मराठी पत्रकार

गोव्याच्या दैनिक नवप्रभाचे संपादक श्री. परेश प्रभू यांचा हा अधिकृत ब्लॉग समस्त पत्रकार मित्रांसाठी...

माध्यम चर्चा

पत्रकार मित्रांच्या आपल्या क्षेत्राबद्दलच्या जाणिवा अधिक प्रगल्भ व्हाव्यात या उद्देशाने हा ब्लॉग तयार करण्यात आला आहे. या ब्लॉगवर समाविष्ट करण्यासारखी माहिती आपल्या नजरेस आली, किंवा या ब्लॉगवरील एखाद्या लेखाविषयी प्रतिक्रिया द्यावीशी वाटली तर जरूर कळवा - goa.paresh@gmail.com


Friday, August 16, 2013

माझ्या मुठीत माझ्या बातम्या


आजपासून १८ वर्षांपूर्वी म्हणजे १५ ऑगस्ट १९९५ ला इंटरनेट आपल्या देशात आले. त्याने प्रसारमाध्यमांना उलटेपालटे केले आहे. आता सगळ्या देशासाठीचे एकेक वृत्तपत्र किंवा दूरचित्रवाणी वाहिनी आता राज्य आणि जिल्ह्यापुरते बनले आहेत. ते आता आणखी गावागावापुरतेच नाही तर माणसामाणसापुरते बनणार आहेत...




सचिन परब
संपादक, ‘गोवादूत’ 


‘कर लो दुनिया मुठ्ठी में’, असे अंबानी जवळपास दहा वर्षांपूर्वी देशभर ओरडून सांगत होते. रिलायन्सने तेव्हा आपला मोबाईल बाजारात आणला होता. पण मोबाईल हातात आला की जग कसे आपल्या मुठीत येईल, हे आपल्यासारख्या सर्वसामान्यांना कळत नव्हते. तेव्हा जग नाही, पण निदान मोबाईल तरी आपल्या मुठीत आला. रिलायन्सने मोबाईलमध्ये एकदम स्वस्ताई केली होती. त्यामुळे निम्न मध्यमवर्गच नव्हे, तर गरीबही मोबाईलसाठी सरसावले.
तेव्हा मोबाईल हा कॉल किंवा एसेमेस करणे आणि घेणे एवढ्यापुरताच होता. पण हळूहळू त्याने आपले हातपाय पसरायला सुरुवात केली. आधी त्यात गाणी ऐकता येऊ लागली. मग कधीतरी रेडियो. आधी त्यात फोटो काढता येऊ लागले. नंतर काढलेले फोटो क्षणात एडिट करून जगात कुठेही पाठवता येऊ लागले. व्हिडिओचेही तसेच. पूर्वी कुठल्या तरी सिनेमाचा, गाण्याचा तुकडा मोबाईलवर पाहण्याचे अप्रूप होते. आता जगभरातले उत्तमोत्तम सिनेमे मोबाईलवर बघता येऊ लागले आहेत. लोक मोबाईलवरच्या कॅमेर्‍याने डॉक्युमेंट्री बनवू लागले आहेत. सुरू असलेली मॅच लाइव्ह बघता येणे सहज शक्य आहे. एसेमेसच्या पुढे जात आज व्हॉटऍप्ससारख्या साध्या ऍप्लिकेशनने सोशल नेटवर्किंग साईट्‌सना पर्याय उभा केला आहे. साध्या फोनकॉलपासून सुरुवात करत जगभर कुठेही असलेला माणूस आपल्यासमोर असल्यासारखे व्हिडियो कॉन्फरन्सिंग करणे आता मोबाईलमधून सोपे होत आहे. नाही नाही म्हणता अफाट जग मोबाईलच्या मुठीत येत आहे आणि मोबाईलमधून आपल्या सगळ्यांच्या मुठीत येऊ लागले आहे.

इंटरनेटचा क्रांतिकारक शोध

या सगळ्या बदलांचे मूळ आहे इंटरनेटमध्ये. मानवजातीच्या इतिहासात चाक किंवा आगीचा शोध जितका मूलगामी फरक पाडणारा ठरला, तितकाच इंटरनेटचा शोधदेखील. हे थोडे अतिशयोक्त वाटले तरी ते खरे आहे. फक्त त्यासाठी इंटरनेटचा असलेला आणि वाढता व्याप लक्षात घ्यायला हवा. आपल्याला ठाऊक असलेल्या आणि नसलेल्या जगण्याच्या प्रत्येक क्षेत्रात इंटरनेट घुसलेय. ते लवकरच आणखी आतपर्यंत घुसणार आहे. इंटरनेटवरून कालपर्यंत लग्ने जुळत होती. आता क्रांत्या होऊ लागल्या आहेत. कालपर्यंत फक्त परीक्षांचे रिझल्ट बघितले जात होते. आज इंटरनेट देशांची सरकारे बदलवू लागले आहे. त्याचे कारण आतापर्यंत कम्प्युटरमध्ये टेबलावर बसून असलेले इंटरनेट मोबाईलमधून आपल्यासोबत चालते - बोलते झालेय. जग खरेच आपल्या मुठीत आलेय.
जग मुठीत आल्यामुळे जगाशी संवाददेखील अगदी सोपा झालाय. मीडिया म्हणजे प्रसारमाध्यमे त्याचसाठी तर असतात. आता आता पर्यंत वर्तमानपत्रासारखी छापील प्रसारमाध्यमे, रेडियो, टीव्ही यांच्यासारखाच इंटरनेट हा प्रसारमाध्यमांचा एक प्रकार मानला जात होता. आता मात्र इंटरनेट तेवढ्यापुरते नाही. इंटरनेटचा हा डिजिटल मीडिया इतर सगळ्या प्रकारांना गिळून दशांगुळे उरला आहे. आता जगभरातली सगळी महत्त्वाची वर्तमानपत्रे, मासिके इंटरनेटवर जशीच्या तशी पाहता येतात. मोबाईलसाठी अनेक वर्तमानपत्रांची वेगळी ऍप्स उपलब्ध आहेत.

चोवीस तास बातम्या

बातम्या कळण्यासाठी सकाळ उजाडण्याची गरज नाही. पेपरांची ही ऍप्स आपल्याला चोवीस तास घडामोडी कळवतात. इतकेच नाही तर पेपरात जागेअभावी छापता येत नाहीत असे लेख, फोटोही त्यात असतात. युरोप अमेरिकेतली शे - दीडशे वर्षांचा इतिहास असलेली काही वर्तमानपत्रे आज कागदावर छापलीच जात नाही, ती फक्त इंटरनेटवर वाचली जातात. न्यूज चॅनल्स तर टीव्हीवर दिसतात तेव्हा आणि तशीच मोबाईलवर दिसतात. आपण ज्या यंत्रांना रेडियो म्हणतो ती येत्या चार दोन वर्षांतच कायमची अस्तंगत होतील, इतक्या मोठ्या प्रमाणात रेडियो मोबाईलवर ऐकला जातो आहे.
पण या नेहमीच्या माध्यमांच्या पलीकडचा नवा मीडिया इंटरनेटने जन्माला घातला आहे. हा आहे सोशल मीडिया.

चर्चेपासून चावटपणापर्यंत...

या नव्या मीडियाचे पासवर्ड आहेत, फेसबूक, ट्विटर, यूट्यूब, विकिपिडिया, गुगल प्लस, पिकासा, लिंकडेन असे अनेक. तत्त्वज्ञानाच्या गहन चर्चेपासून चावट पोर्नोग्राफीपर्यंत सगळे इथे सुरू आहे. लोक इथे माहिती मिळवत आहेत तसेच आक्रोश व्यक्त करत आहेत. वर्तमानपत्रे, टीव्ही, रेडियो जे काही करते ते इथे आहे. इथे आपल्याशी संबंधित घडामोडींची झटकन मिळणारी माहिती आहे. त्यावरची खुली, बेधडक चर्चा आहे. वेगवेगळ्या मतांची रेलचेल आहे. पण इथे माहिती देणारे म्हणजे पत्रकार आणि माहिती मिळवणारे वाचक वेगळे नाहीत. इथे सगळेच वाचक आहेत. इथे सगळेच पत्रकार आहेत. हे उद्याचे प्रसारमाध्यम आहे.

फेसबुकचा पेपर!

उदाहरणच घ्यायचे तर आजच फेसबूकवर पडून असणार्‍या अनेकांना वेगळा पेपर वाचायची गरज भासत नाही, कारण त्यांच्याशी संबंधित सगळ्या घडामोडी त्यांना फेसबुकवरच कळत आहेत. त्याचे फेसबूकचे पेज हा जणू त्याच्यासाठीचा वेगळा पेपरच बनला आहे. हा पेपर आवडू शकणारे अनेक असू शकतात. त्यांना स्वतःचे किंवा असेच कुणाचे तरी फेसबूक पेज हाच पेपर म्हणून पुरेसा वाटणार आहे. असेच यूट्यूब चॅनलचेही आहे. तिथले व्हिडियो त्यांना टीव्ही चॅनलपेक्षा जास्त जवळचे वाटणार आहेत. जगभरातले नको ते वाचण्यापेक्षा किंवा बघण्यापेक्षा मला हवे ते, हवे तसे वाचण्यात किंवा बघण्यात या जगाला रस आहे. त्याला ते इथे मिळणार आहे. पुस्तकात कविता छापून रद्दी वाढवण्याऐवजी त्या फेसबूकवर लाखो जणांशी शेअर करण्यात अनेक कवी आज समाधानी आहेत. ते हळूहळू वर्तमानपत्रांच्या बाबतीतही होऊ लागलेले आहे.
गोव्यासारख्या छोट्या, बांधीव राज्यात तर हे अधिक सहजसोपे आहे. आज मोबाईलच्या कोणत्याही दुकानात जा, इंटरनेटवाल्या मोबाईलची म्हणजे स्मार्टफोनची विक्री तुफान वेगाने सुरू आहे. त्यातला प्रत्येक जण स्वतःचे छोटे ऑनलाइन वर्तमानपत्र किंवा टीव्ही चॅनल काढण्यास सक्षम आहे. अशा हजारो, लाखो वर्तमानपत्रांचा आणि टीव्ही चॅनल्सचा आता जमाना येतो आहे...

0 comments:

वाचनीय

  © Blogger templates The Professional Template by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP