मराठी पत्रकार

गोव्याच्या दैनिक नवप्रभाचे संपादक श्री. परेश प्रभू यांचा हा अधिकृत ब्लॉग समस्त पत्रकार मित्रांसाठी...

माध्यम चर्चा

पत्रकार मित्रांच्या आपल्या क्षेत्राबद्दलच्या जाणिवा अधिक प्रगल्भ व्हाव्यात या उद्देशाने हा ब्लॉग तयार करण्यात आला आहे. या ब्लॉगवर समाविष्ट करण्यासारखी माहिती आपल्या नजरेस आली, किंवा या ब्लॉगवरील एखाद्या लेखाविषयी प्रतिक्रिया द्यावीशी वाटली तर जरूर कळवा - goa.paresh@gmail.com


Friday, March 16, 2007

योग्य व अयोग्य शब्दांची सूची

नेहमीच्या लेखनात येणारे अनेक शब्द कित्येकदा चुकीच्या अर्थाने वापरले जातात वा चुकीच्या पद्धतीने लिहिले जातात. पत्रकारांनी आपली भाषा बिनचूक राहील याची दक्षता घेण्याची गरज आहे, कारण वर्तमानपत्रे वाचणारा वाचक छापील शब्दांना प्रमाण मानत असतो.


अलीकडे व पलीकडे

अलीकडे व पलीकडे हे परस्परविरोधी अर्थाचे शब्द आहेत. आपल्या बोलण्या-लिहिण्यात ते नेहमी येतात. अलीकडे म्हणजे या बाजूला, पुढील बाजूला. काळासंदर्भात अलीकडेचा अर्थ हल्ली. पलीकडे म्हणजे दुसऱ्या बाजूला, मागील बाजूला. अलीकडे व पलीकडे हे शब्द अलिकडे व पलिकडे असे लिहिण्याची चूक अनेकांकडून होते. दोन्ही शब्दांत ल वर दुसरी वेलांटी द्यायची, हे लक्षात ठेवावे.

अक्रीत
असंभवनीय, उफराटे या अर्थांनी अक्रीत हा शब्द वापरला जातो. प्रतिकूल, मोफत, विपरीत, अतिशय, बेसुमार हेदेखील त्याचे अर्थ आहेत. हा शब्द चुकून आक्रित , अक्रित वा आक्रीत असा लिहिला जाण्याची शक्यता असते. या शब्दातील पहिले अक्षर आ नसून अ आहे; तसेच क्र वर दुसरी वेलांटी आहे; हे ध्यानात टेवावे. अक्रीत घेणे म्हणजे एखादी वस्तू बेसुमार किंमत देऊन विकत घेणे.

असुर
असुर म्हणजे दैत्य, राक्षस, सुर म्हणजे देव. सुर आणि असुर या दोन्ही शब्दांत सला पहिला उकार आहे. उच्चारताना 'असूर' अशी चूक होऊ शकते व त्यामुळे लिहितानाही ती होते; ती टाळावी. आसुरी म्हणजे राक्षसी. (उदाहरणार्थ आसुरी आनंद, आसुरी उपाय इत्यादी). त्याही शब्दात सला पहिला उकार आहे. सूर (सू दीर्घ) हा शब्द संगीतातील स्वर या अर्थी रूढ आहे.

अस्थिपंजर
अस्थि म्हणजे हाड. पंजर म्हणजे पिंजरा, सापळा. अस्थिपंजर या शब्दांची फोड अस्थि+ पंजर अशी होते. हा मूळ शब्द संस्कृत आहे. म्हणून सामासिक शब्दात तो ऱ्हस्वान्तच लिहावा. अस्थीपंजर असे लिहू नये. अस्थिपंजरचा अर्थ हाडांचा सापळा.

अहल्या
अहल्या हे नाव पुराण काळापासून प्रसिद्ध आहे. गौतम ऋषींच्या पत्नीचे नाव अहल्या होते. अ + हल्या अशी याची फोड आहे. हल्य या शब्दाचा अर्थ निंद्य. जी निंद्य नाही, ती अहल्या. या शब्दाऐवजी अहिल्या असा शब्द वापरल्याचेही तुम्हाला आढळेल. तो अपभ्रंश आहे. अहल्या हा शब्द वापरणे योग्य कसे, हे त्याच्या अर्थावरून स्पष्ट होते.

आख्यायिका
आख्यायिका म्हणजे दंतकथा; परंपरेने चालत आलेली गोष्ट. साधारणत: ऐतिहासिक आधार नसलेल्या गोष्टीला आख्यायिका म्हटले जाते. या शब्दात पहिले अक्षर अ नसून आ आहे, हे ध्यानात ठेवावे. (अख्यायिका असे लिहिणे चूक.) यातील तिसर्‍या अक्षराच्या बाबतीत चूक होऊन यिऐवजी इ हे अक्षर वापरले जाऊ शकते. (आख्याइका असे लिहिणे चूक आहे, हेही लक्षात ठेवावे.)

आगाऊ
आगाऊ हे विशेषण व क्रियाविशेषण म्हणून वापरले जाते. विशेषण म्हणून ते वापरले, तर आधीचा असा त्याचा एक अर्थ होतो आणि प्रौढी मिरविणारा वा दुढ्ढाचार्य असाही अर्थ होतो. क्रियाविशेषण म्हणून ते वापरले, तर आधी, प्रथम हे अर्थ होतात. आगाऊ हा शब्द अगाऊ असाही लिहिला जातो. अगावू वा आगावू असा तो लिहिणे मात्र चुकीचे आहे.

आग्नेय
आग्नेय हे एका दिशेचे नाव. पूर्व व दक्षिण या दिशांच्या मधील दिशा आग्नेय. या शब्दाचे पहिले अक्षर चुकून अ असे उच्चारले जाते व लिहितानाही ती चूक (अग्नेय) होऊ शकते. ती टाळण्याची काळजी घ्यावी. आग्नेय या संस्कृत शब्दाचे अनेक अर्थ आहेत. अग्निपूजक, अग्निवंशज, ज्वालाग्राही आदींचा त्यात समावेश आहे. आग्नेयी या संस्कृत शब्दाचा अर्थ आग्नेय दिशा व प्रतिपदा असाही होतो.

आजीव
आजीव या शब्दाची फोड 'आ + जीव' अशी आहे. 'आ' या उपसर्गाचा 'पर्यंत' हा एक अर्थ आहे. आजीव म्हणजे जिवंत असेपर्यंत; म्हणजेच आयुष्यभर. आजीव सदस्य म्हणजे तहहयात सदस्य. आजीव या शब्दात पहिले अक्षर 'आ आहे; 'अ' नव्हे. हा शब्द चुकून 'अजीव' असा लिहिला गेला, तर त्याचा अर्थ 'निर्जीव' असा होईल. आजीव या शब्दात 'ज'वर दुसरी वेलांटी आहे, हेही लक्षात ठेवावे.

आतुर
आतुर या शब्दाचे अर्थ अनेक आहेत. उत्सुक, उतावीळ , उद्युक्त, व्यथित आदींचा त्यांत समावेश आहे. या शब्दात तला पहिला उकार आहे. (आतूर असे लिहिणे चूक.) आतुरता म्हणजे उत्सुकता . आतुरतामध्येही तु र्‍हस्व आहे. चिंतातुर (चिंता + आतुर) म्हणजे चिंताग्रस्त; चिंतेने व्यथित झालेला. अर्थातुर (अर्थ + आतुर) म्हणजे पैशासाठी उत्सुक असलेला. याही शब्दांत तच्या उकारात बदल होत नाही.

0 comments:

वाचनीय

  © Blogger templates The Professional Template by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP