मराठी पत्रकार

गोव्याच्या दैनिक नवप्रभाचे संपादक श्री. परेश प्रभू यांचा हा अधिकृत ब्लॉग समस्त पत्रकार मित्रांसाठी...

माध्यम चर्चा

पत्रकार मित्रांच्या आपल्या क्षेत्राबद्दलच्या जाणिवा अधिक प्रगल्भ व्हाव्यात या उद्देशाने हा ब्लॉग तयार करण्यात आला आहे. या ब्लॉगवर समाविष्ट करण्यासारखी माहिती आपल्या नजरेस आली, किंवा या ब्लॉगवरील एखाद्या लेखाविषयी प्रतिक्रिया द्यावीशी वाटली तर जरूर कळवा - goa.paresh@gmail.com


Friday, August 16, 2013


डिजिटल युग बदलतेय ज्ञानार्जनाची संस्कृती


या डिजिटल माध्यमांना मर्यादा नाही. ते अमर्याद ज्ञानाचे खजिने आहेत. या रेसमध्ये टिकायचे असेल तर आपणास ‘जुने तेचे सोने’ म्हणून त्याला मिठी मारून बसता येणार नाही. छापील वृत्तपत्रे वा पुस्तकांचे महत्व कमी होणार नाही. केवळ ते वाचण्याची उपकरणे बदलतील, बदलत आहेत, बदललेली आहेत. त्यानुसार आपणालाही बदलावे लागेल.


- संदेश प्रभुदेसाई, 

संपादक, गोवान्यूज.कॉम


ऑगस्ट महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात एक धक्कादायक बातमी वाचायला मिळाली. अमेरिकेतील ‘वॉशिंग्टन पोस्ट’ हे वृत्तपत्र ‘अमेझॉन.कॉम’ या इंटरनेटवरील ई-शॉपिंग करणार्‍या जगप्रसिद्ध वेबसाईटचे संस्थापक मालक जेफ बेझोस यांनी २५ कोटी डॉलरना विकत घेतले. गेली १३६ वर्षे चालणार्‍या या वृत्तपत्राची परंपरा फारच प्रेरणादायक आहे. १९७० साली या वृत्तपत्राच्या बॉब वूडवर्ड व कार्ल बर्नस्टाईन या दोन पत्रकारांनी शोधपत्रकारितेतून ‘वॉटरगेट’ प्रकरण फोडले होते व त्यामुळे अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष रीचर्ड निक्सन यांना राजीनामा द्यावा लागला होता. गेल्या वीस वर्षांत या वृत्तपत्राच्या छापील आवृत्तीचा खप ८ लाखांवरून ४ लाखांवर घसरला. गेली सात वर्षे त्यांचे जाहिरातीचे उत्पन्न सातत्याने घसरतच आहे. आज ते केवळ साडेपाच कोटी डॉलर्स आहे. अवघ्या एका वर्षात या वृत्तपत्राचे एकूण उत्पन्न २८ कोटी डॉलर्सवरून अवघ्या १३ कोटी डॉलरवर घसरले आहे. इंटरनेटच्या युगात वावरणारे बेझोस आता ‘वॉशिंग्टन पोस्ट’ छापील वृत्तपत्र म्हणून चालविणार की केवळ इंटरनेट आवृत्तीच चालवणार याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागून राहिलेले आहे. कारण गेली ८० वर्षे प्रभावी पत्रकारितेचे उदाहरण संपूर्ण जगाला घालून देणार्‍या ‘न्यूजवीक’ या नियतकालिकाची छापील आवृत्ती या वर्षाच्या सुरवातीपासून कायमची बंद करण्यात आलेली आहे. सुमारे दीड कोटी नवीन वाचक ‘न्यूजवीक’ची इंटरनेट आवृत्ती वाचण्यासाठी भेट देतात. एका वर्षात  इंटरनेटवरील त्यांच्या हिट्स ७० टक्क्‌यांनी वाढल्या. मात्र दुसर्‍या बाजूने छापील आवृत्तीचा खप प्रचंड प्रमाणात घसरत गेला. म्हणूनच त्यांनी हा निर्णय घेतला.
अमेरिकेच्या ५० राज्यांमध्ये  मिळून सुमारे ३३०० वृत्तपत्रे चालतात. त्यातील १६६ वृत्तपत्रे गेल्या दोन वर्षांत कायमची बंद झाली. जवळजवळ ३५ हजार वृत्तपत्र कर्मचार्‍यांवर बेकारीची कुर्‍हाड कोसळली. ‘यूएसए टुडे’ हे अमेरिकेतील सर्वाधिक खपाचे वृत्तपत्र १७ लाख लोक विकत घेऊन वाचतात तर ‘न्यूयॉर्क टाइम्स’ ची डिजिटल आवृत्ती आठ लाखांच्या घरात वर्गणी देऊन इंटरनेटवर वाचली जाते. अमेरिकेसारख्या प्रगत राष्ट्रामध्ये कागदावरील वाचनाची जागा आता संगणक, टॅब्लेट व मोबाईलने घेतलेली आहे. यातील अवघीच काही वृत्तपत्रे इंटरनेट आवृत्तीसाठी मासिक वर्गणी घेतात, मात्र बहुतेक सगळी वृत्तपत्रे वा मासिके विनामूल्य वाचकांना उपलब्ध करून देतात. अशावेळी वृत्तपत्र विकत घेऊन वाचणारे कमी होत गेले तर त्यात नवल काय?

इंटरनेट वापरात भारत तृतीय स्थानी

लोकसंख्येच्या दृष्टीने बघितल्यास जागतिक पातळीवर इंटरनेटचा सर्वाधिक वापर चीनमध्ये केला जातो. सुमारे ५७ कोटी लोक इंटरनेट वापरतात, परंतु लोकसंख्येच्या प्रमाणात केवळ ४२ टक्के. दुसर्‍या क्रमांकावर अमेरिकेचा नंबर लागतो. २५ कोटी लोक इंटरनेट वापरणार्‍या या देशात टक्केवारीच्या प्रमाणातही अमेरिकेत ८१ टक्के लोक इंटरनेटवर असतात. तिसरा क्रमांक लागतो भारताचा. आपल्या देशात १५ कोटी लोक इंटरनेटचा वापर करतात. मात्र लोकसंख्येच्या प्रमाणात केवळ १३ टक्के. २०११ च्या जनगणनेनुसार हे प्रमाण केवळ तीन टक्के घरांमध्ये केंद्रित झालेले आहे. त्यात कार्यालयांचाही समावेश आहे. गोव्यात हेच प्रमाण नेमके उलटे आहे. इथे १३ टक्के घरांमध्ये इंटरनेटचा वापर होतो. म्हणजे तीन लाखांतील सुमारे ४१ हजार घरे. मात्र भारतात मोबाईल वापरणार्‍यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. जनगणनेनुसार ६० टक्क्‌यांच्या जवळपास लोक मोबाईल वापरतात. गोव्यात अडीच लाख घरांतून मोबाईल आहेत.
आज काल बोलण्याशिवाय इतर कित्येक गोष्टी मोबाईलवर होतात. त्यात तो स्मार्ट फोन असला तर त्यावर इंटरनेट, ईमेल आणि जीपीआरएस वा थ्रीजीवर चालणार्‍या मोबाईलवरील एप्लिकेशन्स आणखीही कित्येक गोष्टी स्वस्तात मिळवून देतात. शिवाय तोच मोबाईल वा टॅब्लेट कार्यालय वा घरातील वायफायशी जोडलेला असल्यास टीव्ही चॅनल्स धरून सगळ्या गोष्टी फुकटात वाचायला, ऐकायला वा बघायला मिळतात. १२६ कोटींच्या आमच्या देशात आज ४३ कोटी युवक आहेत. म्हणजे प्रत्येक तिसरी व्यक्ती युवा आहे. २०२१ पर्यंत युवकांची संख्या ४७ कोटींवर जाईल असा अंदाज आहे. म्हणजे जगातील सर्वांत युवा देश असेल भारत. ही संपूर्ण पिढी इंटरनेट, मोबाईल वा टॅब्लेटमय झालेली आहे. ही युवा पिढी वाचत नाही हा समज पूर्ण चुकीचा आहे. उलट तो कालच्या पिढीहूनही जास्त वाचतो. परंतु सर्व काही फेसबूकसारख्या सोशल नेटवर्कवर अथवा मोबाईल वा टॅब्लेटवर. ई-बूक वाचणार्‍यांची संख्या तर दिवसेंदिवस वाढतच आहे. तिथे त्यांना वृत्तपत्रातील बातम्याही मिळतात आणि त्याशिवाय वृत्तपत्रांत येत नाहीत अशाही बातम्या तिथे चघळल्या जातात.

फेसबुकची वाचन संस्कृती

फेसबुकवर आपण ओळखतच नसतो अशी जगभरातल्या ‘मित्रां’ची एक साखळी तयार होते. त्याद्वारे एकाने टाकलेला ‘स्टेटस’ या साखळीद्वारे ‘व्हायरल’ होऊन पसरत जातो. त्यात वैयक्तिक गोष्टी असतात, कुटुंबातल्या असतात, मित्र परिवारातल्या असतात, संस्था वा कार्यालयीन असतात व शिवाय सामाजिक विषयांशी संबंधितही असतात. त्यावर मुक्तकंठाने चर्चा होते. एकमेकांचे कौतुक व वादविवादही होतात. हे सगळे मित्र कधीकधी एकामेकांवर तुटूनही पडतात. वेगवेगळ्या विषयांवर गट तयार केले जातात. वेगवेगळ्या संस्थांची पाने तयार केली जातात. ती ‘लाईक’ केली की आपण त्या गटांचे वा पानांचे सभासद होतो. तिथे तर कित्येक गंभीर विषयांवर उलटसुलट चर्चा होतात.
या डिजिटल चमत्कारातून भारतातले पहिले जनआंदोलन उभे राहिले ते गोव्यात. प्राथमिक शिक्षणाच्या माध्यमाच्या प्रश्नावर गोमंतकीय युवकांनी ग्रूप तयार केला आणि व अवघ्या दोन दिवसांत त्याचे दहा हजार सभासद झाले. त्यातूनच त्यांनी आंदोलन उभे केले. पथनाट्याची स्क्रीप्ट त्यांनी फेसबुकवर टाकली आणि गोव्यात तीन ठिकाणी नटसंच उभे राहिले. प्रमोद मुतालिकांच्या श्रीराम सेनेला गोव्यात येण्यास विरोध करणारा असाच एक ग्रूप फेसबुकवर तयार झाला आणि त्यातून त्यांच्या बैठका होऊन आणखीन एक आंदोलन उभे राहिले. त्याची दखल घेऊन सरकारला भूमिका घ्यावी लागली. लोकपाल विधेयकासाठी अण्णा हजारेंनी दिल्लीत आंदोलन उभारले, तेही असेच सोशल मीडिया नेटवर्कमधून भारतभर पसरले आणि लाखो युवक रस्त्यावर उतरले. अर्थात, त्यात इंटरनेटहूनही जास्त प्रभाव पडला तो टीव्ही चॅनल्सचा. तरीही एका फेसबुकवरील ‘इंडिया अगेन्स्ट करप्शन’च्या पानाचे भारतभरातून १० लाख सदस्य आजसुद्धा आहेत.

टीव्ही वाहिन्याही होतायत डिजिटल

एका बाजूने इंटरनेटचा असा प्रभाव दिवसेंदिवस वाढतच चाललेला आहे तर दुसर्‍या बाजूने टीव्ही वाहिन्यांनी आपल्या आयुष्याची परिक्रमाच उलटीपालटी करून टाकलेली आहे. भारतात दीडशेहून जास्त चॅनल्स बातम्यांचे आहेत. सर्वाधिक ५४ चॅनल्स एका हिंदी भाषेतील आहेत. इंग्रजी न्यूज चॅनल्स आहेत २०. त्यानंतर तेलगू १६, तामीळ १०, कन्नड व बंगाली प्रत्येकी ८, मराठी, गुजराती, आसामी व मल्याळम प्रत्येकी ७ तर पाचाहून कमी. जवळजवळ सगळ्याच भारतीय प्रादेशिक भाषांतून आहेत. जगभरातील मंदीच्या लाटेचा फटका भारताला बसला त्याच वर्षी दिल्लीत एक भोजपुरीतील बातम्यांचा चॅनल सुरू झाला व वर्षभरात त्याने नफासुद्धा कमावला.
हे सगळे सॅटेलाईट चॅनल्स. त्या मानाने एकही सॅटेलाईट चॅनल उभा राहू शकला नाही तो गोव्यात. इथले केबलवर चालणारे चॅनलसुद्धा प्रचंड तोट्यात चालत आहेत. अत्यंत कमी कर्मचारीवर्ग घेऊन चालवलेले चॅनल्स तेवढे थोडाफार नफा कमावू शकतात. परंतु हा नियम नव्हे; गोवा हा अपवाद. मात्र या टीव्ही चॅनल्सनीही आज स्वतःच्या वेबसाईट तयार केलेल्या आहेत. त्यावर छापील मजकूरही असतो आणि व्हिडियोही. शिवाय काही राष्ट्रीय पातळीवरील चॅनल्सना टेलिव्हिजन रेटिंग पॉइंट्स जेवढे मिळत नाहीत, त्याहून जास्त हिट्स त्यांच्या वेबसाईटना मिळतात. शिवाय आता मोबाईल आणि टॅब्लेटवरही हे चॅनल्स सहजगत्या मिळतात. आजच्या घडीला त्यांची डाउनलोडिंग किंमत जरा महाग आहे. परंतु वाय फाय असल्यास ही किंमत लागत नाही. आणि उद्या डायरेक्ट डाउनलोडिंगसुद्धा स्वस्त केल्याशिवाय पर्यायच राहणार नाही.

वृत्तपत्रांचे इंटरनेटीकरण अपरिहार्य

या सगळ्या पार्श्वभूमीवर भारतात आजच्या घडीस छापील वृत्तपत्रांचेच राज्य चालते. आठ हजारांच्या आसपास हिंदी वृत्तपत्रांचा वाचक आहे १६ कोटी. दीड हजारांच्या आसपास असलेली इंग्रजी वृत्तपत्रे साडेपाच कोटी लोक वाचतात. त्यानंतर क्रमांक लागतो तो हजारभर ऊर्दू वृत्तपत्रांचा. त्यानंतर गुजराती ७६१, तेलगू ६०३, मराठी ५२१, बंगाली ४७२, तामीळ २७२, उडिया २४५, कन्नड २००, मल्याळम १९२ अशी ही आकडेवारी कमी होत जाते. परंतु सर्वच भारतीय भाषांतील वृत्तपत्रे मिळून सुमारे ३३ कोटी लोक अजूनही कागदावरील वृत्तपत्रे वाचतात. मात्र वृद्ध वाचक मरण पावला तर त्या प्रमाणात नवीन युवक वाचक तयार होत नाही. त्यामुळे हा वाचकवर्ग दिवसेंदिवस कमी होत चालला आहे हेही तेवढेच सत्य आहे.
दुसर्‍या बाजूने बहुतेक सर्वच वृत्तपत्रांना आपली डिजिटल आवृत्ती इंटरनेटवर आणण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. तीही दोन प्रकारांची. एक रोजचे वृत्तपत्र जशास तसे ई-पेपर म्हणून वृत्तपत्राच्या वेबसाईटवर लोड करणे व दुसरी सातत्याने बातम्या अपडेट करत राहणारी प्रत्यक्ष इंटरनेटची वृत्तपत्रीय वेबसाईट तयार करणे. परंतु एवढेच करून आजकाल भागत नाही. या वृत्तपत्रांना आपापले पान फेसबुकवर तयार करावे लागते, कारण आजचा युवक फेसबुकमधून वृत्तपत्राकडे जातो. थेट वृत्तपत्राच्या वेबसाईटवर येणारे त्या मानाने कमीच. त्याशिवाय महत्त्वाच्या बातम्या गूगल प्लस, लिंक्डइन अशा सोशल मीडिया नेटवर्कवरही लोड कराव्या लागतात. त्याशिवाय ट्वीटर हा तर आणखीनच अनोखा प्रकार. तो संगणकापेक्षा मोबाईल व टॅब्लेटवर जास्त लोकप्रिय आहे. आजकाल सगळ्याच भाषा मोबाईलवर मिळतात. त्यामुळे कित्येक वृत्तपत्रांनी मोबाईल ऍप्लिकेशन्स तयार केलेली आहेत. शिवाय ट्विटरसाठीही ऍप्लिकेशन्स तयार केलेली आहेत. ती मोबाईल वा टॅब्लेटवर उतरवली की फुकटात बातम्यांचा रतीब दिवसरात्र चालू असतो. ट्वीटरवर तर एका ओळीची बातमी आणि खाली तिला संपूर्ण बातमीची लिंक. हवी असली तर क्लिक करा आणि बातमी वाचा, ऐका वा प्रत्यक्ष व्हिडियोमधून बघा. नाहीतर पुढची वन-लाईनर बातमी वाचा.
हे एवढे सगळे मोफत आणि सहजगत्या मिळत असताना रोज सकाळी वृत्तपत्र विकत घेऊन वाचण्याची संस्कृती किती काळ टिकून रहाणार हा प्रश्न विचारण्याचीही गरज नाही. वाचन संस्कृती खात्रीने लोप पावणार नाही. परंतु कागदावर छापलेले वाचण्याची संस्कृती जास्त काळ टिकून राहील असे वाटत नाही. हातात घेऊन फिरण्याची वा गुंडाळण्याची गरज नाही, फाटण्याची भीती नाही आणि भिजण्याचीही शक्यता नाही. सगळे काही संगणकावर, मोबाईलवर वा टॅब्लेटवर. शिवाय जगात कुठेही जा, तुमचे वृत्तपत्र तुमच्या मोबाईलवर सतत तुमच्याबरोबर राहील. एका राज्यातून दुसर्‍या राज्यात वा देशात गेलो म्हणून आपले आवडीचे वृत्तपत्र आता कसे वाचायचे हाही प्रश्न नाही.
शेवटी वृत्तपत्र हे प्रसारमाध्यमांतील एक माध्यम आहे. एकामेकांशी संवाद साधणे हा माध्यमाचा स्थायीभाव आहे. तो काही अक्षर निर्मितीपासून सुरू झाला नव्हता. ख्रिस्तपूर्व २००० सालात कधीतरी अक्षराचा शोध लागला. त्यापूर्वी आणि नंतरसुद्धा कित्येक हजारो वर्षे मौखिक माध्यमांद्वारेच जनसंवाद साधला जाई. खास करून कलाविष्कारांच्या गायन, नृत्य, नाटक अशा लोककलांच्या विविध माध्यमांतून. छपाईचा शोध लागण्यास तर १४५२ साल उजाडावे लागले. आशियातला पहिला छापखाना गोव्यात पोर्तुगिजांनी सुरू केला तो १५५६ साली. म्हणजे सोळाव्या शतकात. त्यानंतर वाचन संस्कृती खर्‍या अर्थाने बहरली. पण म्हणून त्या पूर्वीची हजारो वर्षे अडाणीपणाची होती असे म्हणण्याचा मूर्खपणा कुणी करणार नाही. कित्येक शोध लावले गेले, अश्मयुगापासून कित्येक संशोधनांद्वारे मानवी संस्कृतीचा विकास होत गेला. या संपूर्ण चित्तथरारक आणि प्रेरणादायी अशा मानवी जीवनाच्या प्रवासातील छापील वाचन संस्कृतीचा काळ हा केवळ पाचशे-सहाशे वर्षांचा.

संस्कृती तीच, बदलताहेत उपकरणे

पूर्वी दगडांवर, धातूंवर, लाकडावर, पानांवर लिहीत लिहीत कागदावर लिहायची परंपरा सुरू झाली. त्यानंतर छापील परंपरा. आज तीच अक्षरे इंटरनेटद्वारे संगणक, मोबाईल, टॅब्लेटवर लिहिलेली आपणाला वाचायला मिळतात. कालपर्यंत दृक - श्राव्य माध्यमासाठी आपणाला प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन ते पहावे व ऐकावे लागे. नंतर रेडियो, ग्रामोफोन, टेप, कॅसेट, सीडी अशी श्राव्य माध्यमांची उपकरणे येत गेली. मात्र आधी सिनेमा व नंतर टेलिव्हिजनने दृकश्राव्य माध्यमांतून नवीन क्रांतिकारी उपकरणे तयार झाली, सॅटेलाईट तंत्रज्ञानाने संपूर्ण जग आपणापुढे आणले. नंतर व्हीसीडी आणि डीव्हीडी. आता त्यानंतर इंटरनेट, मोबाईल, टॅब्लेट हे नवे तंत्रज्ञान. शिवाय एमपीथ्री आणि एमपीफोर.
मात्र एक गोष्ट खरी. तंत्रज्ञानाच्या या युगात संपर्क माध्यमाची उपकरणे कितीही बदलली तरी शेवटी शब्द, अक्षरे, श्रवण व दृक् (पाहणे) हे चिरंतनच असणार. वाचण्याची, ऐकण्याची वा बघण्याची माध्यमे वा उपकरणे बदलतील. परंतु ती संस्कृती मात्र टिकून राहील. त्यातील अर्थकारण बदलेल. परंतु समाजकारण आणखीनही प्रगल्भ होईल. कदाचित वाचन, श्रवण व बघण्याच्या पद्धती बदलतील, परंतु ज्ञानार्जनाची संस्कृती कदापि बदलणार नाही. उलट ती आणखीनही वृद्धिंगत होईल. या दृष्टिकोणातून आपण या माहिती युगाच्या तंत्रज्ञानाकडे बघितले तर आपल्या मनातले प्रश्न आपसूकच सुटतील. या टीव्ही आणि इंटरनेटमुळे वाचन संस्कृतीचा ह्रास होत चाललेला आहे वा ज्ञानार्जनाची भूक मरत चाललेली आहे असा शंख करीत आपण बसणार नाही. आजच्या पिढीजवळ बसा, त्यांना समजून घ्या आणि तुम्हाला कळेली की त्यांना आपल्याहून जास्त ज्ञान आहे. केवळ परीक्षेत पास होण्याच्या ज्ञानापेक्षाही जास्त ज्ञान त्यांच्यापाशी आहे (अर्थात, त्यात वाईट गोष्टींचे ज्ञानसुद्धा आले, जसे ते कालही होते.)
या संपूर्ण पार्श्वभूमीवर आपण आजच्या वृत्तपत्रांकडे बघितले तर आपल्या लक्षात येईल की वृत्तपत्रांना एक मर्यादा असते. मात्र या डिजिटल माध्यमांना मर्यादा नाही. ते अमर्याद ज्ञानाचे खजिने आहेत. या रेसमध्ये टिकायचे असेल तर आपणास ‘जुने तेचे सोने’ म्हणून त्याला मिठी मारून बसता येणार नाही. छापील वृत्तपत्रे वा पुस्तकांचे महत्व कमी होणार नाही. केवळ ते वाचण्याची उपकरणे बदलतील, बदलत आहेत, बदललेली आहेत. त्यानुसार आपणालाही बदलावे लागेल. जशा आमच्या हजारो वर्षांच्या पिढ्या बदलल्या, त्याचप्रमाणे. चला, या बदलांचे मनापासून स्वागत करूया

---

0 comments:

वाचनीय

  © Blogger templates The Professional Template by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP