मराठी पत्रकार

गोव्याच्या दैनिक नवप्रभाचे संपादक श्री. परेश प्रभू यांचा हा अधिकृत ब्लॉग समस्त पत्रकार मित्रांसाठी...

माध्यम चर्चा

पत्रकार मित्रांच्या आपल्या क्षेत्राबद्दलच्या जाणिवा अधिक प्रगल्भ व्हाव्यात या उद्देशाने हा ब्लॉग तयार करण्यात आला आहे. या ब्लॉगवर समाविष्ट करण्यासारखी माहिती आपल्या नजरेस आली, किंवा या ब्लॉगवरील एखाद्या लेखाविषयी प्रतिक्रिया द्यावीशी वाटली तर जरूर कळवा - goa.paresh@gmail.com


Friday, August 16, 2013

आव्हान काळाप्रमाणे बदलण्याचे


आकाशवाणी कालबाह्य झाली. पण एफ. एम. स्टेशने जोरात चालतात, कारण तरुणाईची ती पसंती आहे. निवेदकांची नुसती चर्पटपंजरी. नाना पाटेकर किंवा गोविंदा यांची संवादशैली म्हणजे मशीनगनमधून सुटणार्‍या गोळ्या. एफ. एम. वाल्यांचे आदर्श ते. अध्येमध्ये नावापुरते गीत संगीत, तेही पाश्‍चात्त्य सुरावटींचे. कोण विचारतो लता मंगेशकरना? सुरेलपणा खुंटीला टांगला. तेच बहुधा यापुढे वृत्तपत्रांचे होईल. 



सुरेश वाळवे

ज्येष्ठ पत्रकार

प्रणव रॉय, राजदीप सरदेसाई, बरखा दत्त, करण थापर, रजत शर्मा, निखील वागळे, डॉ. उदय निरगुडकर, प्रमोद आचार्य, संदेश प्रभुदेसाई वगैरेंना कोण ओळखत नाही? या सगळ्यांचे चेहरे प्रेक्षकांना माहीत आहेत, याचे कारण ते अष्टौप्रहर चालणार्‍या वृत्तवाहिन्यांचे संपादक किंवा अँकर आहेत/होते म्हणून. अशाच प्रकारे वृत्तनिवेदक/निवेदिकांनाही आपण ओळखतो. एकेकाळी नागेश करमली, पुरूषोत्तम सिंगबाळ, कृष्णा लक्ष्मण मोये, रमेश सखाराम बर्वे, अनंत केळकर ही मंडळी आपल्याला ‘ऐकून’ माहीत होती. म्हणजे पणजी आकाशवाणीवरील या निवेदकांचा आवाज परिचित होता. ‘बिनाका गीतमाला’ गाजत होती, तेव्हा अमीन सायानी ‘सर्वतोकानी’ होते. आज आपले मुकेश थळी ‘आवाज की दुनियामें’ आहेत. पण हळूहळू रेडिओ हे श्राव्य माध्यम मागे पडले अन् इडियट बॉक्सचा जमाना आहे, याचे कारण प्रत्येक गोष्टीची सद्दी काही काळच असते. हाच न्याय मुद्रित माध्यमांनाही लागू होतो. म्हणूनच रात्रंदिवस बातम्यांचा रतीब घालणार्‍या वृत्तवाहिन्या आणि फेसबुक, ट्वीटर वगैरे सोशल मीडियाच्या जोरदार प्रवाहात मुद्रित वृत्तमाध्यमे वाहून तर जाणार नाहीत ना, अशी भीती काहींना (विशेषतः जे सध्या या क्षेत्रात आहेत त्यांना) वाटणे साहजिक आहे. परंतु बदल ही एकच गोष्ट चिरंतन असते हे त्रिकालाबाधित सत्य जर ध्यानी घेतले तर नव्या माध्यमांच्या ‘ऑनस्लॉट’ मुळे हबकून जायचे कारण नाही. दहा - बारा वर्षांपूर्वी जेव्हा अखंडित न्यूज चॅनल्सचा उदय झाला, तेव्हाही आता दैनिकांचे भवितव्य काय? अशी आशंका अनेकांना वाटली होती. ती खोटी ठरली हे तर उघडच आहे. मग आजच मुद्रित वृत्तमाध्यमांच्या भवितव्याविषयी चिंता निर्माण का व्हावी?

रात्रंदिन युद्धाचा प्रसंग

शे-शंभर वर्षांपूर्वीची भारतातील पत्रकारिता ध्येयवादी होती आणि स्वातंत्र्यप्राप्ती हे तिचे प्रमुख उद्दिष्ट होते. स्वातंत्र्यानंतर तिची ‘मोख’ बदलली. स्वराज्याकडून सुराज्याकडे वाटचाल करणार्‍या नवस्वतंत्र देशाला विकासाची तहान लागली होती. तिचेच प्रतिबिंब प्रसार माध्यमांमध्ये पडलेले असायचे. मोठमोठ्या योजना आकार घेऊ लागल्या, तसतसा त्यातील भ्रष्टाचारही उघड होऊ लागला. राज्यकर्त्यांवर एका बाजूने विरोधकांचा अंकुश आणि दुसरीकडे वृत्तपत्रांचा, असे चित्र सर्रास दिसू लागले. ही परस्पर पूरकता देशहिताचीच होती. आजदेखील काही वेगळे चित्र नाही. परंतु प्रसारमाध्यमांमधील स्पर्धा अगदी गळेकापू म्हणता येईल एवढी वाढली आहे. त्यामुळे पत्रकारांच्या दृष्टीने ‘रात्रंदिन आम्हां युद्धाचा प्रसंग’ अशी स्थिती उद्भवली आहे.
वृत्तपत्रे म्हणा वा नियतकालिके किंवा अन्य प्रसार साधने घ्या, प्रतिस्पर्ध्यांपेक्षा वेगळे काही तरी देण्यासाठी धडपडत आहेत. अलगपणा राखला तरच टिकून राहू याची खात्री असल्याने धावपळ वाढली आहे. या घाईत काही वेळा चुकीचे वृत्तांकन होणे साहजिक आहे, परंतु ते विश्वासार्हता गमावून बसण्याइतके गंभीर बनले तर मात्र खरा धोका आहे.
अफवा, कंड्या, बाजारगप्पा यासाठी कोणी वृत्तपत्रे घेत नसते वा बातम्या पाहत नसते. जे अन् जसे घडले, तसे जाणून घेण्याची उत्सुकता असते. त्यासंदर्भात जेव्हा भ्रमनिरास वा अपेक्षाभंग होतो, तेव्हा वाचक/प्रेक्षक उदासीन बनतो. प्रसारमाध्यमांपुढे जर कोणते आव्हान उभे असेल, तर ते ही विश्वासार्हता टिकवण्याचे.
एक उदाहरण घेऊ. हल्लीच कालवी - हळदोणे पुलाची एक लोखंडी तुळई बांधकाम चालू असताना पडली. त्यासंबंधात उलटसुलट बातम्या आल्या. पण प्रकार गंभीर होता की साधा मामला याविषयी खोलात जाऊन माहिती देण्याचे कष्ट कोणी घेतले असे जाणवले नाही. कमकुवत बांधकाम आणि अकाली माना टाकण्यासाठी गोव्याचे पूल ओळखले जात असल्याने सर्वसामान्यांच्या मनात किंतु निर्माण झाला असेल तर त्यांचा काय दोष? त्यांना आश्‍वस्त करणे ही जरी सरकारची जबाबदारी असली, तरी वस्तुस्थितीची जाणीव करून देणे, हे प्रसारमाध्यमांचे कर्तव्य होते. त्यात आपण कमी पडलो का याचे आत्मपरीक्षण आवश्यक आहे.

कानांमागून येऊन तिखट

पारंपरिक पत्रकारिता मागे पडून कानांमागून येऊन इलेक्ट्रॉनिक प्रसार माध्यमे तिखट तर होणार नाहीत ना, अशी अनेकांना भीती वाटते, ती अनाठायी नाही, याचे कारण भारत हा तरुणांचा देश आहे आणि युवामन तर नेहमी परंपरेच्या बेड्या फोडून नावीन्याकडे धाव घेत असते. वाचनसंस्कृती दिवसेंदिवस घटत चालली आहे हे आणखी एक कारण. पीसी, लॅपटॉप वगैरे सोडून द्या. आताचा जमाना थ्रीजी, फोर जी वगैरेंचा आहे आणि सध्या आबालवृद्धांच्या हातांना जसे मोबाईल चिकटलेले असतात, तसे उद्या टॅबलेट चे झाले तर आश्‍चर्य नको. आता सरकारच जेव्हा विद्यार्थ्यांना हे सारे पुरवणार आहे, तेव्हा असंभव तरी काय? सबब, ही पिढी अशीच आधुनिक अन् सुटसुटीत माध्यमांकडे वळणार आहे हे निश्‍चित. हा धोका किंवा शक्यता लक्षात घेता वृत्तपत्रांना, खास करून दैनिकांना बदलावे लागेल.
कुमार केतकर हे मराठी वृत्तपत्रसृष्टीतील मोठे नाव. पां. वा. गाडगीळ, द्वा. भ. कर्णिक, पु. रा. बेहरे, ग. त्र्यं. माडखोलकर, माधव गडकरी, गोविंद तळवलकर यांच्या नंतर कुमार केतकरांचे स्थान असेल. कूली नं. १, बीबी नं. १, खिलाडी नं. १ असे बॉलिवूडच्या भाषेत सांगायचे तर आज घडीस ‘एडिटर नं. १’ आहेत. ते महाराष्ट्र टाइम्सचे संपादक होते, तेव्हा म्हणे टाइम्स समूहाने वाचकांचे सर्वेक्षण केले.  त्याचा निष्कर्ष असा निघाला की तरूण वाचकांना महाराष्ट्र टाइम्स आकर्षित करू शकत नाही. पुरोगामी विचारसरणी असूनदेखील नाही म्हटले तरी केतकर बिलॉंग्स टु ओल्ड स्कूल ऑफ जर्नालिझम. तेव्हा ते रातोरात कसे बदलतील? सबब, भारतकुमार राऊत यांना कार्यकारी संपादक नेमण्यात आले. परिणाम व्हायचा तो (किंवा व्यवस्थापनाला अपेक्षित) झाला. केतकर राजीनामा देऊन निघून गेले. भारतकुमारनी म. टा. त परिवर्तन केले. सुटसुटीत बातम्या आणि छोटे छोटे लेख. लेआऊट रीडर्स फ्रेंडली केला. जणू पेपरने नवे रुपडे धारण केेले. विविध थरांतील वाचकांना बांधून घेणारे उपक्रम सुरू झाले.

आलिया भोगासी..

खरे तर हे वृत्तपत्रांचे काम नव्हे. काय करणार! आलिया भोगासी... १ रुपयाने पेपर, सोबत आकर्षक भेटवस्तू या सार्‍या क्लृप्त्या चालूच आहेत. जो त्यांची कास धरणार नाही तो मागे पडेल. मनाविरुद्ध का होईना, हे उटपटांग करावे लागते. बहुतेक संपादकांचा ज्योतिषशास्त्रावर विश्वास नसतो, परंतु साप्ताहिक, वार्षिक भविष्य मात्र छापावेच लागते, कारण वाचकांची मागणी तशा तडजोडी करीत मुद्रित प्रसार माध्यमांना यापुढेही आव्हाने पेलावी लागतील. अरुण टिकेकर हा खरे तर गंभीर प्रकृतीचा पत्रकार. परंतु ‘लोकसत्ते’चे संपादक बनताच त्यांना पान पानभर सिनेनट्यांचे फोटो छापावे लागले. आपण मराठी ‘स्क्रीन’ तर वाचत नाही ना, अशी शंका यावी इतके ते बटबटीत असत. खप वाढण्यासाठी हे प्रयोग आहेत आणि ‘प्रॉडक्ट’ खपविण्यासाठी या सार्‍या खटपटी लटपटी अनिच्छेने का होईना, कराव्या लागतात. युवा वाचकवर्गाकडे डोळेझाक करून चालणार नाही, हा या पुढचा मूलमंत्र असेल. अग्रलेखांसाठी दैनिके वाचण्याचे दिवस संपले. आज सर्वेक्षण केल्यास संपादकीय वाचणारा वाचकवर्ग हा पन्नाशीच्या पुढचा आढळतो. मग ते दोन रकाने तरी कोणासाठी?

गंभीर वाचक घटतोय

कालच्या सायंदैनिकांप्रमाणे आजची दैनिके बनत चालली आहेत, कारण गंभीर वाचक कमी कमी होत आहे. यापुढे तो आणखी घटेल. मग शब्दकोडी, चित्रविचित्र, सिनेपरीक्षण, फॅशन शो यांच्यावर भर देण्याखेरीज अन्य पर्याय तरी कोणता? शेवटी जे खपते तेच द्यावे लागते. ग. वा. बेहरे यांचा ‘साप्ताहिक सोबत’आठवा. सोळा सोळा पाने मजकूर. एकही फोटो नसे. आज रविवारीच नव्हे तर सगळ्या पुरवण्या आणि अगदी दैनंदिन बातम्यांमध्येसुद्धा मजकूर तोंडी लावण्यापुरता आणि अंगावर येतील एवढी भली मोठी छायाचित्रे! सजावट हा आजच्या पत्रकारितेचा गाभा बनला आहे. मग आत्मा तडफडणार नाही तर काय? पण नाईलाज आहे. सुरवातीला म्हटले, आकाशवाणी कालबाह्य झाली. पण एफ. एम. स्टेशने जोरात चालतात, कारण तरुणाईची ती पसंती आहे. निवेदकांची नुसती चर्पटपंजरी. नाना पाटेकर किंवा गोविंदा यांची संवादशैली म्हणजे मशीनगनमधून सुटणार्‍या गोळ्या. एफ. एम. वाल्यांचे आदर्श ते. अध्येमध्ये नावापुरते गीत संगीत, तेही पाश्‍चात्त्य सुरावटींचे. कोण विचारतो लता मंगेशकरना? सुरेलपणा खुंटीला टांगला. तेच बहुधा यापुढे वृत्तपत्रांचे होईल. वाचकांच्या अभिरूचीला वळण लावण्याऐवजी त्यांच्या आवडीनिवडीप्रमाणे बदल केले नाहीत, तर वृत्तपत्रांना फार मोठी किंमत मोजावी लागेल. एकेकाळी क्रमशः स्वरूपाचे दीर्घ लेखन प्रसिद्ध व्हायचे. आज त्याकडे कोणी बघेल का? कालाय तस्मै नमः | काळाप्रमाणे बदलाल तरच टिकाल, हा नव्या जमान्याचा संदेश होय.

---

0 comments:

वाचनीय

  © Blogger templates The Professional Template by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP