शिलाई
'आई' हा मराठी प्रत्यय लागून धातुसाधित नाम तयार होते. 'शिलाई' या शब्दातील शेवटचे अक्षर दीर्घ असते. 'शिलाई' या शब्दात 'श'ला पहिली वेलांटी व दीर्घ 'ई' लिहावा.
पाळीव
'ईक' जसा मराठी प्रत्यय आहे, तसाच 'ईव' हाही आहे. या प्रत्ययापासूनही मराठी शब्द तयार झाले आहेत. 'पाळीव' हा त्यातीलच एक शब्द. हा शब्दही दीर्घच लिहावा आणखी काही उदाहरणे रेखीव, आखीव इत्यादी.
लखलखीत
'ईत' हा मराठी प्रत्यय लागून विशेषण तयार होते. यापासून तयार झालेले शब्द दीर्घ असतात. म्हणून 'लखलखीत' हा शब्दही दीर्घ असावा. 'चकचकीत' हेदेखील याच प्रकारचे उदाहरण आहे.
क्षणभंगुर
'क्षणात नाश पावणारे' हा क्षणभंगुर या विशेषणाचा शब्दश: अर्थ आहे. क्षणिक, अशाश्वत या अर्थांनी हा शब्द रुढ आहे. भंगुर या विशेषणाचा अर्थ भंगणारे, ठिसूळ असा आहे. क्षणभंगुर या शब्दात गला पहिला उकार, हे ध्यानात घ्यावे . (क्षणभंगूर असे लिहिणे चूक.) क्षणिक या विशेषणात 'ण'वर पहिली वेलांटी, हेही लक्षात ठेवावे. (क्षणीक असे लिहिणे चूक.)
माणुसकी
'माणूस' हे नाम आहे. या नामाला की हा प्रत्यय लावला असता 'माणुसकी' हे भाववाचक नाम तयार होते. माणूस या शब्दामध्ये जरी णला दुसरा उकार असला तरी त्याचे भाववाचक नाम बनताना त्यात ण ला पहिला उकार द्यायला विसरू नये. 'माणूसकी' असे लिहिणे चूक आहे.
शिलारस
'शिला' म्हणजे पाषाण, दगडाची चीप. 'शिलारस' म्हणजे ज्वालामुखीतून बाहणारा गरम द्रव पदार्थ, लाव्हा. या शब्दात 'श'ला दुसरी वेलांटी न देता पहिली द्यावी. 'शीलारस' असा शब्द लिहू नये.
सहस्ररश्मी
'सहस्ररश्मी' म्हणजे सूर्य. 'रश्मी' म्हणजे प्रकाश, किरण. सूर्याला सहस्र किरणे असतात म्हणून त्याला सहस्ररश्मी म्हणतात. या शब्दात 'स' ला 'र जोडावा व 'श'ला 'म' जोडावा. 'स'ला 'त्र' जोडण्याची चूक होऊ शकते.
स्तुतिपाठक
'स्तुति' म्हणजे प्रशंसा, स्तोत्र. स्तुतिपाठक म्हणजे खुशामत करणारा. 'स्तुति' हा मूळ शब्द संस्कृत आहे. यात 'त'ला पहिली वेलांटी व 'स्त'ला पहिला उकार आहे. 'स्तुती' शब्द लिहिताना मात्र 'त' ला दुसरी वेलांटी द्यावी. कारण मराठीत अंत्य अक्षर दीर्घ असते.
सुवाच्य
अक्षर सुवाच्य असावे, असे शिक्षक नेहमी सांगतात. सुवाच्य म्हणजे सहज वाचता येईल असे. यालाच स्वच्छ अक्षर असेही म्हणतात. सु + वाच्य अशी या शब्दाची फोड आहे. वाच्य, वाचन, वाचक हे शब्द एकमेकांशी निगडित आहेत. वाच्य या शब्दाचा मूळ अर्थ बोलण्यास किंवा सांगण्यास योग्य असा आहे. सुवाच्य हा शब्द अनेक जण सुवाच्च असा लिहितात; ती चूक टाळावी.
अग्रिम
अग्रिम हा शब्द इंग्रजीतील ऍडव्हान्स शब्दाला प्रतिशब्द म्हणून वापरला जातो. अग्रिम हा संस्कृतमधून आलेला शब्द आहे. अग्र या शब्दापासून तो बनला आहे. अग्रच्या अर्थांमध्ये पहिला, पुढे आलेला आदींचा समावेश आहे. 'आधीचा', पहिला, श्रेष्ठ, प्रथम पिकलेला, हे अग्रिमचे अर्थ आहेत. अग्रिम वेतन म्हणजे आगाऊ दिलेले वेतन. रक्कम या संदर्भातच या शब्दाचा प्रामुख्याने वापर होतो.
आगंतुक
अचानक आलेल्या, विशेषत: भोजनाच्या वेळी न बोलावता आलेल्या पाहुण्याच्या बाबतीत आगंतुक हा शब्द वापरला जातो. बाहेरचा, वाट चुकलेला, आकस्मिक असेही य शब्दाचे अर्थ आहेत. या शब्दातील पहिली तिन्ही अक्षरे नीट लक्षात ठेवावीत; म्हणजे हा शब्द अगांतुक, आगांतूक, आगंतूक असा लिहिण्याची चूक होणार नाही. आगंतुक खर्च म्हणजे अनपेक्षित खर्च. आगंतुक लाभ म्हणजे अचानक झालेला लाभ.
आकस्मिक
अचानक, अकल्पित, एकाएकी, अनपेक्षित हे आकस्मिक या शब्दाचे अर्थ आहेत. अकस्मात हादेखील शब्द त्याच अर्थांनी वापरला जातो. त्यात पहिले अक्षर अ आहे; मात्र आकस्मिकमध्ये पहिले अक्षर 'आ' आहे, हे ध्यानात ठेवावे. आकस्मिकमध्ये स्मवर पहिली वेलांटी आहे. (आकस्मीक असे लिहिणे चूक.) आकस्मिक ऐवजी आकस्मित असे लिहिण्याची चूक होऊ शकते, तीही टाळावी.
अजित
अजित म्हणजे अजिंक्य. जित म्हणजे पराभूत; जिंकला गेलेला. त्याच्या उलट अर्थांचा शब्द अजित(अ + जित). विष्णू, शिव, बुद्ध असेही 'अजित'चे अर्थ आहेत. या शब्दात 'ज'वर पहिली वेलांटी आहे. चुकून ती दुसरी दिली गेली, तर अर्थ बदलतो. 'अजीत'चा अर्थ 'न कोमेजलेले' असा आहे. अपराजित याही शब्दाचा अर्थ अजिंक्य. 'अपराजित'मध्येही जवर पहिली वेलांटी आहे.
अत्युच्च
अतिउच्च अशी अत्युच्च या शब्दाची फोड आहे. दोन्ही शब्द संस्कृतमधून आले आहेत. फार, अधिक, जास्त, अतिशय हे अतिचे अर्थ आहेत. उच्च म्हणजे उंच. अत्युच्चमधील दोन्ही जोडाक्षरे नीट लक्षात ठेवावीत. हा शब्द अत्त्युच्च असा लिहिणे चुकीचे आहे. (तची दुरुक्ती नाही.) अखेरचे अक्षर च्य असे लिहिण्याची चूक (अत्युच्य) टाळावी. काहींच्या हातून दोन्ही चुका (अत्त्युच्य) होऊ शकतात. शब्दाची फोड लक्षात घ्यावी.
अतीत
अतीत म्हणजे होऊन गेलेले, दूर गेलेले. मागे टाकणारे असाही त्याचा एक अर्थ आहे. कालातीत म्हणजे काळाला मागे टाकणारे; काळापलीकडचे. शब्दातीत म्हणजे शब्दांच्या पलीकडचे. अतीत, कालातीत, शब्दातीत या सर्व शब्दांत तवर दुसरी वेलांटी आहे हे लक्षात घ्यावे. (अतित, कालातित, शब्दातित असे लिहिणे चुकीचे.) व्यतीत हाही शब्दाचा अर्थ होऊन गेलेले असा आहे. त्याही शब्दात ती दीर्घ आहे.
आधिक्य
अधिक या विशेषणापासून आधिक्य हे भाववाचक नाम बनले आहे. अधिक म्हणजे जास्त, हे आपल्याला माहीत आहे. अतिशय, जोराचे, श्रेष्ठ हेदेखील 'अधिक'चे अर्थ आहेत. आधिक्य म्हणजे आधिकपणा, श्रेष्ठत्व. 'आधिक्य'मध्ये पहिले अक्षर 'आ' आहे; 'अ' नव्हे, हे ध्यानात घ्यावे. निवडणुकीच्या निकालासंदर्भात 'मताधिक्य' हा शब्द तुमच्या वाचनात आला असेल. 'मत+आधिक्य' अशी त्याची फोड आहे.
अधीक्षक
अधीक्षक या शब्दाचा खरा अर्थ देखरेख करणारा. हे सरकारी विभागांतील वा खासगी संस्थांमधील एक अधिकारपद आहे. सुपरिंटेंडंट या शब्दाला हा प्रतिशब्द आहे. अधि+ ईक्षक अशी याची फोड आहे. ईक्षक म्हणजे पाहणारा. अधिया उपसर्गाचा अर्थ वर, वरच्या बाजूस असा आहे. अधीक्षक या शब्दात ध वर दुसरी वेलांटी आहे, हे लक्षात ठेवावे. (अधिक्षक असे लिहिणे चूक.)
अध्याहृत
अध्याहृत या शब्दाचा अर्थ गृहीत धरलेले . त्याचा उल्लेख प्रत्यक्ष केलेला नसतो; पण अर्थ समजून घेताना ते लक्षात घ्यायचे असते. हा शब्द लिहिताना त्यातील ध्या ऐवजी ध्य लिहिले जाण्याची चूक होऊ शकते. (अध्यहृत); ती टाळावी. अध्याह्रत, अध्याऋत, अध्यारूत अशाही चुका होण्याची शक्यता असते. त्या टाळण्यासाठी हृ हे अक्षर नीट लक्षात ठेवावे . या शब्दाचे पहिले अक्षर 'आ' नसून 'अ' आहे, हेही ध्यानात घ्यावे.
अनसूया
अनसूया हे नाव तुम्ही ऎकले असेल. अनुसया असाही शब्द ऎकला असेल. अनुसया हा अनसूया चा अपभ्रंश. अनसूया हा शब्द शुद्ध. तो लक्षात राहण्यासाठी त्याची फोड (अन् + असूया) लक्षात घ्यावी. यात न् आणि अ यांचा संधी होऊन न झाला आहे. अन् हा नकारार्थी उपसर्ग. असूया म्हणजे मत्सर, निंदा. अनसूया म्हणजे निर्मत्सरी, निष्कपटी. अनसूयक या विशेषणाचाही तोच अर्थ आहे.
अनिर्वचनीय
अनिर्वचनीयचा अर्थ आहे अवर्णनीय. अनिर्वाच्य असाही शब्द याच अर्थाने वापरतात. एखाद्या गोष्टीचे वर्णन शब्दांत करणे अवघड असते तेव्हा केवळ अवर्णनीय असे म्हटले जाते. हा शब्द लिहिताना अनिरवचनीय, अनीर्वचनीय, अर्निवचनीय असा चुकीचा लिहिला जाण्याची शक्यता असते. नला पहिली वेलांटी व रफार ववरच द्यावा.
अनिल
अनिल म्हणजे वारा. विष्णू असाही त्याचा एक अर्थ आहे. मराठीत अनिल हे विशेषनाम म्हणून प्रसिद्ध आहे. उच्चारणात चूक होऊन हा शब्द 'अनील' असा चुकीचा लिहीला जाण्याचीही शक्यता असते. अनिल आणि सुनील ही नावे अनेक जण जोडीसारखी वापरतात; पण 'सुनीलमध्ये' नवर दुसरी वेलांटी आहे. 'सुनील'चा संबध नीलवर्णाशी आहे. 'नील'मध्ये पहिले अक्षर दीर्घच असते.
अनिष्ट
अनिष्ट या विशेषणाच्या अर्थांमध्ये अप्रिय, अहितकारक, अयोग्य आदींचा समावेश आहे. अनिष्ट हा शब्द चुकून अनिष्ठ असा लिहिला जाण्याची शक्यता असते. या शब्दात ठ नसून ट आहे, हे लक्षात ठेवावे. इष्ट च्या विरुद्ध अनिष्ट असेही लक्षात ठेवावे. (इच्छिलेले,योग्य,हितकारक हे इष्ट चे अर्थ आहेत.) अनिष्ट हे नामदेखील आहे. त्याचा अर्थ संकट, नुकसान असा होतो.
आनुषंगिक
अनुषंग म्हणजे निकटचा संबध; साहचर्य. त्यावरुन आनुषंगिक हा शब्द तयार झाला. 'अनुषंगमधील पहिले अक्षर 'अ' असले, तरी 'आनुषंगिक'मधील पहिले अक्षर 'आ' आहे, हे ध्यानात ठेवावे. या शब्दातील 'ष' षट्कोनातला आहे; शहामृगातला नव्हे. या शब्दात 'ग'वर पहिली वेलांटी अहे, हेही लक्षात घ्यावे. 'आनुषंगिक'चा अर्थ तत्संबंधी, बरोबर येणारा असा आहे. गौण, बेताचा हेही या शब्दाचे अन्य अर्थ आहेत.
बहुश्रुत
अनेक विषयांचे ज्ञान असलेला, विद्वान हे बहुश्रुत या शब्दाचे अर्थ आहेत. हा शब्द चुकून बहूश्रुत असा लिहिला जाण्याची शक्यता असते. ती टाळण्यासाठी बहु + श्रुत ही या शब्दाची फोड लक्षात ठेवावी. बहु या शब्दाचे अर्थ पुष्कळ, मोठा असे आहेत. श्रुत म्हणजे ऎकलेले, जाणलेले. ज्याने खूप जाणलेले असते, खूप ऎकलेले असते, तो बहुश्रुत.
सूर्योदय
अनेक शब्द आपल्या अतिशय परिचयाचे असतात; मात्र ते लिहिताना र्हस्व-दीर्घाबाबत अनेकांचा गोंधळ होतो. सूर्योदय हा असाच शब्द आहे. सूर्य या शब्दात सला दुसरा उकार आहे आणि त्या शब्दापासून बनणाऱ्या अन्य शब्दांतही तो बदलत नाही, हे लक्षात ठेवावे. (उदाहरणार्थ - सूर्योदय, सूर्यास्त, सूर्यनमस्कार). सूर्य या शब्दाच्या सामान्यरूपातही उकार बदलत नाही. (उदाहरनार्थ - सूर्याचे, सूर्यावर).
अपर
अपर हा संस्कृतमधून आलेला शब्द आहे. अधिक, दुसरा, नंतरचा इत्यादी अर्थांनी तो वापरला जातो.पश्चिमेकडीलअसाही त्याचा एक अर्थ आहे. त्यावरूनच अपरांत (कोकण) हा शब्द बनला आहे. सरकारी अधिकार्यांच्या काही पदांमध्ये अतिरिक्त या अर्थी अपर हा शब्द वापरला जातो. ( उदाहरणार्थ अपर जिल्हाधिकारी). 'अप्पर' या इंग्रजी शब्दाचा अपरशी काहीही सबंध नाही, हे ध्यानात घ्यावे.
अपरिमित
अपरिमित म्हणजे अमर्यादित; अतोनात. परिमित म्हणजे मर्यादित. त्यामागे अ हा नकारार्थी उपसर्ग लागून अपरिमित हा शब्द तयार झाला आहे. त्यातील र व म या दोन्ही अक्षरांवर पहिली वेलांटी आहे. हा शब्द अपरिमीत असा लिहिण्याची चूक होऊ शकते; ती टाळावी. मित या शब्दाचाही अर्थ मर्यादित असा होतो. परिमिती (मूळ संस्कृत शब्द परिमिति) म्हणजे मर्यादा.
अमानुष
अमानुषचा अर्थ मनुष्याच्या शक्तीबाहेरचे , मनुष्याला न शोभणारे, मानवी गुण नसलेले, अद्भुत असा आहे. यातील नला पहिला उकार व शेवटचे अक्षर शहामृगातला श नसून षट्कोनातला ष आहे हे लक्षात ठेवावे . अमानूश असे लिहिणे चूक. हा शब्द संस्कृत (तत्सम) आहे.
अरिष्ट
अरिष्ट या संस्कृत शब्दाचे अनेक अर्थ आहेत. आपत्ती या अर्थी तो मराठीत वापरला जातो. 'अरिष्ट' कोसळणे असा शब्दप्रयोग केला जातो, विशिष्ट प्रक्रियेनंतर जे औषध तयार केले जाते, त्यालाही अरिष्ट असे म्हणतात. या शब्दात 'अ' ऐवजी 'आ' लिहिला जाण्याची चूक संभवते, तसेच 'र'ला चुकून दुसरी वेलांटी दिली जाण्याचीही शक्यता असते. या दोन्ही चुका होणार नाहीत, असे पाहावे.
प्रदूषण
अलीकडच्या काळात प्रदूषण हा शब्द मोठ्या प्रमाणावर रूढ झाला आहे. इंग्रजीतील पोल्युशनला हा प्रतिशब्द आहे. हवा, पाणी इत्यादी दूषित होण्याची क्रिया त्यातून व्यक्त होते. दूषण या शब्दाच्या अर्थांमध्ये बिघाड, दोष असेही अर्थ आहेत. दूषण मागे प्र हा उपसर्ग लावून प्रदूषण हा शब्द तयार झाला. यात द ला दुसरा उकार आहे आणि सामान्यरूपातही तो दुसराच राहतो. उदाहरणार्थ प्रदूषणाचे, प्रदूषणामुळे इत्यादी.
माध्यम चर्चा
पत्रकार मित्रांच्या आपल्या क्षेत्राबद्दलच्या जाणिवा अधिक प्रगल्भ व्हाव्यात या उद्देशाने हा ब्लॉग तयार करण्यात आला आहे. या ब्लॉगवर समाविष्ट करण्यासारखी माहिती आपल्या नजरेस आली, किंवा या ब्लॉगवरील एखाद्या लेखाविषयी प्रतिक्रिया द्यावीशी वाटली तर जरूर कळवा - goa.paresh@gmail.com
Friday, March 16, 2007
Subscribe to:
Post Comments (Atom)
0 comments:
Post a Comment