माणूस मग तो कोणीही असो, केवढाही मोठा व प्रभावी असो, त्याचे बोलणे मध्यावर तोडून त्याची खरपूस हजेरी अँकरने घेतली तरी तो काही करू शकत नाही. तो आवाज उठवू शकत नाही की प्रतिहल्ला चढविण्याचा पवित्रा घेऊ शकत नाही. या वाहिन्यांनी सगळ्यांची लक्तरे पाणवठ्यावर धुतली आहेत. इंदिरा गांधींच्या काळात हे होत नव्हते. म्हणून त्यांना वृत्तपत्रांची गठडी आवळता आली. आज इंदिरा गांधी असत्या तर त्यांना या वाहिनीवाल्यांनी आणीबाणीच्या प्रश्नावर सळो की पळो करून सोडले असते.
आणीबाणी, पत्रकारिता आणि वर्तमान
सीताराम टेंगसे,
माजी संपादक, दै. राष्ट्रमत, गोवा
चाळीस वर्षांपूर्वी भारतीयांनी एक दुःस्वप्न पाहिले. तत्कालीन प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांनी अंतर्गत आणीबाणी जारी करून लोकांचे सर्व अभिव्यक्ती स्वातंत्र्य व नागरी हक्क हिरावून घेतले व संपूर्ण देश एक भला मोठा तुरुंग बनविला, हेच ते भयावह दुःस्वप्न! लोकशाही मार्गाने सत्ता हाती आल्यानंतर लोकशाही गुंडाळून ठेवून हुकुमशहा बनलेले व जनतेचे कर्दनकाळ ठरलेले जगाच्या एकंदर शंभर वर्षांच्या इतिहासात अनेक जण आहेत. इंदिरा गांधी त्यांपैकी एक.
मानसिक खच्चीकरण
देशवासियांचे दुर्दैव असे की, ४० वर्षांपूर्वी लागू करण्यात आलेल्या आणीबाणीचे आणि तिचाच भाग म्हणून भारतीयांच्या नशिबी आलेल्या गुलामगिरीचे समर्थन करणारे जे राजकारणी आहेत, तसेच ज्येष्ठ व श्रेष्ठ विद्वान पत्रकारही आहेत. भारतीयांचे पुरेसे मानसिक खच्चीकरण झाले असल्याची खात्री झाली तेव्हाच इंदिरा गांधींनी आणीबाणी उठविली होती. असे असताना इंदिरा गांधींच्या आणीबाणी उठविण्याच्या कृतीमागे त्यांची लोकशाहीवर निष्ठा असल्याचा दृष्टांत होण्याइतपत अनेक विचारवंतांच्या मनात गुलामगिरी अजूनही मुरलेली आहे, ही देशाची सर्वांत मोठी शोकांतिका होती व आहे.आत्मविश्वासावर आघात
आणीबाणीच्या सर्वंकष प्रभावामुळे भारतीयांमधील स्वातंत्र्य व लोकशाही यांचा परिणाम म्हणून उमलू लागलेल्या स्वाभिमानावर व आत्मविश्वासावर जबरदस्त आघात झाला. त्यातून चाळीस वर्षांनंतरसुद्धा पूर्णपणे बाहेर पडलेला नाही. भारतीयांची गुलामीप्रियता कधीही उफाळून येताना दिसते. वाकण्यास सांगितले असता पायावर लोळण घेण्यात धन्यता मानणार्यांचा आणीबाणीमुळे वंशविस्तार एवढा झाला की आजही सगळीकडे त्यांचा वावर दिसतो. हा सगळा आणीबाणीचा दीर्घकाळ रेंगाळत राहणार असलेला परिणाम आहे.गुलामगिरीचा प्रभाव
आणीबाणी मागे घेतल्यानंतर घेण्यात आलेल्या लोकसभा निवडणुकात ज्या जनतेने इंदिरा गांधींना व त्यांच्या कॉंग्रेस पक्षास झिडकारले होते, त्याच जनतेने त्यानंतरच्या लोकसभा निवडणुकांत आपले भवितव्य व देशाची सत्तासूत्रे इंदिरा गांधींकडे विश्वासाने सोपविली याचे कारण त्यांच्या मनावरील गुलामी वृत्तीचा प्रभाव उतरू शकला नव्हता, हे आहे. एकदा गळ्यात दावे घालून घेणे अंगवळणी पडले तर गुरे गळ्यात दावे नसताना अस्वस्थ बनतात व मानेवर नुसती दोरी टाकून दिली तरी आपल्या गळ्यात दावे आहे या समाधानाने गुरे सुरक्षितता कशी अनुभवतात हे गुराख्यांना विचारल्यास चांगले कळू शकते. त्यामुळे भारतातील लोकमत एवढ्या झटपट कसे व का इंदिरा गांधींकडे वळले त्याचा उलगडा होतो. आणीबाणीच्या सर्वंकष जबरदस्त प्रभावामुळे गमावलेला भारतीयांचा आत्मविश्वास अद्याप परत आलेला नाही.एका (महात्मा) गांधीने भारतीय जनमानसात आत्मविश्वास जागवून गुलामगिरीविरुद्ध पेटून उठण्याची प्रेरणा दिली होती आणि त्याचाच परिणाम म्हणून बलाढ्य ब्रिटीश सत्तेचा शेवट झाला होता, तर दुसर्या (इंदिरा) गांधीने आणीबाणीचा वरवंटा फिरवून भारतीयांचा कणा मोडला आणि त्यांना गुलामगिरीत ढकलले. त्या प्रभावातून भारतीय जनमानस अद्याप पूर्णपणे बाहेर येऊ शकलेले नाही. आणीबाणीचा सर्वाधिक परिणाम देशातील पत्रकारितेवर झाला. तिचा तेव्हा जो कणा मोडला तो अजून पूर्णपणे ठीक होऊ शकलेला नाही. कॉंग्रेसशिवाय दुसरा कोणताही राजकीय पक्ष सत्तेवर आल्यास देशाचे व देशवासियांचे भले होईल, देशाचा अधिक वेगाने विकास घडवून आणू शकेल असे बहुसंख्य वृत्तपत्रांना व पत्रकारांना वाटत नाही, एवढा त्यांच्या मनावर आणीबाणीचा प्रभाव अजूनही आहे.
देश स्वतंत्र झाला १९४७ मध्ये, राज्यघटना स्वीकृत होऊन लोकशाही पद्धतीने निर्वाचित सरकार देशात सत्तेवर आले १९५० मध्ये, तेव्हापासून जवळजवळ पाच दशके एकाच पक्षाच्या म्हणजे कॉंग्रेसच्या हाती देशाची सत्ता राहिली आहे. आणीबाणीचे दुःस्वप्न हा या कालखंडाचा भाग आहे. या कालखंडात देशासमोरच्या कोणत्याही समस्या सुटल्या नाहीत; उलट नव्या समस्यांची त्यात भर पडली आहे आणि त्यांच्यापैकी बहुतेक समस्या सरकारमुळे किंवा सरकारच्या नाकर्तेपणामुळे वा चुकीच्या धोरणांमुळे उद्भवल्या आहेत. स्वतंत्र, तटस्थ, निःपक्ष पत्रकारिता ही सरकारच्या चुका दाखवून त्याला योग्य मार्गावर आणण्यासाठी प्रभावी साधन ठरू शकते. पण त्यासाठी स्वातंत्र्यानंतरच्या काळात ब्रिटीश सरकारविरुद्ध भूमिका घेण्यास न कचरणारी तेजस्वी पत्रकारिता हवी आहे.
पांगळी पत्रकारिता
आणीबाणी लागू होईपर्यंत तशी पत्रकारिता देशात होती. तसे कोणत्याही प्रकारचे दबाव उघडपणे झुगारून देणारे पत्रकारही होते. आणीबाणीने पत्रकारितेलाही पांगळे बनविले. लोकानुरंजन एवढेच आपले काम आहे अशी पत्रकारितेची व पत्रकारांची भावना बदलली. ती अद्याप पूर्णपणे दूर होऊ शकलेली नाही. शिवाय आणीबाणीचा प्रत्यक्ष अनुभवसुद्धा न घेतलेले पत्रकार काल्पनिक दडपणाच्या छायेत वावरताना दिसत आहेत. प्रिंट मिडिया व इलेक्ट्रॉनिक मीडिया या दोन्ही प्रसारमाध्यमांचा सगळा भर ‘ब्रेकिंग न्यूज’वर आणिप्रेक्षकांची वा वाचकांची अभिरुची घडविण्याऐवजी बिघडविण्यावर अधिक असल्याचे जाणवत आहे.लोकशाहीला धोका
आपल्यावर चहूबाजूंनी दबाव-दडपणे आहेत. आपल्या स्वातंत्र्यावर गदा आणण्यासाठी सगळे टपून आहेत ही पत्रकारितेच्या संबंधात भीती खरी असेल तर ती लोकशाहीच्या भवितव्याच्या दृष्टीने अतिशय गंभीर आहे. कारण पत्रकारितेने जर दबाव-दडपणासमोर मान टाकली तर हितसंबंधी व्यक्ती वर्ग आणि हुकूमशाही प्रवृत्ती यांवर अंकुश ठेवण्याचे काम करणार कोण? म्हणून लोकशाहीच्या भवितव्याच्या व बळकटीच्या दृष्टीने पत्रकारिता आपले स्वातंत्र्य, दडपशाहीविरुद्ध आवाज उठविण्याची व नेहमी लोकांच्या बाजूने राहण्याची जबाबदारी व ईर्ष्या गमावून बसणार नाही याची खबरदारी घ्यावयास हवी आणि ती सरकार, हितसंबंधी वर्ग घेणार नाही. ती पत्रकारांनी, वृत्तपत्रांनी, इलेक्ट्रॉनिक वाहिन्यांनी घ्यावयास हवी.बिनचेहर्याची पत्रकारिता
भारतीय पत्रकारिता पारतंत्र्यात आग्रही व आक्रमक होती; कोणत्याही प्रकारच्या आव्हानांचा मुकाबला करण्यास व तसे करताना त्याचे परिणाम भोगण्यास एक राष्ट्रकार्य, समाजकार्य मानून सदैव तयार होती, असे स्वातंत्र्यपूर्व काळातील वृत्तपत्रांचे अंक नजरेखालून घातले तर ठळकपणे जाणवते. आज तसे दिसत नाही. पत्रकारिता अधिकाधिक एकांगी व बिनचेहर्याची बनत चालली आहे. दिशाहीनता, उथळपणा किंवा उठवळपणा हा तिचा स्थायीभाव बनू लागला आहे. कोणत्याही प्रश्नावर वाचकांना/प्रेक्षकांना यथायोग्य मार्गदर्शन करावे, त्यांना स्वतंत्रपणे विचार करण्यास शिकवावे, त्यांना पूर्वग्रहांतून बाहेर काढावे असे उद्दिष्ट दिसत नाही. राष्ट्रीय वृत्तपत्रे व सर्व प्रमुख इलेक्ट्रॉनिक वाहिन्यासुद्धा याला अपवाद नाहीत. राज्यात जिल्हा वृत्तपत्रांची अवस्था तर याहून भयंकर आहे. घटना घडामोडींच्या ताज्या बातम्या लवकरात लवकर प्रेक्षकांपर्यंत पोचविण्याची सर्वच इलेक्ट्रॉनिक वाहिन्यांमध्ये तीव्र स्पर्धा असल्याने वृत्तपत्रांची म्हणजेच पत्रकारितेची खरी कोंडी झाली आहे.विश्लेषणावर भर हवा
वाचकांना रोजच्या रोज देण्यासाठी नवीन असे वृत्तपत्रांपाशी फारच थोडे आहे. या परिस्थितीवर मात करण्यासाठी वृत्तपत्रांनी वस्तुतः घटना घडामोडींच्या बातम्या छापीत बसून उपयुक्तशून्य बनण्यापेक्षा विश्लेषणात्मक पत्रकारितेवर द्यावयास हवा. इलेक्ट्रॉनिक वाहिन्यांनी त्यातही आघाडी मारली आहे. यावर ‘पर्याय’ म्हणून ‘टाइम्स’सारख्या वृत्तपत्रांनी वृत्तासोबत आपले त्यावरील विश्लेषणात्मक भाष्य देण्याचा पायंडा पाडला आहे. घटना घडामोडीचे वृत्त जसे घडले तसे तटस्थपणे न छापता संपूर्ण बातमीचे स्वरूपच विश्लेषण व त्यावर भाष्य या स्वरूपाचे बनविण्याचा प्रयोगही काही वृत्तपत्रांनी चालविला आहे. पण अशा भाष्याला व विश्लेषणाला निश्चित दिशा व तटस्थ विचारांची बैठक नसेल तर त्यातून लोकमत घडण्याऐवजी बिघडण्याचा धोका अधिक संभवतो.अभ्यासाची भक्कम बैठक हवी
पत्रकारितेसमोर इलेक्ट्रॉनिक प्रसारमाध्यमांमुळे आव्हाने उभी राहिली आहेतच; त्याचबरोबर घटना-घडामोडीचे सम्यक आकलन ज्यांना होऊ शकते आणि ज्यांच्यापाशी विचारांची व सर्व विषयांच्या अभ्यासाची भक्कम बैठक आहे अशा पत्रकारांचा असलेला अभाव किंवा तसे पत्रकार घडविण्याच्या बाबतीत वृत्तपत्रांच्या व्यवस्थापनांची उदासीनता याचाही वृत्तपत्रांच्या प्रभावावर, उपयुक्ततेवर व विश्वासार्हतेवर बाधक परिणाम झाला आहे.वृत्तपत्रांचे बिघडते अर्थकारण
प्रिंट मीडियांकित पत्रकारितेसमोर अस्तित्व टिकविण्याचेच आव्हान उभे राहिले आहे ते त्यांचे उत्पन्नाचे स्रोत घटत चालल्यामुळे, इलेक्ट्रॉनिक मीडियाचा विस्तार व वाढता प्रभाव आणि त्यामुळे अधिकाधिक उत्पादनांच्या जाहिरातींचा त्याकडे वळलेला ओघ यांतून वृत्तपत्रांचे अर्थकारण बिघडू लागले आहे. तो ओघ प्रिंट मिडियाकडे अजूनही काही प्रमाणात आहे, याचे कारण लोकमानसावर प्रभाव पाडण्याच्या बाबतीत इलेक्ट्रॉनिक मीडियाहून प्रिंट मीडियाची उपयुक्तता आजही अधिक आहे. असे असले तरी वृत्तपत्र चालविण्यासाठी होणारा खर्च सतत वाढत असल्यामुळे वृत्तपत्रांना आपला प्रभाव व आकर्षण राखण्यासाठी व ते वाढविण्यासाठी काही तरी अन्य उपाय शोधावे लागतील. त्यातील एक उपाय म्हणजे आपला वाचक सध्या कोण आहे आणि संभाव्य नवा वाचकवर्ग कोणता होऊ शकतो याचा शोध घेऊन त्यांच्या गरजा, आवडीनिवडी, अपेक्षा, इच्छा, आकांक्षा यांच्या पूर्तीकडे लक्ष देऊन तसे स्वरूप दैनिकाच्या रोजच्या अंकासाठी ठरविणे, वाचकांना दैनिकाच्या प्रत्येक अंकात त्यांच्या अभिव्यक्तीला वाव देऊन सामावून घेणे.थोडक्यात, प्रत्येक वाचकाला तो वाचतो त्या अंकात व मजकुरात तो स्वतः दिसेल अशी काहीतरी व्यवस्था करणे हा असू शकतो. त्यासाठी ‘डेस्क’ वर काम करणार्या पत्रकारांपासून आघाडीवर काम करणार्या वार्ताहरांपर्यंत सगळ्यांना खास प्रशिक्षण देऊन घडवावे लागणार आहे. पत्रकारिता हा व्यवसाय आहेच, पण त्याचबरोबर ते एक व्रतही आहे. लोकमान्यांसारख्यांनी ते व्रत मानले व निष्ठेने चालविले म्हणून त्यांचे ‘केसरी’तील सर्व लेखन आजही अभ्यासाचा विषय ठरते. ‘जी पत्रकारिता टिकते ते साहित्य आणि जे टिकत नाही ती पत्रकारिता’ असे एका ब्रिटिश विचारवंताचे मार्मिक वचन आहे. वृत्तपत्रीय लिखाणाच्या संबंधात पत्रकारांनी लक्षात ठेवण्यासारखी ही गोष्ट आहे. त्याचबरोबर इलेक्ट्रॉनिक मीडियाचे पोहोच व प्रभावक्षेत्र कितीही वाढले तरी प्रिंट मीडियाचे - वृत्तपत्रांचे महत्त्व कधीही कमी होणार नाही, हे तेवढेच खरे आहे.
0 comments:
Post a Comment