मराठी पत्रकार

गोव्याच्या दैनिक नवप्रभाचे संपादक श्री. परेश प्रभू यांचा हा अधिकृत ब्लॉग समस्त पत्रकार मित्रांसाठी...

माध्यम चर्चा

पत्रकार मित्रांच्या आपल्या क्षेत्राबद्दलच्या जाणिवा अधिक प्रगल्भ व्हाव्यात या उद्देशाने हा ब्लॉग तयार करण्यात आला आहे. या ब्लॉगवर समाविष्ट करण्यासारखी माहिती आपल्या नजरेस आली, किंवा या ब्लॉगवरील एखाद्या लेखाविषयी प्रतिक्रिया द्यावीशी वाटली तर जरूर कळवा - goa.paresh@gmail.com


Friday, March 16, 2007

अगत्य
आस्था, आदर, कळकळ या अर्थांनी अगत्य हा शब्द वापरला जातो. अगत्यपूर्वक बोलावणे या शब्दप्रयोगात हा अर्थ अभिप्रेत असतो. अत्यंत आवश्यकता, हादेखील अगत्य या शब्दाचा एक अर्थ आहे. हे काम होणे अगत्याचे आहे, असे म्हटले जाते, तेव्हा हा अर्थ अभिप्रेत असतो. अगत्य या शब्दातील पहिले अक्षर आ नसून अ आहे, हे ध्यानात घ्यावे. (आगत्य असे लिहिणे चूक.)

हिंस्र
इतर प्राणी हेच ज्यांचे अन्न आहे, अशा वन्य प्राण्यांचे वर्णन हिंस्र या विशेषणाने केले जाते. क्रू र, भयंकर असेही या शब्दाचे अर्थ आहेत. हिंस् (ठार मारणे) या संस्कृत धातूपासून हिंस्र हा शब्द बनला आहे. दुखविणे, पीडा देणे असेही त्या धातूचे अर्थ आहेत. हिंस्रमध्ये सला र जोड्लेला आहे; स ला त्र व्हे, हे ध्यानात ठेवावे. ( हिंस्त्र असे लिहिणे चूक.)

इत्थंभूत
इत्थंभूत हा शब्द तपशीलवार , सविस्तर अशा अर्थी वापरला जातो. इत्थं + भूत अशी या शब्दाची फोड आहे. इत्थं हे संस्कृतमधील एक अव्यय आहे. अशा प्रकारे हा त्याचा अर्थ. भूत शब्दाच्या अर्थांमध्ये एक अर्थ झालेले असा आहे. इत्थंभूतचा शब्दश: अर्थ अशा प्रकारे झालेले. हा शब्द 'इत्यंभूत' वा 'इथ्यंभूत' असा लिहिला जाण्याची चूक होऊ शकते; ती टाळावी.

ईश्वर
ईश्वर हा शब्द सर्वांना परिचित आहे. 'देव' हा तर त्याच अर्थ आहेच; पण त्याचे समर्थ, श्रेष्ठ, राजा, श्रीमंत, पती इत्यादी अर्थही आहेत. 'ईश्वर' या शब्दात ई दीर्घ आहे. ( 'इश्वर' असे लिहिणे चूक.) ईश् आणि ईश यादेखील शब्दांचा अर्थ देव असा आहे. 'ईश् + वर' अशी 'ईश्वर' शब्दाची फोड आहे. येथे 'वर' या संस्कृत शब्दाचा 'श्रेष्ठ' हा अर्थ अभिप्रेत आहे.

उत्स्फूर्त
उत्स्फूर्त या शब्दाचा संबंध स्फूर्ती या शब्दाशी आहे. मनात एकाएकी उत्कटपणे प्रकट होऊन व्यक्त होणारा विचार वा केली जाणारी कृती, यांचे वर्णन उत्स्फूर्त या शब्दाने केले जाते. स्फूर्ती म्हणजे स्फुरण; एकाएकी झालेला प्रादुर्भाव. उत्स्फूर्त या शब्दातील जोडाक्षर नीट लक्षात ठेवावे. हा शब्द चुकून 'उस्फूर्त' असा लिहिला जाणार नाही, याची काळजी घ्यावी. त्यासाठी त्याची फोड (उत् + स्फूर्त) लक्षात ठेवावी.

धीरोदात्त
उदार व निर्भय व्यक्तीचे वर्णन धीरोदात्त या विशेषणाने केले जाते. धीर + उदात्त अशी या शब्दाची फोड आहे. संस्कृतमधील धीर या विशेषणाचे अर्थ निर्भय, निश्चयी, पराक्रमी असे आहेत. उदात्त म्हणजे उच्च, श्रेष्ठ,उदार. धीरोदात्त हा शब्द लिहिताना, धवर दुसरी वेलांटी, हे ध्यानात ठेवावे. (धिरोदात्त असे लिहिणे चूक.) धीरगंभीर याही शब्दात धवर दुसरी वेलांटी हे विसरू नये.

औदासीन्य
उदासीन या विशेषणापासून औदासीन्य हे भाववाचक नाम तयार झाले आहे. या शब्दात 'स'ला दुसरी वेलांटी आहे, हे ध्यानात घ्यावे. तटस्थ, अलिप्त, तिऱ्हाईत हे उदासीन या शब्दाचे अर्थ. उदास याही विशेषणाचा अर्थ उदासीन असा होतो. खिन्न असाही त्याचा अर्थ आहे. अलिप्तता, तटस्थता हे जसे औदासीन्य या शब्दाचे अर्थ आहेत, तसेच, बेफिकिरी, निष्काळजीपणा, खिन्नता याही अर्थांनी तो वापरला जातो.

उपजीविका
उपजीविका म्हणजे उदरनिर्वाह. या शब्दात जवर दुसरी आणि ववर पहिली वेलांटी आहे. हा शब्द लिहिताना या वेलांट्यांबाबत गल्लत होण्याची शक्यता असते. उपजिविका, उपजिवीका, उपजीवीका असे लिहिण्याच्या चुका होऊ शकतात; त्या टाळाव्यात. उपजीवी अथवा उपजीवक म्हणजे उपजीविका करणारा. (कृष्योपजीवी म्हणजे शेतीवर उपजीविका करणारा.) उपजीव्य म्हणजे निर्वाहाचे साधन. या सर्व शब्दांत जी दीर्घ आहे, हे ध्यानात ठेवावे.

उपाहार
उपाहार (उप + आहार) म्हणजे फराळ. (इंग्रजीत 'रिफ्रेशमेंट'.) उपाहारगृह हा शब्द त्यावरुन बनला आहे. त्यात 'उपाहार'ऐवजी 'उपहार' असे चुकीचे लिहिलेले तुम्ही पाहिले असेल. येथे 'पा' चा 'प' झाला, की अर्थ बदलतो. उपहार हा देखील संस्कृत शब्द आहे. त्याचे अनेक अर्थ (भेट, देणगी, आहुती, आरास, आनंद इत्यादी) आहेत. भेट वा देणगी या अर्थी तो हिंदीत वापरला जातो.

उपाहार
उपाहार (उप + आहार) म्हणजे फराळ. (इंग्रजीत रिफ्रेशमेंट.) उपाहारगृह हा शब्द त्यावरून बनला आहे. त्यात 'उपाहार' ऎवजी उपहार असे चुकीचे लिहिलेले तुम्ही पाहिले असेल. येथे 'पा' चा प झाला की अर्थ बदलतो. उपहार हादेखील संस्कृत शब्द आहे. त्याचे अनेक अर्थ (भेट, देणगी, आहुती, आरास, आनंद इत्यादी) आहेत. भेट वा देणगी या अर्थी तो हिंदीत वापरला जातो.

उर्वरित
उर्वरित म्हणजे बाकी राहिलेले, शिल्लक, अवशिष्ट. या शब्दात र वर पहिली वेलांटी आहे आणि उ र्‍हस्व आहे. (उ उखळातला), या दोन्ही गोष्टी लक्षात ठेवाव्यात; म्हणजे ऊर्वरित किंवा उर्वरीत किंवा ऊर्वरीत असे लिहिण्याची चूक होणार नाही. उर्वरितला उरवई हा एक मराठी प्रतिशब्द आहे परंतु तो वापरात असल्याचे आढळत नाही. उरणे म्हणजे बाकी राहणे, शिल्लक राहणे, हे तुम्हाला माहीत आहेच.

उष्ण
उष्ण म्हणजे गरम, हे आपल्याला माहीत आहे. दाहयुक्त, तिखट हेदेखील उष्णचे अर्थ आहेत. हा शब्द अनेक जण चुकून ऊष्ण असा उच्चारतात व लिहितानाही ती चूक होते. ती टाळण्यासाठी उष्णमधील पहिले अक्षर नीट लक्षात ठेवावे. उष्णता याही शब्दात उ र्‍हस्व आहे. ऊन (सूर्यकिरणाचा प्रकाश) या शब्दात मात्र ऊ दीर्घ आहे. ऊन हे विशेषणदेखील आहे व त्याचा अर्थ गरम असाच आहे.

0 comments:

वाचनीय

  © Blogger templates The Professional Template by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP