लक्षात ठेवावे.

सर्वेक्षण
सर्वेक्षण हा शब्द तुमच्या वाचनात आला असेल. सर्व्हे या इंग्रजी नामाचा जो अर्थ, तोच सर्वेक्षण या नामाचा आहे. हा शब्द 'सर्व्हे' वरून तयार झाला नसून 'सर्व+ईक्षण' अशी त्याची फोड आहे. ईक्षण म्हणजे पाहणी. एखाद्या प्रकल्पासंदर्भात विशिष्ट क्षेत्राची पाहणी, एखाद्या समूहाचे विस्ताराने निरीक्षण, जनमताची पाहणी, जमीनमोजणी आदी अर्थांनी सर्वेक्षण हा शब्द वापरला जातो. तो सर्व्हेक्षणअसा लिहिणे चुकीचे आहे.


पीठासीन
संसदेत, विधिमडळात अथवा संस्थांच्या सभांमध्ये अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळणार्या अधिकार्यांना पीठासीन अधिकारी म्हणतात. पीठासीन या शब्दाची फोड पीठ + आसीन अशी आहे. पीठ म्हणजे आसन, खुर्ची. पीठासीन या शब्दात पीठ म्हणजे अध्यक्षीय खुर्ची असे अभिप्रेत आहे. आसीन याचा अर्थ बसलेला. पीठासीन हा शब्द पीठासन असा लिहिणे चुकीचे आहे. या शब्दात पवर दुसरी वेलांटी आहे, हे ध्यानात ठेवावे.

अधिदैवत
संस्कृत उपसर्ग लागून काही शब्द तयार झाले आहेत. या शब्दांत 'अधि' हा उपसर्ग आहे. याचा अर्थ आहे मुख्य, श्रेष्ठ. 'अधिदैवत' म्हणजे मुख्य दैवत. या शब्दात मूळ शब्दाप्रमाणे 'ध'ला पहिली वेलांटीच द्यावी. अधीदैवत, आधिदैवत असे लिहू नये.

स्फुट
संस्कृत भाषेतील स्फुट् या धातूपासून स्फुट हा शब्द बनला आहे. फुटलेले, विकसित, स्पष्ट, स्वच्छ, दृग्गोचर, उघड, फुटकळ असे त्याचे अर्थ आहेत. वृत्तपत्रात अग्रलेखाच्या धर्तीवरील, पण अग्रलेखाखेरीज जे संपादकीय लेखन असते, त्यालाही स्फुट म्हणतात. या शब्दात 'स्फ'ला पहिला उकार आहे, हे ध्यानात घ्यावे. ('स्फूट' असे लिहिणे चूक.) अस्फुट या शब्दाचे अर्थ अस्पष्ट, अदृश्य असे आहेत.

पूजनीय
संस्कृतातील 'अनीय' हा प्रत्यय लागून विशेषण शब्द तयार होतो. अनीय हा प्रत्ययच मुळात दीर्घ असल्यामुळे यापासून तयार झालेले शब्दही दीर्घ असतात. पूजनीय या शब्दात 'प' ला दुसरा उकार व 'न'ला दुसरी वेलांटी द्यावी.

सामासिक शब्द
संस्कृतातून मराठीत आलेल्या शब्दांप्रमाणेच फारसी भाषेतील उपसर्ग प्रारंभी येऊन अव्ययीभाव समासाची उदाहरणे मराठीत आढळतात. मराठीतले सामासिक शब्द जसे जोडूनच लिहावेत त्याचप्रमाणे पुढील शब्दही जोडूनच लिहावेत. उदा. दररोज, बिनशर्त, गैरशिस्त, गैरहजर, बेमालूम, बरहुकूम.

सूची
संस्कृमधील सूच् या धातूचे अर्थ सुचविणे, कळविणे, छिद्र पाडणे असे आहेत. त्यावरून सूचि, सूचना हे शब्द तयार झाले आहेत. सूची या शब्दाचा अर्थ सुई असा होतो; त्याचप्रमाणे विषयवार यादी असाही होतो. उदा. ग्रंथसूची, संदर्भसूची. या शब्दात सला दुसरा उकार आहे. (सुची असे लिहिणे चूक.) सूचित करणे म्हणजे दर्शविणे, कल्पना देणे. सुचित शब्दात च वर पहिली वेलांटी हे लक्षात ठेवावे.

सहस्र
सहस्र म्हणजे हजार. आपल्या सर्वांच्या परिचयाचा हा शब्द. त्याचा उच्चार सहस्त्र असा केला जाण्याची शक्यता असते आणि लिहितानाही ती चूक होते. शस्त्र, अस्त्र या शब्दात स्त्र (स + त + र) हे जोडाक्षर आहे; तर सहस्र या शब्दात स्र (स ला र) हे जोडाक्षर आहे. सहस्र मध्ये त कोठेही नाही, हे लक्षात घ्यावे. सहस्रवरूनच सहस्रक हा शब्द बनला आहे. सहस्रक म्हणजे हजाराचा समूह. हजार वर्षांचा समूह, या अर्थी तो अलीकडे बर्याच ठिकाणी तुम्ही वाचला असेल.

सहानुभूती
सहानुभूती हा शब्द तुम्ही अनेकदा ऎकला वा वाचला असेल. सह + अनुभूती अशी याची फोड आहे.(संस्कृत शब्द 'अनुभूति'. मराठी शुद्धलेखनानुसार अंत्याक्षर दीर्घ, म्हणून अनुभूती) दु:खित व्यक्तीच्या दु:खाची जाणीव होणे, म्हणजे त्याच्याविषयीची सहानुभूती. या शब्दात न ला पहिला उकार आणि भला दुसरा उकार आहे. सहानभुती वा सहानुभुती अशा रीतीने हा शब्द लिहिणे चुकीचे आहे.

सह्याद्री
सह्याद्री हा शब्द तुमच्या परिचयाचा आहे. 'सह्य + अद्रि' अशी याची फोड आहे. अद्रिया संस्कृत शब्दाचा अर्थ पर्वत. सह्य हे पर्वताचे नाव. मराठी शुद्धलेखनाच्या नियमानुसार अंत्याक्षर दिर्घ ; म्हणून 'सह्याद्रि' हा शब्द मराठीत 'सह्याद्री' असा लिहायचा. 'सह्याद्री' पर्वत असे लिहिण्यात द्विरुक्ती होते; म्हणून 'सह्य पर्वत' असे तरी लिहावे अथवा सह्याद्री हा एकच शब्द वापरावा.

वधूपरीक्षा
सामासिक शब्दातील पहिले पद इकारान्त किंवा उकारान्त (तत्सम) असेल, तर त्यात बदल करू नये. या शब्दातील वधू शब्द दीर्घ आहे. तो सामासिक शब्दातही दीर्घच लिहावा. या शब्दातील परीक्षा शब्दही दीर्घच लिहावा. वधुपरिक्षा असे लिहू नये.

सामूहिक
सामूहिक हे विशेषण समूह या शब्दापासून बनले आहे. जमाव, समुदाय, कळप हे समूहचे अर्थ आहेत. समूह या शब्दात मला दुसरा उकार असतो. सामूहिक या शब्दातही मला दुसरा उकार असतो. त्यात हवर पहिली वेलांटी असते. हा शब्द सामुहिक वा सामूहीक असा लिहिणे चुकीचे आहे. सामुहीक असाही तो लिहिण्याची चूक होऊ शकते. समूहाचे वा समूहाविषयीचे हे सामूहिकचे अर्थ आहेत.

सीमित
सीमित हा शब्द सीमा या शब्दापासून बनला आहे. मर्यादा , हद्द हे सीमा या शब्दाचे अर्थ आपल्याला परिचित आहेत. सीमित म्हणजे मर्यादित. तो शब्द सिमित, सीमीत वा सिमीत असा लिहिणे चुकीचे आहे. सीमा या शब्दात सवर दुसरी वेलांटी आहे, हे लक्षात ठेवले, की सीमित या शब्दातील पहिल्या अक्षराच्या बाबतीत चूक होणार नाही. मवर पहिली वेलांटी, हेही लक्षात ठेवावे.

सुकर
सुकर हा शब्द संस्कृत विशेषण आहे. याचा अर्थ आहे करण्यास सोपे, सहज. 'सु' हा संस्कृतातला उपसर्ग आहे. या उपसर्गापासून हा शब्द बनला आहे. या शब्दात 'स'ला पहिला उकार द्यावा.

सुधा-सुधाकर
सुधा म्हणजे अमृत, फुलांमधील मध, योग्य मार्गाने जाणारा. सुधाकर म्हणजे चंद्र. हे दोन्ही शब्द संस्कृत आहेत. या दोन्ही शब्दांत सला पहिला उकार द्यावा. हे दोन्ही शब्द विशेषनाम म्हणून वापरतात.

साहजिक
सुलभ, सहज साधणारे या अर्थी साहजिक हे विशेषण वापरले जाते. ते क्रियाविशेषण म्हणून वापरले, तर सहजरीत्या असा अर्थ होतो. साहजिक हा शब्द सहज या शब्दावरून बनला आहे. सुलभ, स्वाभाविक, जन्मजात , निसर्गसिद्ध असे सहजचे अर्थ आहेत. साहजिक या शब्दातील पहिली दोन अक्षरे नीट ध्यानात घ्यावीत. हा शब्द सहाजिक लिहिणे चुकीचे आहे. जवर पहिली वेलांटी आहे, हेही लक्षात ठेवावे.

सुषिर
सुषिर हा संस्कृतमधून आलेला शब्द. सुषि या शब्दापासून तो तयार झाला आहे. छिद्र, नळी हे सुषि या शब्दाचे अर्थ आहेत. सुषिर या विशेषणाचे अर्थ छिद्रमय, पोकळ असे आहेत. बासरी, सनई, क्लॅ रोनेट आदी वाद्यांना सुषिर वाद्ये म्हणतात. सुषिर या शब्दात ष षट्कोनातील आहे व त्यावर पहिली वेलांटी आहे, हे ध्यानात घ्यावे. (सुशिर, सुषीर असे लिहिणे चूक.)

सूत आणि सुत
सूत (धागा) या शब्दाचे मूळ सूत्र या संस्कृत शब्दात आहे. सूत या संस्कृतमधून आलेल्या शब्दाचा अर्थ मात्र सारथी असा होतो. सुतार, स्तुतिपाठक, पुराणिक असेही त्यांचे अन्य अर्थ आहेत. सुत हा देखील संस्कृतमधून आलेला शब्द. त्याचा अर्थ पुत्र असा आहे. कवी केशवसुत (कृष्णाजी केशव दामले) प्रसिद्धच आहेत. तेथे सला पहिला उकार, हे लक्षात ठेवायचे.

सेंद्रिय
सेंद्रिय हा शब्द इंद्रिय या शब्दापासून तयार झाला आहे. 'स + इंद्रिय' अशी त्याची फोड आहे. इंग्रजी भाषेतील 'ऑरगॅनिकला' हा प्रतिशब्द आहे. सेंद्रिय खते हा शब्द तुमच्या वाचनात आला असेल. शरीराचा अवयव, ज्ञान प्राप्त करून घेण्याचे वा कर्म करण्याचे साधन हे इंद्रिय या शब्दाचे अर्थ आहेत. इंद्रिय व सेंद्रिय या दोन्ही शब्दांत 'द्र'वर पहिली वेलांटी आहे. (सेंद्रीय असे लिहिणे चूक.)

खुशमस्कर्‍या
स्तुतिपाठक वा तोंडपुज्या माणसाला खुशमस्कर्‍या म्हणतात. हा शब्द दोन शब्दांपासून बनला आहे. त्यांपैकी खुश हा शब्द फारसी आहे. त्याचा अर्थ आनंदी, संतुष्ट, तृप्त.(मराठीत हा शब्द खूश वाखूष असा लिहितात; पण खुशमस्कर्‍यामध्ये खला पहिला उकार आहे). मस्करी (थट्टा) या शब्दापासून मस्कर्‍या हा शब्द बनला आहे. मस्करी शब्दाचे मूळ अरबी भाषेत आहे. खुशमस्कर्‍या शब्दातील श शहामृगातील आहे, हे लक्षात घ्यावे.

निर्भीड
स्पष्टवक्त्या व्यक्तीचे वर्णन करताना निर्भीड हे विशेषण वापरले जाते. निर् +भीड अशी या शब्दाची फोड आहे. निर् हा उपसर्ग नकारार्थी वापरला जातो. भीड या शब्दाचे अनेक अर्थ आहेत. भीती, संकोच यांचा त्यांत समावेश आहे. निर्भीड हा शब्द चुकून निर्भिड असा लिहिला जाण्याची शक्यता असते. ही चूक टाळण्यासाठी या शब्दाची फोड लक्षात ठेवावी.

अंकुश
हत्तीला ताब्यात ठेवण्यासाठी जे हत्यार माहुताकडे असते, त्याला अंकुश म्हणतात. ते एका बाजूला आकडीसारखे वळविलेले असते. अमुक व्यक्तीवर अंकुश ठेवणे म्हणजे त्या व्यक्तीवर नियंत्रण ठेवणे. निरंकुश या शब्दाचे अर्थ स्वच्छंदी,अनियंत्रित, स्वैर असे आहेत. अंकुश व निरंकुश या दोन्ही शब्दात क ला पहिला उकार आहे. तो दुसरा देण्याची चूक होऊ शकते; ती टाळावी.

हरिकीर्तन
हरिकीर्तन हा सामासिक शब्द आहे. हरी आणि कीर्तन या शब्दांपासून तो बनला आहे. हरि हा संस्कृत शब्द मराठीत हरी असा लिहिला जातो; पण त्याचा समास होताना रिर्‍हस्वच असतो. हरी म्हणजे विष्णू. कीर्तन म्हणजे गुणवर्णन. हरिकीर्तन हा शब्द चुकून हरीकीर्तन, हरिकिर्तन, हरीकिर्तन असा लिहिला जाण्याची शक्यता असते. रवर पहिली वेलांटी आणि कवर दुसरी वेलांटी , हे या शब्दाच्या बाबतीत लक्षात ठेवावे.

हरिभक्तिपरायण
हरिभक्तिपरायण या शब्दाची फोड हरि +भक्ति + परायण अशी आहे. हरी आणि भक्ती हे शब्द मराठीत लिहिताना दुसरी वेलांटी दिली जात असली, तरी मुळात त्या संस्कृत शब्दांत पहिली वेलांटी आहे. या शब्दांपासून बनणार्‍या सामासिक शब्दांत पहिली वेलांटीच असते. हरि म्हणजे विष्णू. परायण म्हणजे तत्पर, निमग्न. हरिभक्तीमध्ये निमग्न असणारा म्हणजे हरिभक्तिपरायण. या शब्दाचे ह.भ.प. असे लघुरूप रूढ आहे. चुकून हरिभक्तपरायण असे लिहिले जाण्याची शक्यता असते. ती चूक टाळावी.

हळू हळू
हळू हळू हा अभ्यस्त शब्द आहे. एकच शब्द पुन:पुन्हा येऊन किंवा त्याच अर्थाचा दुसरा शब्द जोडून जे नवे शब्द बनतात, किंवा एकाच शब्दाची किंवा अक्षराची पुनरावृत्ती होऊन जो नवीन शब्द बनतो त्याला अभ्यस्त शब्द म्हणतात. हळू हळू या शब्दात हळू हा मुख्य शब्द आहे. याचीच पुनरावृत्ती होऊन हळू हळू हा शब्द बनतो. यातील 'ळला दुसरा उकार द्यावा. हळु हळु असे लिहिणे चुकीचे आहे.

अतिथी
हा शब्द तत्सम असल्याने, संस्कृतमध्ये या शब्दात थला पहिली वेलांटी असते. असे कितीतरी संस्कृतशब्द मराठीत वापरले जातात. मराठीत मात्र या शब्दांचे मराठीच्या नियमाप्रमाणे अंती येणारे इकार, उकार व वेलांटी दीर्घ ठेवले जातात. म्हणून अतिथिहा शब्द अतिथी असा लिहिला जातो. सामासिक शब्दात मात्र हे शब्द पूर्वपदी आल्यावर ह्र स्वान्त लिहावेत. उदा. अतिथिगृह.

अंकुश
हा शब्द तत्सम आहे. याचा अर्थ नियंत्रण, मर्यादित, हत्तीला ताब्यात आणण्याचे हत्यार. या शब्दात 'क'ला पहिला उकार द्यावा. काही वेळा अनुस्वार न देता 'क' ला न लावून 'अन्कुश' असे लिहितात. असे लिहिणे चुकीचे आहे.

लक्ष्य
हा शब्द लिहिताना वाक्यातला अर्थ समजावून घेऊनच लिहावा. 'लक्ष' व 'लक्ष्य' केव्हा लिहावे, हे अर्थावरूनच लक्षात येते. सावज हा अर्थ असेल तर 'क्ष'ला 'य' जोडूनच लिहावा. दृष्टी अशा अर्थाने वापरायचा तेव्हां'लक्ष' लिहावे.

भीकबाळी
हा शब्द विशेष करून इतिहासकालीन साहित्यात फार वेळा आढळतो. याचा अर्थ पुरुषांच्या कानातला मोत्याचा एक दागिना असा आहे. पूर्वी राजे लोक कानात दागिना घालत असत. आजही राजस्थानी पुरुष कानात दागिना घालतात. हा शब्द लिहिताना भला दुसरी वेलांटी व तिसरे अक्षर भ न लिहिता ब लिहावे. भिकभाळी असे लिहू नये.


प्राणोत्क्रमण
हा शब्द संस्कृत आहे. प्राण निघून जाणे या क्रियेला प्राणोत्क्रमण म्हणतात. मरण पावणे, निधन होणे या अर्थानेच 'प्राणोत्क्रमण' हा शब्द वापरतात. या शब्दात 'त ला 'क्र लावावा. 'प्राणोतक्रमण' असे लिहू नये.

शैथिल्य
हा शब्द संस्कृत आहे. याचा अर्थ आहे ढिलेपणा, सुस्त, शिथलिता. या शब्दात 'श'वर दोन मात्रे व 'थ'ला पहिली वेलांटी व 'ल' ला य जोडावा.

परीक्षित
हा शब्द संस्कृत आहे. याचा अर्थ आहे परीक्षेत किंवा कसोटीस उतरलेला. हा शब्द मराठीत लिहिताना मूळ संस्कृताप्रमाणेच लिहावा. त्यात बदल करू नये. हा शब्द विशेषनाम म्हणूनही वापरतात.

स्वकीय
हा शब्द संस्कृत विशेषण आहे. याचा अर्थ आहे स्वत:चा. या शब्दात 'स' ला 'व' जोडून, 'क'ला दुसरी वेलांटी द्यावी. या शब्दाचे सामान्यरूप करतानाही या मूळ शब्दात फरक पडत नाही. उदा. स्वकीयांचे, स्वकीयांना इ.

दूषणीय
हा शब्द संस्कृत विशेषण आहे. यातील मूळ शब्द दूषण आहे. याचा अर्थ दोष, ठपका. दूषणीय म्हणजे दोषास पात्र. हा शब्द मूळ संस्कृत प्रमाणेच लिहावा.

मुमुक्षा
हा संस्कृत (तत्सम) शब्द आहे. याचा अर्थ मोक्षप्राप्तीची इच्छा. मोक्षप्राप्तीची इच्छा करणार्‍याला मुमुक्षू म्हणतात. हा शब्द मराठीत वापरतानाही मूळ संस्कृतप्रमाणेच लिहावा. मुमूक्षा असे लिहू नये.

अर्धोन्मीलित
हा संस्कृत शब्द आहे. याचा अर्थ अर्धे उघडलेले, अर्धे उमललेले. हा शब्द लिहिताना जोडाक्षराकडे व र्‍हस्व-दीर्घाकडे विशेष लक्ष द्यावे. ('अर्धोन्मिलित', 'अर्धोन्मीलीत' असे लिहू नये.)

अंगुष्ठ
हा संस्कृत शब्द आहे. याचा अर्थ आहे अंगठा. 'ष्ट' आणि 'ष्ठ' लिहिताना नेहमीच घोटाळा होतो. शब्द संस्कृत असेल, तर मूळ शब्दाप्रमाणेच लिहिण्याचे भान ठेवावे. या शब्दातदेखील 'ग'ला पहिला उकार व 'ष' ला 'ठ' जोडून लिहावा. अंगुष्ट असे लिहू नये.

प्रायोपवेशन
हा संस्कृत शब्द आहे. याचा अर्थ आहे मरेपर्यंत उपोषण. ही एक कठोर तपश्चर्याच असते. हा शब्द लिहिताना उच्चार व्यवस्थित करूनच लिहावा म्हणजे चूक होणार नाही. 'प्रला काना व दुसरे अक्षर 'य' न लिहिता 'यो' आहे हे लक्षात ठेवावे.

बीज
हा संस्कृत शब्द आहे. याचा अर्थ आहे मूळ, संतती, द्वितीया इ. या शब्दात 'ब' ला दुसरी वेलांटी द्यावी. या शब्दाचे सामान्यरूप करतानाही या शब्दात बदल करू नये. बिजेला, बिजेसाठी असे रूप करू नये.

नि:संग
हा संस्कृत शब्द आहे. याचा अर्थ आहे विरक्त, लोकरीती सोडलेला. या शब्दात 'न'पुढे विसर्ग हवा. काही वेळा 'नित्संग' असा चुकीचा शब्द लिहिला जातो. तो चुकीचा आहे हे ध्यानात ठेवा.

विच्छिन्न
हा संस्कृत शब्द आहे. याचा अर्थ आहे वेगळा केलेला, तोडलेला, मोडलेला. या शब्दात जोडाक्षरांकडे विशेष लक्ष द्यावे. 'च' ला 'छ' व 'न' ला 'न' जोडावा. शिवाय दोन्ही अक्षरांना पहिली वेलांटी द्यावी. 'विछिन्न,' 'वीच्छिन्न' असे लिहू नये.

मूर्च्छा
हा संस्कृत शब्द आहे. याचा अर्थ चक्कर, घेरी, बेशुद्धावस्था. हा शब्द लिहिताना जोडाक्षराकडे विशेष लक्ष द्या. मला दुसरा उकार व चला छ जोडून व त्यावर रफार द्या. मुर्छा , मूरछा , मुर्च्छा असे लिहिणे चुकीचे आहे.

दुरित
हा संस्कृत शब्द आहे. याचा अर्थ पाप. या शब्दातील दला पहिला उकार व रला पहिली वेलांटी द्यावी. रला दुसरी वेलांटी दिल्यास शब्दाचा अर्थ बदलेल. 'रीत' म्हणजे पद्धत. 'दुरीत' असे लिहू नये.

उद्दीपन
हा संस्कृत शब्द आहे. याचा अर्थ प्रज्वलन, पेटवणे, जागृत करणे. या शब्दात 'द'ला 'द' जोडून त्याला दुसरी वेलांटी द्यावी. हा तत्सम शब्द असल्यामुळे याचे सामान्यरूप करतानाही मूळ शब्द जसाच्या तसाच लिहावा.

संचित
हा संस्कृत शब्द आहे. याचा अर्थ साचलेले, पूर्वजन्मार्जित पापपुण्य, साठलेले पापपुण्य असा आहे. हा शब्द लिहिताना बर्‍याच वेळा सवर अनुस्वार न देता चवर दिला जातो. सचिंत असा शब्द लिहिला असता याचा अर्थ चिंताग्रस्त असा होईल. अनुस्वाराची जागा बदलली की शब्दाचा अर्थ बदलेल हे ध्यानात ठेवावे. तसेच या शब्दात चला पहिली वेलांटीच लिहायला हवी, हे लक्षात ठेवा.

बुद्धिमांद्य
हा संस्कृत शब्द आहे. यात मूळ शब्द बुद्धी आहे. बुद्धीचा जडपणा, आकलन होत नसेल तर त्याला 'बुद्धिमांद्य' म्हणतात. 'बुद्धी' शब्द लिहिताना तो दीर्घ लिहितात; पण सामासिक शब्दात तो ऱ्हस्व होतो. 'बुद्धीमांद्य' असे लिहू नये.

हानिकारक
हानिकारक हा शब्द हानी या शब्दापासून तयार झाला आहे. मूळ संस्कृत शब्द हानि असा आहे. मराठीत तो वापरताना हानी असा लिहिला, तरी हानिकारकमध्ये नवर पहिली वेलांटी आहे. (हानीकारक असे लिहिणे चूक.) नुकसान, दुखापत, नाश, बिघाड हे हानी या शब्दाचे अर्थ आहेत. ज्यामुळे हानी होते, त्याला हानिकारक म्हणतात. हानिप्रतिबंधक म्हणजे हानीला प्रतिबंध करणारे.

स्थिर
हालचाल न करणारे, निश्चल या अर्थी स्थिर हे विशेषण वापरले जाते. पक्के, कठीण, शाश्वत हेदेखील या शब्दाचे अर्थ आहेत. या शब्दात स्थ या जोडक्षरावर पहिली वेलांटी आहे. अनेकांकडू न हा शब्द स्थीर असा उच्चारला जातो. या चुकीमुळे लिहितानाही चूक होऊन दुसरी वेलांटी दिली जाण्याची शक्यता असते. अस्थिर हा शब्द स्थिरच्या उलट अर्थाचा आहे. त्यातही पहिलीच वेलांटी असते.

षोडशोपचार
हिंदू धर्मात पूजेचे जे १६ विधी सांगितले आहेत, त्याला षोडशोपचार म्हणतात. षोडश म्हणजे सोळा. षोडश + उपचार असा त्याचा संधी आहे. हा शब्द लिहिताना श विषयी घोटाळा होतो. पहिले अक्षर शहामृगातला श नसून षट्कोनातला ष आहे हे लक्षात ठेवा. शोडशोपचार न लिहिता षोडशोपचार लिहिणे योग्य आहे.

हुशार
हुशार हा शब्द आपण नेहमी वापरतो. बुद्धिमान, शहाणा, चलाख हे त्याचे अर्थ आपल्याला परिचित आहेत. सावध, दक्ष, ताजातवाना असेही त्यावे अर्थ आहेत. 'हुशार'मधील 'श' शहामृगातला आहे. तो षट्कोनातला नाही. तो षट्कोनातला लिहिण्याची चूक('हुषार') होऊ देऊ नये. 'हुशार'चे मूळ होशियार या फारसी शब्दात आहे. तो शब्द 'होश'वरून तयार झाला आहे. बुद्धी, ज्ञान, चेतना, हे 'होश'चे अर्थ आहेत.

प्रावीण्य
हुशार, कुशल , निपुण अशा अर्थांनी प्रवीण हे विशेषण वापरले जाते. एक विशेषनाम म्हणूनही ते रूढ आहे. प्रवीणपासून प्रावीण्य हे भाववाचक नाम तयार झाले आहे. त्याच्या अर्थांमध्ये निपुणता, कौशल्य, हुशारी आदींचा समावेश आहे. प्रवीण व प्रावीण्य या दोन्ही शब्दांत व वर दुसरी वेलांटी आहे हे लक्षात ठेवावे. प्रविण , प्राविण्य असे लिहिणे चुकीचे आहे.

स्थितिस्थापक
हे संस्कृत विशेषण आहे. या शब्दाचा अर्थ लवचिक. स्थापक म्हणजे स्थापणारा. ताणल्याने लांब होऊन सोडल्यावर पुन्हा पूर्वस्थितीवर येणारे असा आहे. हा शब्द लिहिताना स्थिती आणि स्थापक हे दोन्ही शब्द लक्षात घ्यावेत. हा शब्द एकत्र लिहिताना तवर मात्र पहिली वेलांटी हवी. स्थितीस्थापक असे लिहू नका.

स्फुट
हे संस्कृत विशेषण आहे. याचा अर्थ विकसित, उघड, स्पष्ट, किरकोळ इ. या शब्दांत 'स'ला 'फ' जोडावा व त्याला पहिला उकार द्यावा. स्फूट, स्फूठ किंवा स्पुट असे लिहू नये.

2 comments:

Unknown August 1, 2019 at 7:01 PM  

कोट्याधीश हा शब्द बरोबर आहे
काय

Unknown January 22, 2020 at 12:25 PM  

प्रित्यर्थ

वाचनीय

  © Blogger templates The Professional Template by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP