जग तुमच्या मुठीत
टीव्हीमुळे वृत्तपत्र व्यवसाय संपलेला नाही. इंटरनेटमुळे टीव्ही संपला नाही आणि ऍप्समुळे इंटरनेट संपले नाही. मात्र स्मार्टफोन आणि टॅब्लेटच्या या जमान्यात वरील तिन्ही माध्यमांची सर्व समीकरणे अंतर्बाह्य बदलणार आहेत. कारण स्मार्टफोन हे मीडियाचे एक रूप नव्हे. वृत्तपत्र, टीव्ही, इंटरनेट ही माहिती प्रसारणाची माध्यमे होती. स्मार्टफोन वा टॅब्लेट हे असे माध्यम नव्हे. मात्र या तिन्ही माध्यमांना स्वतःमध्ये सामावून तुमच्या संपर्काच्या सर्व गरजा पुरविणारे ते एक प्रभावी आणि बहुद्देशीय उपकरण आहे. हे एक उपकरण तुमच्याजवळ असले की बस्स... सगळे जग तुमच्या मुठीत...
प्रमोद आचार्य,
संपादक, प्रुडण्ट मीडिया
‘वॉशिंग्टन पोस्ट’ ‘अमेझॉन डॉट कॉम’ च्या संस्थापकाने विकत घेतले आणि पुन्हा एकदा मीडियाच्या बदलणार्या वास्तवावर शिक्कामोर्तब झाले.
यातून दोन गोष्टी स्पष्ट झाल्या.
पहिली - शंभर वर्षांपेक्षा जास्त परंपरा असलेल्या ‘वॉशिंग्टन पोस्ट’ सारख्या वृत्तपत्राला सध्याच्या ‘मार्केट’मध्ये टिकाव धरणे शक्य झाले नाही.
दुसरी - ‘अमेझॉन डॉट कॉम’ सारख्या एका व्यावसायिक वेब पोर्टलच्या संस्थापकाने हे वृत्तपत्र विकत घ्यायचे धाडस आणि ताकद दाखवली. एवढेच नव्हे तर ‘पब्लिक’ असणारी ही कंपनी आता ‘प्रायव्हेट’ होणार. म्हणजे अमेझॉनचे मालक जेफ बेझोस हे ‘वॉशिंग्टन पोस्ट’चे एकमेव मालक असणार. त्यासाठी त्यांनी मोजलेत अडीचशे दशलक्ष डॉलर.
‘वॉशिंग्टन पोस्ट’चे अध्यक्ष डोनाल्ड ग्रॅहम यांनी जारी केलेल्या अधिकृत वक्तव्याप्रमाणे - ‘इनोव्हेशन्स अँड कॉस्ट कट्स् वेअर नॉट इनफ टू स्टेम दॅट डिक्लाईन’ (नावीन्य आणि खर्चकपात हे घसरण थोपवण्यास पुरेसे नव्हते.)
‘वॉशिंग्टन पोस्ट’ च्या महसूलावर नजर टाकली तर एक गोष्ट सहज लक्षात येते. गेली सात वर्षे जाहिरातींतून येणारा पैसा वाढणे सोडाच, हा आकडा सतत तळाला जात राहिला. त्याचाच परिणाम म्हणजे अमेझॉन डील!
पण ही फक्त एका ‘वॉशिंग्टन पोस्ट’ची कहाणी नव्हे. रेड सॉक्सचे अब्जाधीश मालक जॉन हेन्री हे ‘द बॉस्टन पोस्ट’ घेण्याच्या तयारीत आहेत. ‘न्यू यॉर्क टाइम्स’ने १.१ अब्ज डॉलर मोजून ‘द ग्लोब’ खरेदी केलाय. ही झाली जगाची स्थिती.
सेकंड स्क्रीन
काही दिवसांआधी भारतातील एक प्रथितयश अशा गेमिंग कंपनीचे काही अधिकारी आम्हाला भेटायला आले. बसता क्षणीच ते म्हणाले - ‘द मोबाईल इज बिकमिंग सेकंड स्क्रीन आफ्टर टेलिव्हिजन.’ मी चटकच बोलून गेलो - ‘आय एम सॉरी. नॉट द सेकंड. बट द फर्स्ट!’ आणि खरंच. टीव्हीवर येणारी ब्रेकिंग न्यूज आपल्याला आपण टीव्हीसमोर असलो तरच बघायला मिळते. मोबाईलचे तसे नाही. आपल्या फोनच्या स्क्रीनवर विविध माध्यमांतून बातम्या येत राहतात आणि आपण चालता - बोलता त्या वाचत राहतो.
आजच्या ‘३ जी’ च्या आणि येणार्या ‘४ जी’च्या जमान्यात आपण व्हिडियोसुध्दा कम्प्युटर वा टीव्हीवर नव्हे तर आपल्या स्मार्टफोनवर बघतो. जगातले प्रत्येक वृत्तपत्र आपल्याला मोबाईलवर वाचायला मिळते, तेही फुकट. मग आम्ही टीव्हीवाल्यांनी अन वृत्तपत्रवाल्यांनी (पारंपारिक न्यूज मीडियाने) जगायचे कसे?
प्रत्येक माध्यमाची स्वत:ची अशी बलस्थाने असतात, मग तो टीव्ही असो वा वृत्तपत्र. पण आजच्या बदलणार्या युगात ही बलस्थाने टिकवून ठेवणे हे सुध्दा फार मोठे आव्हान बनत चालले आहे.
साधे उदाहरण देतो - स्मार्टफोनमुळे सगळे जग आपल्या मुठीत येऊन बसलेय. आधी आपण ही उपाधी कम्प्युटरला द्यायचो. त्याच्या आधी टीव्हीला. त्यापूर्वी वृत्तपत्राला आणि कधीकधी रेडिओला.
आधी वृत्तपत्र दर दिवशी सकाळी संपूर्ण जग तुमच्या दारात आणायचे. मग टीव्ही जग जसे घडते, तसे तुमच्या घरात आणू लागले. नंतर कम्प्युटर जग तुम्हाला हवे तसे आणि तुम्हाला हवे तेव्हा तुमच्या बेडरूममध्ये घेऊन आला. आता स्मार्टफोन हेच जग तुम्हाला हवे तसे, हवे तेव्हा आणि तुम्ही जिथे जाल तिथे तुमच्या सोबत घेऊन येतो आहे. आता बोला!
प्रत्येक वृत्तपत्राचे आणि वृत्तवाहिनीचे स्वतःचे ऍप्स आज ‘आय-ओ-एस’, ‘ब्लॅकबेरी’, ‘अँड्रॉईड’ या सर्व महत्वाच्या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहेत. बातम्या जशा अपडेट होतात तशा तशा त्या तुमच्या स्मार्टफोनवर येत राहतात. प्रत्येक वृत्त माध्यमाचे आपले स्वतंत्र ट्वीटर आणि फेसबुक पेज आहे. बातम्या या माध्यमांतूनही सतत तुमच्या स्मार्टफोनवर धडक देत राहतात. मग टीव्हीसमोर बसण्याची आणि दररोज सकाळी वृत्तपत्र वाचण्याची गरजच काय?
नव्या पिढीच्या नव्या सवयी
मी काही फार जुन्या पिढीतला नाही. पण मला पेपर हातात घेऊन वाचायला आवडतो. पुस्तकाचे वजन तळहातावर जाणवले नाही तर ते वाचल्यासारखेच वाटत नाही. काही वेळा मी ई-बुक रीडरवर पुस्तक वाचण्याचा प्रयत्न केला, पण दहा मिनिटांच्या आत कंटाळलो. हे असे का झाले?
माझ्या मते, आमच्या पिढीपर्यंतची मुले लहानपणापासून पुस्तके वा वृत्तपत्रे हाती धरून वाचत होती. आमच्या नंतरची पिढीसुध्दा काही प्रमाणात याच पठडीतली. पण त्यानंतरची मुले जर तुम्ही पाहिलीत, तर अभ्यासाचे पुस्तक सोडले तर दुसरी कुठलीही गोष्ट त्यांना हातात धरून वाचायची जरुरी भासलीच नाही. सगळे स्मार्टफोनवर. त्यांची जडण-घडण आणि संगोपनच ह्या माध्यमाने केले. ही पिढीसुध्दा भरपूर वाचते. आकलन करते. पण त्यांचे माध्यम वेगळे आहे. आणि आता तर गोवा सरकारचे धोरण बघितले तर यापुढे मुलांना अभ्यासाची पुस्तकेसुद्धा टॅब्लेटवर मिळतील! म्हणजे, पुस्तक हातात धरून वाचण्याचा अनुभव काय असतो हे या पिढीतील बहुतेकांना कधी कळणारच नाही.
याचा अर्थ पुस्तक हातात धरून वाचणे म्हणजेच वाचणे असा बिल्कूल नाही. आमच्या पिढीचे ते चांगले आणि नंतरच्यांचे टुकार अशी भावना बाळगणारा एक प्रचंड वर्ग समाजात असतो. आमच्यावेळी ते असे होते! आता काय बोलायचे... अशा सुरांत त्यांची मल्लीनाथी सुरू असते. वाचावे कसे आणि कुठल्या माध्यमातून हा स्वतंत्र विषय आहे. त्यात ‘आमची पिढी, तुमची पिढी’ असली वायफळ चर्चा करण्यात काही अर्थ नाही. आजचे तरूणसुध्दा भरपूर वाचतात आणि आमच्याजवळ होती त्यापेक्षा कित्येक पटीनी जास्त माध्यमे, माहिती आणि पर्याय त्यांच्याकडे उपलब्ध आहेत. मुद्द्याचे म्हणजे, कागदावरचे वाचणे हा प्रकार हळूहळू कमी होत जाणार. पण तो संपणार कधीच नाही.
पारंपरिक माध्यमांची भूमिका काय?
मात्र या सगळ्या धामधुमीत पारंपरिक मीडियाची काय भूमिका असणार?
आमच्याच चॅनलविषयी सांगायचे झाले तर टीव्हीशिवाय सगळ्या बातम्या तुम्हाला आमच्या वेबसाईटवर कधीही बघायला मिळतात. प्रत्येक कार्यक्रम दर दिवशी वेबसाईटवर टाकला जातो. या व्यतिरिक्त आमच्या फेसबुक पेजवर बातम्या जशा घडतात, तशा अपडेट होत राहतात. ट्वीटरवर सतत बातम्यांचा भडिमार सुरु असतो. या शिवाय आमची सगळी बातमीपत्रे कधीही तुम्हाला यू-ट्युबवरसुध्दा बघायला मिळतात.
या शिवाय हे सर्व कार्यक्रम आमच्या स्वताच्या अँड्रॉईड ऍपवर लवकरात लवकर उपलब्ध करुन द्यायचा आमचा मानस आहे. म्हणजे आणखी एक माध्यम.
या युगात, एकाच वाहिनीच्या बातम्या आणि कार्यक्रम, टीव्ही सोडून किमान चार ठिकाणी तुम्हाला बघायला-वाचायला मिळतात. महत्वाचे म्हणजे तुम्हाला हवे तेव्हा आणि हवा तितका वेळ. मग स्मार्टफोन वा टॅब्लेटला सेकंड स्क्रीन संबोधून कसे चालेल?
वृत्तपत्रांचेही तेच. न्यू यॉर्क टाइम्स घेतला तर त्यांचे स्वतःचे ऍप आहे. वेबसाईट सतत अपडेट होत असते. तुम्ही संध्याकाळी पाच वाजता त्यांची वेबसाइट वा ऍप उघडले, तर पाच वाजेपर्यंतच्या सर्व बातम्या तुम्हाला वाचायला मिळतील. रात्रीपर्यंत वा सकाळपर्यंत थांबायची गरजच नाही. मध्यरात्री वृत्तपत्र छापायला गेले की दुसर्या दिवशीचा संपूर्ण अंक वेबसाइटवर उपलब्ध असतो. काही चॅनल्सच्या वेबसाइटवर तर तुम्हाला जगभर काय चाललेय ते लाइव्ह बघायला मिळते. ही परिस्थिती बघितल्यास पुढच्या पिढीने पारंपरिक मीडियाकडे कसे आणि का म्हणून बघावे?
जुळवून घेणेच श्रेयस्कर
आणि नेमके हेच लक्षात आल्यामुळे प्रत्येक मीडिया हाऊसने या नवनवीन माध्यमांशी जुळवून घ्यायला सुरवात केली आहे. प्रत्येकजण वृत्त आणि माहितीच्या या नवीन अवकाशामध्ये आपले अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न चालवला आहे. पूर्ण विचारांती प्रत्येक माध्यमावर आपली पदचिन्हे उमटवण्याचा प्रयत्न चालवला आहे.
मग प्रश्न राहतो तो जाहिरातींच्या गणिताचा.
पारंपरिक माध्यमे महागडी आहेत आणि पेलायलाही भारदस्त. पण संपूर्ण माध्यम विश्वाचा पाया या पारंपरिक पध्दतीने बांधला गेलाय. त्यामुळे तंत्रज्ञानाच्या रेट्यात भरकटत जाऊन या पारंपरिकतेची सुंदर अशी समाधी बांधणे म्हणजे स्वतःची कबर स्वतःच खोदणे. सध्या तरी या जुन्या पध्दतीपासून दूर जाऊन फक्त नव्या माध्यमाच्या आधारावर जगण्याचे आव्हान पेलणे प्रथितयश कंपन्यांना तरी लगेच शक्य होणार नाही.
ज्या मीडिया कंपन्या या नवीन तंत्रज्ञानाची अर्भके आहेत त्यांचे भवितव्य मात्र अधिक सुखकर आणि सुरक्षित आहे, कारण जुन्याचे ओझे त्यांच्या खांद्यावर नाही आणि महसुलाच्या नवनवीन पध्दतींसोबत प्रयोग करणे त्यांना परवडणारे आहे. मात्र जुन्या कंपन्यांना महसुलाचा दबाव आत्ताही सहन करावा लागतो आणि हे आव्हान पेलणे अशक्यप्राय बनते तेव्हा मग ‘वॉशिंग्टन पोस्ट’ सारखी परिस्थिती उद्भवते.
बाजारात प्रचंड स्पर्धा आहे. गेली पाच वर्षे तर आर्थिक मंदीने सगळे आराखडे जर्जर करून टाकले आहेत. ताटात अन्न तेवढेच आहे, पण खाणारी तोंडे दहा पटींनेे वाढलीयत. अशा परिस्थितीत दोन पर्याय राहतात. एक तर कंपनी बंद करायची वा आपल्यापेक्षा मोठ्या समूहाला ती विकून टाकायची. सध्या दुसरा ट्रेंड चालू आहे.
विस्तार संपला, आकुंचन सुरू
कुठल्याही गोष्टीचा विस्फोट होतो तेव्हा त्या क्षेत्रातल्या सर्व गोष्टी विस्तारत जातात. आणि एकदा का हे विस्तारणे संपले की मग आकुंचन सुरु होते. अखेरीस, त्या समाजाला, त्या अर्थव्यवस्थेला परवडतील आणि पेलवतील तेवढीच माध्यमे शिल्लक राहतात. सध्या आपला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर विस्तारण्याची टप्पा संपत आलाय आणि आकुंचन सुरू झालेय. पण आपला स्थानिक वा प्रादेशिक पातळीवर विस्तारण्याची टप्पा आत्ताच कुठेतरी सुरू झालेला आहे. म्हणुनच तुम्हाला राष्ट्रीय वा आंतरराष्ट्रीय वाहिन्यांपेक्षा नवीन प्रादेशिक वाहिन्या सुरू होताना दिसतील. वृत्तपत्रांच्या बाबतीतही तेच. सगळ्या राष्ट्रीय मीडिया कंपन्यांनी दोन-तीन वर्षांआधी आपल्या प्रादेशिक वाहिन्या वा वृत्तपत्रे सुरू करण्याचा सपाटाच लावला होता. सध्याच्या मंदीमुळे ह्या विस्तारावर थोड्या मर्यादा आलेल्या आहेत. मात्र आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय बाजारपेठेत स्थिरस्थावर झाल्यावर स्थानिक वा प्रादेशिक पातळीवरचे मार्केट अजून आपल्यासाठी उघडे आहे याची जाणीव सगळ्यांना झालेली आहे. म्हणूनच बहुतेक कंटेंट आता स्थानिक भाषा वा प्रादेशिक माध्यमांतून तयार होताना आपल्याला दिसतो.
दुसरी गोष्ट म्हणजे, टीव्हीमुळे वृत्तपत्र व्यवसाय संपलेला नाही. इंटरनेटमुळे टीव्ही संपला नाही आणि ऍप्समुळे इंटरनेट संपले नाही. मात्र स्मार्टफोन आणि टॅब्लेटच्या या जमान्यात वरील तिन्ही माध्यमांची सर्व समीकरणे अंतर्बाह्य बदलणार आहेत. कारण स्मार्टफोन हे मीडियाचे एक रूप नव्हे. वृत्तपत्र, टीव्ही, इंटरनेट ही माहिती प्रसारणाची माध्यमे होती. स्मार्टफोन वा टॅब्लेट हे असे माध्यम नव्हे. मात्र या तिन्ही माध्यमांना स्वतःमध्ये सामावून तुमच्या संपर्काच्या सर्व गरजा पुरविणारे ते एक प्रभावी आणि बहुद्देशीय उपकरण आहे. हे एक उपकरण तुमच्याजवळ असले की बस्स...सगळे जग तुमच्या मुठीत...
भविष्याचा विचार करायचा झाला तर निश्चितच एक गोष्ट स्पष्ट आहे. प्रत्येकाच्या स्मार्टफोनवर आपले अस्तित्व आपण अधिकाधिक प्रभावीपणे कसे टिकवू आणि ह्या उपकरणाची बलस्थाने लक्षात घेऊन आपण कशा प्रकारे आपला बिझनेस मॉडेल घडवू त्यावरच प्रसारमाध्यमांच्या व्यवसायाचे भवितव्य अवलंबून असेल, कारण पुढच्या दहा वर्षांनंतर कदाचित आत्ताची आपली ‘मेनस्ट्रीम’ वा मुख्य प्रवाहातील माध्यमे आपल्याला सगळ्यात कमी महसूल देतील व प्रत्येकाच्या मुठीतला स्मार्टफोन आणि त्यावरची आपली पदचिन्हे आपल्या व्यवसायाचा कणा बनतील!
----
0 comments:
Post a Comment