जा बदलांना सामोरे
इंटरनेटच्या तसेच मोबाईलच्या माध्यमांतून सोशल मीडियाने झेप घेतली आहे. मुद्रित माध्यमांप्रमाणे याला वाचकांच्या मिनतवार्या काढाव्या लागत नाही. दूरचित्रवाणी वाहिन्यांप्रमाणे याला प्रेक्षकांमागे धावावे लागत नाही. नवी पिढी आपोआपच सोशल मीडियाकडे वळते आहे. त्यामुळे उद्योग आणि व्यापार-उदिमातील घटकही सोशल मीडियामध्येच पैसा ओततील. त्यांना आपला ग्राहक कोठे आहेत हे नेमके समजते. नेमकी हीच बाब पारंपरिक मीडियाने लक्षात घेतली पाहिजे.
- संजय ढवळीकर
संपादक, दैनिक हेराल्ड
पारंपरिक प्रसार माध्यमांच्या भवितव्यावरील चर्चा काही आजच सुरू झालेली नाही. ही चर्चा काल होत होतीच, आज होते आहे, आणि उद्याही चालू राहील. पारंपरिक प्रसारमाध्यमे म्हणजे मुख्यत: मुद्रित माध्यमे. म्हणजेच छपाईखान्यातून कागदावर छापून बाहेर पडणारी वर्तमानपत्रे आणि नियतकालिके. ही माध्यमे काल होती म्हणून त्यांच्या अस्तित्वाबाबत तेव्हा चर्चा चालायची. आज आहेत म्हणून आजही त्यांच्यावर चर्चा झडताहेत. पारंपरिक मुद्रित माध्यमे उद्याही असणार आहेत, त्यास अनुसरून त्यांच्या भवितव्याबाबत भविष्यातही चर्चा-संवाद होत राहतील. दारात येणारी वर्तमानपत्रे आणि नियतकालिके वाचकांना हवी आहेत, म्हणून सारे जण त्यांच्या अस्तित्वाबाबत आणि भवितव्यावर चर्चा करतात. मात्र काळाच्या ओघात घडत असलेले बदल लक्षात घेत आपल्या स्वरुपात आवश्यक ठरणारे बदल अंगीकारत माध्यमांना पुढील वाटचाल करावी लागेल. हा मार्ग जो अनुसरेल तो टिकेल आणि हा मार्ग जो टाळेल त्याचा इतिहास होईल.
गेल्या शतकाच्या मध्यास जन्माला आलेल्या आणि शतकाच्या अखेरीस विकसित झालेल्या दूरचित्रवाणी माध्यमांनाही आता मर्यादित अर्थाने पारंपरिक प्रसार माध्यमे म्हणता येईल. इलेक्ट्रॉनिक माध्यमे असे सुरुवातीच्या काळात त्यांचे वर्णन केले जायचे. परंतु आता नवनवीन इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स एवढ्या झपाट्याने येत आहेत आणि अत्याधुनिक बनत आहेत, त्या वेगाच्या भरात दूरचित्रवाणी वाहिन्या आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमे यांच्यात बराच फरक पडला आहे. इलेक्ट्रॉनिक माध्यमांनी केवळ मुद्रित माध्यमांच्याच नव्हे तर दूरचित्रवाणी वाहिन्यांच्याही नाकी दम आणला आहे. त्यामुळे सध्या वर्तमानपत्रे आणि नियतकालिके जेवढ्या अडचणीत आहेत असे वाटते आहे तेवढीच अडचण दूरचित्रवाणी वाहन्यांसमोरही उभी आहे.
कठीण परिस्थिती म्हणजे अंत नव्हे
माध्यमांसमोर कठीण परिस्थिती उभी आहे हे खरेच आहे, परंतु कठीण परिस्थिती म्हणजे अंत असे काही नाही. कठीण परिस्थितीला सामोरे जाण्याचे काटेकोर नियोजन करावे लागते. ही कठीण परिस्थिती माध्यमक्षेत्र सतत फुगतच चालले असल्याने आली आहे. एकविसाव्या शतकाच्या प्रारंभापासून माध्यमांचा अतिविस्तार होतो आहे. हा अतिविस्तार पारंपरिक माध्यमांमध्येही होतो आहे आणि सोशल मीडियाचाही होत आहे.
एकीकडे वाचकांची संख्या आणि वाचनसंस्कृती कमी होत असल्याची ओरड चालू असली तरी दुसरीकडे भाषिक आणि इंग्रजी वर्तमानपत्रांची तसेच नियतकालिकांची संख्या वाढतेच आहे. दूरचित्रवाणी वाहिन्यांचीही तीच कथा. ठराविक वेळेत चालणार्या एका दूरदर्शन वाहिनीच्या ठिकाणी आता शंभरावर खाजगी वाहिन्या आल्या, दर महिन्याला त्यात आणखी भर पडत असते. वर्तमानपत्रे, नियतकालिके, वाहिन्या चालण्यासाठी आर्थिक पाठबळाची गरज असते. देशात आणि जगभरात उद्योग, व्यापारउदिम वाढत असला तरी जन्माला येणार्या प्रत्येक माध्यमाला या क्षेत्राचाच आधार असतो. कारण प्रामुख्याने जाहिरात महसुलावरच माध्यमांचा डोलारा उभा असतो.
माध्यमांची गर्दी झालीय
मुद्रित माध्यमे आणि दूरचित्रवाणी वाहिन्यांची खचाखच गर्दी झाल्यामुळे आधीच या क्षेत्रात गर्दी झाली आहे, टिकून राहण्यासाठी आणि नफा कमविण्यासाठी गळेकापू स्पर्धा सुरू झाली आहे. या स्पर्धेमुळे जेरीस आलेल्या पारंपरिक माध्यमांसमोर आता वेगाने फोफावणार्या सोशल मीडियाचे आव्हान उभे ठाकले आहे. इंटरनेटच्या तसेच मोबाईलच्या माध्यमांतून सोशल मीडियाने झेप घेतली आहे. मुद्रित माध्यमांप्रमाणे याला वाचकांच्या मिनतवार्या काढाव्या लागत नाही. दूरचित्रवाणी वाहिन्यांप्रमाणे याला प्रेक्षकांमागे धावावे लागत नाही. नवी पिढी आपोआपच सोशल मीडियाकडे वळते आहे. त्यामुळे उद्योग आणि व्यापार-उदिमातील घटकही सोशल मीडियामध्येच पैसा ओततील. त्यांना आपला ग्राहक कोठे आहेत हे नेमके समजते.
नेमकी हीच बाब पारंपरिक मीडियाने लक्षात घेतली पाहिजे. वाचक आणि प्रेक्षक मिळवून किंवा टिकवून ठेवण्यासाठी केवळ बातम्या देण्याच्या पारंपरिक पद्धती चालणार नाहीत. नवीन वाचक-प्रेक्षकाची चव आणि गरज ओळखून आपले माध्यम त्याच्या दृष्टीने योग्य असे बनवावे लागेल. हे करीत असताना पत्रकारितेच्या तत्वांना तिलांजली द्यावीच लागेल असे अजिबात नाही. संपादकाने ठामपणे संपादक राहायचे ठरविले आणि त्याचे फायदे व्यवस्थापनाच्या लक्षात आणून दिले तर त्याची अडचण होत नाही. त्यासाठी प्रत्येकाने आपली नैतिक आणि व्यावसायिक चौकट आखून घ्यावी लागेल.
‘नवप्रभा’च्या ४३ वर्षांच्या वाटचालीत दोन वर्षे मलाही तेथे उपसंपादक म्हणून काम करण्याची संधी मिळाली. तेथे पडेल ते काम धडाडीने करतानाच शिकत राहण्याच्या वृत्तीमुळे ‘महाराष्ट्र टाइम्स’सारख्या वर्तमानपत्रात काम करण्याचा आत्मविश्वास निर्माण झाला. ‘गोमन्तक’ची जबाबदारी सांभाळणे किंवा ‘गोवा ३६५’ या दूरचित्रवाणी वाहिनीच्या संपादकपदी बसणे त्यामुळेच शक्य झाले. त्या आत्मविश्वासातूनच नवीन वर्तमानपत्राची संकल्पना आखून ‘दैनिक हेराल्ड’सारखे वर्तमानपत्र जन्माला घालण्याची हिंमत आली. वैयक्तिक स्तरावर पत्रकारांनीही आधुनिकीकरणाची कास धरत बदल जाणून घेतले पाहिजेत. बदल हीच एक सतत न बदलणारी गोष्ट असते हे जो लक्षात घेईल तो या स्पर्धेच्या युगात पुढे जाईल.
-----
0 comments:
Post a Comment