मराठी पत्रकार

गोव्याच्या दैनिक नवप्रभाचे संपादक श्री. परेश प्रभू यांचा हा अधिकृत ब्लॉग समस्त पत्रकार मित्रांसाठी...

माध्यम चर्चा

पत्रकार मित्रांच्या आपल्या क्षेत्राबद्दलच्या जाणिवा अधिक प्रगल्भ व्हाव्यात या उद्देशाने हा ब्लॉग तयार करण्यात आला आहे. या ब्लॉगवर समाविष्ट करण्यासारखी माहिती आपल्या नजरेस आली, किंवा या ब्लॉगवरील एखाद्या लेखाविषयी प्रतिक्रिया द्यावीशी वाटली तर जरूर कळवा - goa.paresh@gmail.com


Friday, March 16, 2007

शुद्धलेखनाचे नियम
मराठी वर्तमानपत्रांतून शुद्धलेखनाचा खून पाडलेला दिसून येतो. वार्ताहर आणि उपसंपादकांचे शुद्धलेखनाविषयीचे अज्ञान हेच याला जबाबदार असते. शुद्धलेखनाचे मूलभूत नियम आपण पाळले तर मराठी वर्तमानपत्रांच्या लक्षावधी वाचकांचे मराठी भाषेचे ज्ञान सुधारेल...


नियम १
अनुस्वार

नियम १.१
स्पष्टोच्चारित अनुनासिकाबद्दल शीर्षबिंदू द्यावा.
उदाहरणार्थ: गुलकंद, चिंच, तंटा, आंबा

नियम १.२
तत्सम शब्दातील अनुनासिकाबद्दल विकल्पाने पर-सवर्ण लिहिण्यास हरकत नाही.मात्र अशा वेळी अनुस्वारानंतर येणाऱ्या अक्षराच्या वर्गातील अनुनासिकच पर-सवर्ण म्हणून वापरावे.
उदाहरणार्थ: 'पंकज=पङ्कज', पञ्चानन, पंडित=पण्डित, अंतर्गत=अन्तर्गत, अंबुज=अम्बुज.

नियम १.३
पर-सवर्ण लिहिण्याची सवलत फक्त तत्सम शब्दांपुरती मर्यादित आहे. संस्कृत नसलेले मराठी शब्द शीर्षबिंदू (अनुस्वार) देऊनच लिहावेत.
उदाहरणार्थ: 'दंगा, झांज, बंड, खंत, संप' हे शब्द 'दङ्गा, झाञ्ज, बण्ड, खन्त, सम्प' असे लिहू नयेत.

नियम १.४
अर्थभेद स्पष्ट करण्यासाठी कधीकधी पर-सवर्ण जोडून शब्द लिहिणे योग्य ठरते.
उदाहरणार्थ:
वेदांत=वेदांमध्ये, वेदान्त= तत्वज्ञान,
देहांत=शरीरांमध्ये, देहान्त= मृत्यू.
[संपादन] नियम १.५

काही शब्दांमधील अनुस्वारांचा उच्चार अस्पष्ट असतो. कधीकधी तो उच्चारलादेखील जात नाही. अशा शब्दांवर अनुस्वार देऊ नये.
उदाहरणार्थ: 'हंसणे, धांवणे, जेव्हां, कोठें, कधीं, कांही' हे शब्द 'हसणे, धावणे, जेव्हा, कोठे, कधी, काही' असे लिहावेत.
#

नियम २:

अनुस्वार

नियम २.१
य्, र्, ल्, व्, श्, ष्, स्, ह् यांच्यापूर्वी येणाऱ्या अनुस्वारांबद्दल केवळ शीर्षबिंदू द्यावा. 'ज्ञ' पूर्वीचा नासोच्चारही केवळ शीर्षबिंदूने दाखवावा.
उदाहरणार्थ: संयम, संरचना, संलग्न, संवाद, दंश, दंष्ट्रा, मांस, सिंह, संज्ञा' हे शब्द 'संय्यम, संव्रचना, संल्लग्न, संव्वाद, दंव्श, दंव्ष्ट्रा, मांव्स, सिंव्ह, संव्ज्ञा' असे लिहू नयेत.

नियम ३
अनुस्वार

नियम ३.१
नामांच्यासर्वनामांच्या अनेकवचनी सामान्यरूपांवर विभक्तिप्रत्ययशब्दयोगी अव्यय लावताना अनुस्वार द्यावा.
उदाहरणार्थ: लोकांना, मुलांनी, तुम्हांस, लोकांसमोर, घरांपुढे.

नियम ३.२
आदरार्थी बहुवचनाच्या वेळीही असा अनुस्वार दिला पाहिजे.
उदाहरणार्थ: राज्यपालांचे, मुख्यमंत्र्यांचा, तुम्हांला, आपणांस, शिक्षकांना, अध्यक्षांचे.

नियम ४
अनुस्वार वरील नियमांव्यतिरिक्त कोणत्याही कारणांसाठी - व्युत्पत्तीने सिद्ध होणारे वा न होणारे - अनुस्वार देऊ नयेत.
या नियमानुसार 'घंरे, पांच, करणें, काळीं, नांव, कां, कांच, जों, घरीं' हे शब्द 'घरे, पाच, करणे, काळी, नाव, का, जो, घरी' असे लिहावेत.

नियम ५
र्‍हस्व-दीर्घ नियम

नियम५.१
मराठीतील तत्सम इ-कारान्त आणि उ-कारान्त शब्द दीर्घान्त लिहावेत.
उदाहरणार्थ : कवि=कवी, बुद्धि=बुद्धी, गति=गती.
इतर शब्दांच्या अंती येणारा इकार व उकार दीर्घ लिहावा.
उदाहरणार्थ: पाटी, जादू, पैलू

नियम५.२
'परंतु, यथामति, तथापि', ही तत्सम अव्यये र्‍हस्वान्त लिहावीत.

नियम ५.३
व्यक्तिनामे, ग्रंथनामे, शीर्षके व सुटे र्‍हस्वान्त तत्सम शब्द मराठीत दीर्घान्त लिहावेत.
उदाहरणार्थ: हरी, मनुस्मृती, वर्गीकरण, पद्धती, कुलगुरू.

नियम ५.४
'आणि' व 'नि' ही मराठीतील दोन अव्यये र्‍हस्वान्त लिहावीत.

नियम ५.५
सामासिक शब्द लिहिताना समासाचे पूर्वपद (पहिला शब्द) तत्सम र्‍हस्वान्त असेल (म्हणजेच मुळात संस्कृतमध्ये र्‍हस्वान्त असेल) तर ते पूर्वपद र्‍हस्वान्तच लिहावे. दीर्घान्त असेल तर दीर्घान्तच लिहावे.
उदाहरणार्थ: बुद्धि -बुद्धिवैभव, लक्ष्मी -लक्ष्मीपुत्र.
साधित शब्दांनाही हाच नियम लावावा.
उदाहरणार्थ: बुद्धि-बुद्धिमान, लक्ष्मी-लक्ष्मीसहित.

नियम ५.६
'विद्यार्थिन्, गुणिन्, प्राणिन्, पक्षिन्' या सारखे इन्-अन्त शब्द मराठीत येतात तेव्हा त्यांच्या शेवटी असलेल्या न् चा लोप होतो व उपान्त्य र्‍हस्व अक्षर दीर्घ होते. परंतु हे शब्द समासात पूर्वपदी आले असता (म्हणजेच समासातील पहिला शब्द असता) ते र्‍हस्वान्तच लिहावेत.
उदाहरणार्थ
विद्यार्थिमंडळ , गुणिजन, प्राणिसंग्रह, स्वामिभक्ती, पक्षिमित्र, योगिराज.

नियम ६
र्‍हस्व-दीर्घ नियम
मराठी शब्दातील शेवटचे अक्षर दीर्घ असेल तर त्याचा उपान्त्य (म्हणजेच शेवटच्या अक्षराच्या अलीकडचा) इकार किंवा उकार र्‍हस्व लिहावा.
उदाहरणार्थ किडा, विळी, पिसू, इथे, निघो, फुगा, खुनी, सुरू, कुठे, उठो.
मात्र तत्सम शब्दांना हा नियम लागू नाही. तत्सम शब्दातील उपान्त्य इकार किंवा उकार मुळाप्रमाणे र्‍हस्व किंवा दीर्घ लिहावेत.
उदाहरणार्थ: पूजा, गीता, अनुज्ञा, दक्षिणा

नियम ७

र्‍हस्व-दीर्घ नियम

नियम ७.१
मराठी अ-कारान्त शब्दाचे उपान्त्य इकारउकार दीर्घ लिहावेत.
उदाहरणार्थ: कठीण, नीट, रतीब, विहीर, ऊस, चिरूट, तूप, मूल.
तत्सम(मुळात संस्कृत असलेल्या) अ-कारान्त शब्दांतील उपान्त्य इकार व उकार मुळ प्रमाणे ऱ्हस्व किंवा दीर्घ लिहावेत.
उदाहरणार्थ: गणित, विष, गुण, मधुर, दीप, न्यायाधीश, रूप, व्यूह

नियम ७.२
मराठी शब्दांतील अनुस्वार,विसर्ग,किंवा जोडाक्षर, यांच्या पूर्वीचे इकारउकार सामान्यत: ऱ्हस्व लिहावेत.
उदाहरणार्थ: चिंच, डाळिंब, भिंग, खुंटी, पुंजका, भुंगा, छि:, थु:, किल्ला, भिस्त, विस्तव, कुस्ती, पुष्कळ, मुक्काम.
परंतु तत्सम शब्दांत ते मुळाप्रमाणे ऱ्हस्व, किंवा दीर्घ लिहावेत.
उदाहरणार्थ: अरविंद, चिंतन, कुटुंब, चुंबक, नि:पक्षपात, नि:शस्त्र, चतू:सूत्री, दु:ख, कनिष्ठ, मित्र, गुप्त, पुण्य, ईश्वर, नावीन्य, पूज्य, शून्य.

नियम ८
र्‍हस्व-दीर्घ नियम

नियम ८.१
उपान्त्यी दीर्घ ई किंवा ऊ असलेल्या मराठी शब्दांचा उपान्त्य ई-कार किंवा ऊ-कार उभयवचनी सामान्यरूपांच्या वेळी ऱ्ह्स्व लिहावा.
उदाहरणार्थ: गरीब-गरिबाला,गरिबांना,चूल-चुलीला,चुलींना.
अपवाद-दिर्घोप्न्त्य तत्सम शब्द.
उदाहरणार्थ:परीक्षा-परीक्षेला,परीक्षांना,दूत-दूताला,दूतांना.

नियम ८.२
मराठी शब्द तीन अक्षरी असून त्याचे पहिले अक्षर दीर्घ असेल तर अशा शब्दाच्या सामान्यरूपात उपान्त्य ई-ऊ यांच्या जागी 'अ' आल्याचे दिसते.
उदाहरणार्थ:बेरीज-बेरजेला,बेरजांना,लाकूड-लाकडाला,लाकडांना.
मात्र पहिले अक्षर ऱ्ह्स्वअसल्यास हा 'अ' विकल्पाने (पर्यायी) होतो.
उदाहरणार्थ:परीट-पर(रि)टास,पर(रि)टांना

नियम ८.३
शब्दांचे उपान्त्य अक्षर 'ई' किंवा 'ऊ' असेल तर अशा शब्दाच्या उभयवचनी सामान्यरूपाच्या वेळी 'ई' च्या जागी 'य' आणि 'उ' च्या जागी 'व' असे आदेश होतात.
उदाहरणार्थ:काईल-कायलीला,देउळ-देवळाला,देवळांना

नियम ८.४
पुल्लिंगी शब्दाच्या शेवटी 'सा' असल्यास त्या जागी उभयवचनी सामान्यरूपाच्या वेळी 'शा' होतो.('श्या' होत नाही)
उदाहरणार्थ: घसा-घशाला,घशांना,ससा-सशाला,सशांना

नियम ८.५
पुल्लिंगी शब्दाच्या शेवटी 'जा' असल्यास उभयवचनी सामान्यरूपाच्या वेळी तो तसाच राहतो (त्याचा 'ज्या' होत नाही.)
उदाहरणार्थ:दरवाजा- दरवाजाला,दरवाजांना; मोजा-मोजाला,मोजांना.

नियम ८.६
तीन अक्षरी शब्दातील मधले अक्षर 'क' चे किंवा 'प' चे द्वित्व असेल तर उभयवचनी सामान्यरूपाच्या वेळी हे द्वित्व नाहीसे होते.
उदाहरणार्थ:रक्कम-रकमेला,रकमांना; छप्पर-छपराला,छपरांना

नियम ८.७
मधल्या 'म' पूर्वीचे अनुस्वारसहित अक्षर उभयवचनी सामान्यरूपाच्या वेळी अनुस्वारविरहित होते.
उदाहरणार्थ:किंमत-किमतीला,किमतींना; गंमत-गमतीला,गमतींचा

नियम ८.८
ऊ-कारान्त विशेषनामाचे सामान्यरूप होत नाही.
उदाहरणार्थ:गणू-गणूस; दिनू-दिनूला.

नियम ८.९
धातूला 'ऊ' किंवा 'ऊन' प्रत्यय लावताना धातूच्या शेवटी 'व' असेल तरच 'वू' आणि 'वून' अशी रूपे होतात.पण धातूच्या शेवटी 'व' नसेल तर 'ऊ' किंवा 'ऊन' अशी रूपे होतात
उदाहरणार्थ:धाव-धावू,धावून; गा-गाऊ,गाऊन; कर-करू,करून.
किरकोळ (इतर)

नियम ९
पूर हा ग्रामवाचक कोणत्याही ग्रामनामास लावताना दिर्घोपान्त्य लिहावा.
उदाहरणार्थ : नागपूर,तारापूर,सोलापूर

नियम १०
"कोणता,एखादा' ही रूपे लिहावीत. 'कोणचा,एकादा' ही रूपे लिहू नयेत.

नियम ११
'खरीखरी,हळूहळू' यासारख्या पुनरुक्त शब्दांतील दुसरा व चौथा हे स्वर मूळ घटक शब्दांमध्ये ते दीर्घ असल्याने ते दीर्घ लिहावेत, परंतु पुनरुक्त शब्द नादानुकारी असतील तर ते उच्चाराप्रमाणे ऱ्हस्व लिहावेत.
उदाहरणार्थ:दुडुदुडु,रुणुझुणु,लुटुलुटु.

नियम १२
एकारान्त नामाचे सामान्यरूप या-कारान्त करावे.ए-कारान्त करू नये.
उदाहरणार्थ : करणे-करण्यासाठी,फडके-फडक्यांना.

नियम १३
लेखनात पात्राच्या किंवा वक्त्याच्या तोंडी बोलण्याची भाषा घालावी लागते.त्या वेळी तिचे स्वरूप बोलण्यातील उच्चाराप्रमाणे अनुस्वारयुक्त असावे. उदाहरणार्थ: 'असं केलं , मी म्हटलं;त्यांनी सांगितलं अन्य प्रसंगी ही रूपे ए-कारान्त लिहावीत. उदाहरणार्थ : असे केले;मी म्हटले;त्यांनी सांगितले

नियम १४
'क्वचित्, कदाचित्,अर्थात्,अकस्मात्,विद्वान्,' यांसारखे मराठीत रूढ झालेले तत्सम शब्द अ-कारान्त लिहावेत.
उदाहरणार्थ : 'क्वचित, कदाचित,अर्थात,अकस्मात,विद्वान,'
कोणत्याही अन्य भाषेतील शब्द लिहिण्याची गरज पडेल तेव्हा त्या भाषेतल्या उच्चाराप्रमाणे लेखन करावे.
उदाहरणार्थ : 'डिक्शनरि,ब्रिटिश,हाउस.
इंग्रजी शब्द ,पदव्या किंवा त्यांचे संक्षेप यांच्या शेवटचे अक्षर आता व्यंजनान्त म्हणजे पाय मोडके लिहू नये.
उदाहरणार्थ :'एम.ए. , पीएच.डी., अमेरिकन,वॉशिंग्टन .

नियम १५
केशवसुतपूर्वकालीन पद्यविष्णुशास्त्री चिपळूणकरपूर्वकालीन गद्य यांतील उतारे छापताना ते मुळानुसार छापावेत तदनंतरचे (केशवसुतचिपळूणकर यांच्या लेखनासह) लेखन 'मराठी साहित्य महामंडळाच्या प्रस्तुत लेखन नियमांस अनुसरून छापावे.
केशवसुतांचा काव्यरचना काल १८८५ -१९०५
चिपळूणकरांचा लेखनकाल १८७४-१८८२

नियम १६
राहणे, पाहणे, वाहणे अशी रूपे वापरावीत 'रहाणे, राहाणे, पहाणे, वहाणे, वाहाणे, अशी रूपे वापरू नयेत.
आज्ञार्थी प्रयोग करताना मात्र 'राहा, पाहा, वाहा' या बरोबरच 'रहा, पहा, वहा' अशी रूपेही वापरण्यास हरकत नाही.

नियम १७
'इत्यादी' व 'ही' हे शब्द दीर्घांन्त लिहावेत . 'अन्' हा शब्द व्यंजनान्त लिहावा.

नियम १८
पद्यात वृत्ताचे बंधन पाळताना ऱ्हस्व-दीर्घाच्या बाबतीत हे नियम काटेकोरपणे पाळणे शक्य नसल्यास कवीला तेवढ्यापुरते स्वातंत्र्य असावे.

1 comments:

Nikheel Shaligram March 17, 2007 at 1:19 PM  

Dear Prakash,
I am extremely thankful to you for above blog of Marathi words with clear meaning. I would have also written in Marathi. However I wish to read your further blogs regularly. Thanks once again.
Nikheel

वाचनीय

  © Blogger templates The Professional Template by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP