मराठी पत्रकार

गोव्याच्या दैनिक नवप्रभाचे संपादक श्री. परेश प्रभू यांचा हा अधिकृत ब्लॉग समस्त पत्रकार मित्रांसाठी...

माध्यम चर्चा

पत्रकार मित्रांच्या आपल्या क्षेत्राबद्दलच्या जाणिवा अधिक प्रगल्भ व्हाव्यात या उद्देशाने हा ब्लॉग तयार करण्यात आला आहे. या ब्लॉगवर समाविष्ट करण्यासारखी माहिती आपल्या नजरेस आली, किंवा या ब्लॉगवरील एखाद्या लेखाविषयी प्रतिक्रिया द्यावीशी वाटली तर जरूर कळवा - goa.paresh@gmail.com


Friday, August 16, 2013



ही तर अस्तित्वाचीच लढाई



आक्रमक मार्केटिंगमुळे वृत्तपत्रे किमती वाढवत नाहीत आणि ग्राहकाची मानसिकताही स्वस्त वृत्तपत्रे मिळावित अशी झाली आहे. साबण, पेस्ट इतकेच काय बीअरप्रमाणे वृत्तपत्रांचे वितरण व मार्केटिंग केले जात आहे. ज्याची मार्केटिंग स्कीम चालू असेल ती पेस्ट किंवा तो चहाचा पुडा घ्यायचा ही वाचकांची किंवा ग्राहकांची सवय बनू पाहात आहे. चकचकीत, रंगीत पुरवण्या काढणे हे परवडत नसले तरी गरज बनले आहे.



- शरद कारखानीस,

ज्येष्ठ पत्रकार

मराठी वृत्तपत्रांचे बदलते स्वरूप हा खूप व्यापक विषय आहे, कारण त्याची सुरुवात ६ जानेवारी १८३२ रोजी ‘दर्पण’ या बाळशास्त्री जांभेकर यांच्या पहिल्या मराठी वर्तमानपत्रापासून होते आणि त्याला शेवट किंवा समाप्ती नाही. आज प्रकाशित होणारी संख्येने भाराभर वृत्तपत्रेही येथे विचारात घ्यावी लागतील. गेल्या १८० वर्षांचा आणि त्यातून चाललेल्या व आज अस्तित्वात नसलेल्या अशा हजारभर नियतकालिकांचा सर्वसाधारण आढावा घ्यावा लागेल. अर्थात यातील तपशिलाला ङ्गाटा देऊन बदलाचे सूत्र, प्रवास आणि स्वरूप याचा धांडोळा घेण्याचा प्रयत्न आपण करायला हवा.
बाळशास्त्री जांभेकर यांनी आपल्या ‘दर्पण’ च्या पहिल्या अग्रलेखात वर्तमानपत्र काढण्यामागील भूमिका स्पष्ट केली होती. ‘मनोरंजन करणे, चालते काळाचे वर्तमान कळविणे आणि योग्यतेस येण्याचे मार्ग दाखविणे या गोष्टींची ‘दर्पण’ छापणार्‍यास मोठी उत्कंठा आहे’ अशी त्रिसूत्री बाळशास्त्रींनी सांगितली आहे. दर्पणकारांचा द्रष्टेपणा यातून दिसून येतो. कारण ‘वर्तमान कळविणे’ म्हणजे बातम्या देणे हे तर वृत्तपत्रांचे प्रमुख काम आहेच, पण त्याबरोबर ‘मनोरंजन करणे’ हेही वृत्तपत्रांचे एक काम असले पाहिजे असे ते म्हणतात. यातील तिसरा भाग ‘योग्यतेस येण्याचे मार्ग दाखविणे’ म्हणजे उद्योग, व्यवसाय, नोकरी - धंदा यामध्ये यश मिळविणे होय. या दृष्टीने वृत्तपत्रांनी मार्गदर्शन करावे हे बाळशास्त्रींनी आपले कार्य मानले आहे. आजच्या भाषेत सांगायचे तर वृत्तपत्रांनी ‘करिअर गायडन्स’ द्यावे असे हे काम आहे. म्हणजेच मराठीतील आद्य वृत्तपत्रकाराला वृत्तपत्राच्या स्वरूपाविषयीची निश्‍चित दिशा ठाऊक होती. बंगाल या भारताच्या एका प्रदेशात पूर्वी बलात्कार, अत्याचार, कुनीतीची कृत्ये घडत होती. त्या प्रदेशाला इंग्रजी अमलाखाली आल्यावर ७० वर्षांतच बदलता आले आणि आता हा प्रदेश निर्भयपणे स्वातंत्र्य उपभोगत आहे असेही बाळशास्त्रींनी या पहिल्या अग्रलेखात म्हटले आहे. तेथे इंग्रजी भाषा आणि भाषिक वृत्तपत्रे यांचा प्रसार झाल्यामुळे आश्‍चर्यकारक परिवर्तन झाले असे ते म्हणतात.
हा सारा काळ १८३० ते ४० दरम्यानचा आहे हे लक्षात घेतले पाहिजे. इंग्रजी भाषा आणि इंग्रजी सत्ता यांनी भारलेली ती पिढी होती आणि इंग्रज आल्यामुळे आपल्या देशाचा आणि आपला अभ्युदय होत आहे हीच त्यांची भावना होती. ‘दर्पण’ हे मराठी व इंग्रजी असे द्विभाषिक वृत्तपत्र होते. एका स्तंभात मराठी मजकूर, तर बाजूच्या तेवढ्याच स्तंभात त्या मजकुराचे इंग्रजी भाषांतर असा हा अवतार होता. मराठी वाचकांप्रमाणे इंग्रज अधिकार्‍यांनीही ‘दर्पण’ डोळ्यांखालून घालावे इतकेच नव्हे तर साहेबलोकांनी इंग्रजी विद्या, कला याबद्दल लिहून पाठविले तर तेही त्यामध्ये छापले जाईल असे बाळशास्त्री म्हणतात.

‘केसरी’ चे पर्व

४ जानेवारी १८८१ म्हणजे पुढे ४९ वर्षांनी ‘केसरी’ हे वृत्तपत्र गोपाळ गणेश आगरकर आणि बाळ गंगाधर टिळक यांनी सुरू केले. त्यावेळी आपली भूमिका संपादक म्हणून आगरकरांनी मांडली आहे. अलीकडे कोणीही उठून वर्तमानपत्र काढतो, पण आपण लोककल्याणाच्या हेतूने ‘केसरी’ काढत आहोत असे प्रारंभी ते म्हणतात. याचाच अर्थ बाळशास्त्रींच्या नंतरच्या ४०-५० वर्षांत वृत्तपत्रांचा गावोगावी बर्‍यापैकी प्रसार झाला असा आहे. ‘रस्तोरस्ती दिवे लागले असल्याने व पोलिसांची गस्त सारखी ङ्गिरत असल्याने जो उपयोग होत असतो तोच ज्या त्या जागी वर्तमानकर्त्याची लेखणी सदोदित चालू असल्याने होत असतो. म्हणजे एक तर समाजात जागृतीचे दिवे लावणे आणि पोलिसाप्रमाणे प्रतिबंधात्मक कारवाईचा एक दबदबा तयार करणे हे ‘केसरी’कारांनी आपले काम मानले. सरकारी कारभाराला दिशा देणे आणि त्यामधील गैरप्रकार उघड करणे हेही काम आपण करणार आहोत अशी ग्वाही या पहिल्या धोरणविषयक अग्रलेखात त्यांनी दिली आहे. याचा अर्थ असा आहे की, इंग्रजी अमलावर घणाघाती टीका करणे किंवा राजकीय स्वातंत्र्याचा पुरस्कार करणे हे प्रारंभी तरी ‘केसरी’ला अभिप्रेत नव्हते. टिळक जसे राजकारणात तळपू लागले आणि ‘लोकमान्य’ झाले तसे ‘केसरी’ चे स्वरूप हे बदलत गेले आणि नंतर ते स्वातंत्र्याच्या लढ्याचे मुखपत्र झाले.

‘सुधारकी’ पत्रकारिता

‘केसरी’चे हे बदलते स्वरूप सामाजिक सुधारणांना महत्त्व देणार्‍या गोपाळ गणेश आगरकरांना मान्य होणारे नव्हते. त्यामुळे ते तेथून बाहेर पडले आणि ‘सुधारक’ हे नवे वृत्तपत्र त्यांनी काढले. लोकमान्यांची राजकीय आघाडीवरील पत्रकारिता जेवढी आक्रमक होती तेवढीच सामाजिक बदलांबद्दलची त्यांची मते स्थितीप्रिय होती. त्यामुळेच त्या काळात महात्मा ज्योतीराव ङ्गुले यांची पत्रकारिता वाढली, ब्राह्मणेतर चळवळीतील ‘विजयी मराठा’ किंवा अन्य वृत्तपत्रांचाही बोलबाला झाला. नंतरच्या काळात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची दलित वर्गाची वेदना मांडणारी पत्रकारिता आपण ‘प्रबुद्ध भारत’ किंवा ‘मूकनायक’ यामधून पाहिली.

‘सकाळ’ युग

स्वातंत्र्यप्राप्तीनंतर अन्य भाषांप्रमाणे मराठी पत्रकारितेतही मोठे बदल दिसू लागले. स्वातंत्र्यपूर्व काळातील पत्रकारिता ही मुख्यतः मतपत्रांच्या स्वरूपाची किंवा स्वातंत्र्य मिळविण्याच्या विचाराच्या प्रसाराची होती. पण स्वातंत्र्य मिळाले आणि आता वृत्तपत्रांनी काय प्रकाशित करायचे असा प्रश्‍न निर्माण झाला. त्यातूनच मग मराठी पत्रकारिता ही समाजातील विविध घडामोडींना स्थान देऊन त्या वाचकांपर्यंत नेऊ लागली. वृत्तपत्रांचा आशय आणि स्वरूप यामधील हा खूपच मोठा बदल होता. त्यातच अमेरिकेत वृत्तपत्रव्यवसायाचे शिक्षण घेतलेल्या आणि तेथील दैनंदिन जीवनातील घटनांचे दर्शन घडविणारी अमेरिकी पत्रकारिता पाहिलेल्या डॉ. ना. भि. परुळेकर यांनी ‘सकाळ’ हे वृत्तपत्र सुरू केले. उगाच वैचारिक लेखन आणि समाजातील विविध प्रश्‍नांवर आग्रही भूमिका घेण्यापेक्षा जे आजूबाजूला घडते, ज्याचा सर्वसामान्य माणसाच्या दैनंदिन जीवनावर थेट परिणाम होतो अशा गोष्टींना स्थान देऊन दैनिक वृत्तपत्र चालविणे हा पूर्णतः वेगळा असा हा आकृतिबंध होता. शहरी आणि ग्रामीण भागातील सर्वसामान्य माणसाचे प्रश्‍न, अडचणी, त्याला आवश्यक त्या गरजा हे बातम्यांचे विषय झाले. पुण्याच्या मंडईत त्या काळी मर्यादित अशा पुण्यातील लोक नियमितपणे जात. ही मंडई हाही बातम्यांचा विषय असू शकतो हे ‘सकाळ’ ने लोकांना दाखवून दिले.
स्वातंत्र्यानंतर इंग्रजी पत्रकारिताही बदलली आणि त्याच पद्धतीने भाषिक पत्रकारितेतही बदल होत गेले. आधी ट्रेडल, नंतर सिलिंडर आणि त्यानंतर रोटरी छपाई यंत्रे यातून वृत्तपत्रांचे तांत्रिक अंग सुधारत गेले. वाढती स्पर्धा आणि जेमतेम सहा तास एवढा छपाईसाठी मिळणारा वेळ यातून वेगवान व एकाच वेळी छपाई करणारी यंत्रे आली. मुंबई, पुणे किंवा नागपूर अशा एकाच ठिकाणी प्रसिद्ध होणारी, एकच आवृत्ती काढणारी बडी आणि साखळी वृत्तपत्रेही बदलू लागली. या वृत्तपत्रांच्या रविवार आवृत्त्या अनेक विषय मांडू लागल्या. कथा, कविता, ललित लेख प्रसिद्ध करू लागल्या आणि मराठीतील मासिके आणि साप्ताहिके यांचे अस्तित्वच धोक्यात आले. मराठी संस्कृतीचे वेगळेपण म्हणून आज दिवाळी अंक तेवढे कसेबसे टिकून आहेत. पण त्यांनाही आता ङ्गारसे भवितव्य दिसत नाही.

प्रादेशिक वृत्तपत्रांचे योगदान

मुंबईमध्ये ‘लोकसत्ता’, ‘नवशक्ती, पुण्यात ‘सकाळ’, ‘प्रभात’, नागपूरला ‘तरुण भारत’, नाशिकला ‘गावकरी’ अशी वृत्तपत्रे निघत होती आणि आपल्या प्रभाव क्षेत्रात वाचकांची भूक भागवत होती. संयुक्त महाराष्ट्राचे आंदोलन पेटल्यावर या लोकचळवळीला प्राधान्य देणारे वृत्तपत्र किंवा मुखपत्र हवे असा विचार पुढे आला आणि त्यातूनच ‘मराठा’ या आचार्य अत्रे यांच्या दैनिकाचा उदय झाला.‘मराठा’ ने आक्रमक पत्रकारिता किंवा मोहीम राबविणारी पत्रकारिता कशी असावी याचा जणू वस्तुपाठ निर्माण केला. संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाच्या प्रचार - प्रसारात आचार्य अत्रे यांची वाणी आणि ‘मराठा’ द्वारे आग ओकणारी लेखणी यांचे योगदान ङ्गार मोठे आहे. १९६० मध्ये संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाली आणि एका पद्धतीने विचार केला तर ‘मराठा’चे प्रयोजन संपले. पण संयुक्त महाराष्ट्र समिती आणि नंतर संपूर्ण महाराष्ट्र समिती व ‘मराठा’ चे अस्तित्व राहिले आणि ते सत्तारूढ कॉंग्रेसविरोधी राजकारणाचे मुखपत्र झाले.

‘महाराष्ट्र टाइम्स’ मधील स्थित्यंतरे

यानंतर झालेले एक स्थित्यंतर म्हणजे ‘टाइम्स’ वृत्तपत्र समूहाने ‘महाराष्ट्र टाइम्स’ हे मराठी भाषी दैनिक सुरू केले. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी ‘टाइम्स’च्या व्यवस्थापनाकडे चिकाटीने केलेला पाठपुरावा, महाराष्ट्राच्या मुंबई या राजधानीत ‘टाइम्स’चे असलेले मुख्यालय आणि तेथूनच प्रसिद्ध होणारे ‘नवभारत टाइम्स’ हे हिंदी दैनिक या गोष्टी लक्षात घेऊन मराठी भाषेतील दैनिक ‘टाइम्स’ गटाने प्रसिद्ध करणे योग्य ठरेल असे यशवंतरावांनी जैन बंधूंच्या गळी उतरवले आणि १९६२ मध्ये अनेक अडचणींतून ‘महाराष्ट्र टाइम्स’ सुरू झाले.
द्वा. भ. कर्णिक यांच्यासारखा साक्षेपी संपादक (ज्यांनी ‘नवप्रभे’चे पहिले संपादक म्हणून मुहूर्तमेढ रोवली), त्यांना लोकाभिमुख पत्रकारितेची साथ देणारे माधव गडकरी, सर्वस्पर्शी रविवार आवृत्तीचे संपादन करणारे शंकर सारडा आणि ‘टाइम्स’चा दबदबा व वितरणव्यवस्था यामुळे ‘महाराष्ट्र टाइम्स’ वाढत गेला. त्याचवेळी ‘लोकसत्ता’ या दैनिकाने ह. रा. महाजनींचे लेखन व एक्स्प्रेस समूहाचे वितरण-कौशल्य यामुळे महाराष्ट्रभर आपले जाळे विणले होते.
पुढेे २५-३० वर्षे  गोविंद तळवलकर यांच्यासारख्या अभ्यासू, पण परखड लेखन करणार्‍या संपादकाच्या नेतृत्वाखाली ‘महाराष्ट्र टाइम्स’चा खूप विस्तार झाला. तळवलकर यांनी एका बाजूला आपल्या घणाघाती लेखनाने आणि अत्यंत अभ्यासू स्वरूपाच्या साहित्याच्या समावेशाने ‘महाराष्ट्र टाइम्स’ ला महाराष्ट्रातील बुद्धिमंत वर्गात प्रतिष्ठा मिळवून दिली. त्यांच्या संपादनाच्या अखेरच्या आठ-दहा वर्षांत ‘महाराष्ट्र टाइम्स’ ला धक्के बसू लागले. ‘पत्र नव्हे मित्र’ अशी म. टा. ची जाहिरात सुरू झाली आणि आता तेथे वयोवृद्धांच्या विचारी लेखनाबरोबरच मैत्रीचा मोकळेपणा येऊ घातला आहे हे जाणवू लागले. म. टा.चे गंभीर, दर्जेदार वृत्तपत्राचे जेवढे यश तळवलकर यांचे होते तेवढेच ते तेथे त्यांचे सहकारी असलेल्या दि. वि. गोखले यांचे होते. आपण दोन क्रमांकावरच राहायचे आणि तळवलकर यांना वाचन-लेखनासाठी सवड द्यायची, शिवाय आपली हिंदुत्ववादी विचारसरणी वृत्तपत्रात डोकावू द्यायची नाही हे पथ्य दि. वि. गोखले यांनी पाळले. पण त्यांच्या निवृत्तीनंतर तळवलकरांचे स्थान डळमळीत होऊ लागले आणि व्यवस्थापनाने आधी टिकेकर व नंतर कुमार केतकर यांना क्रमांक दोनवर आणून म. टा.अधिक तरुण वाचकांचा व्हावा असे प्रयत्न सुरू केले.

तरुणांभिमुख वृत्तपत्र


केतकर यांनी संपादक झाल्यावर म. टा. अधिक लोकाभिमुख केला, पण म. टा. च्या वाचकांचा वयोगट खाली आणण्यासाठी आणि तो ‘ट्वेंटी प्लस’ करण्यासाठी अखेर भारतकुमार राऊत यांना आधी कार्यकारी संपादक आणि नंतर संपादक या पदावर आणण्यात आले. राऊत यांनी म.टा. म्हणजे ‘पत्र नव्हे मित्र’ एवढ्यावर न ठेवता ‘पत्र नव्हे स्मार्ट मित्र’ केला. त्यासाठी म.टा. च्या संपादकीय वर्गात ओबीसी समाजातील डॅशिंग तरुणाई आणली. आर. के. लक्ष्मणचा कॉमन मॅन पान ४ व ५ वर गेला. नाटक, सिनेमा, कॉलेज जीवन, पर्सनल ङ्गायनान्स, टॅक्स सेव्हिंग असे विषय म.टा.मध्ये आले. राजकीय बातम्या खूप कमी झाल्या. भाषणांच्या बातम्या बंद झाल्या, बातमीचे मूल्य बदलले आणि सिनेमा, गॉसिप या गोष्टी पान एकवर दिसू लागल्या. पान १ वरील बातमीचा उर्वरित भाग आतील पानावर नको, कोणतीही बातमी ३५० शब्दांपेक्षा अधिक नको, सर्वसामान्य वाचकाला वाचनीय न वाटणारे काहीही अंकात नको असे नवे संकेत रूढ झाले. खेळ, करमणूक, कॉलेज जीवन, लोकांना आवडतील त्या गोष्टींना दाद आणि लोकप्रिय अशा विविध क्षेत्रातील लोकांचा म. टा. तर्ङ्गे गौरव हे सारे लोकप्रिय ठरले. त्याचबरोबर म. टा.ची भाषा बदलली, बोलण्यात सर्रास इंग्रजी शब्द येतात, लोकभाषेतील शब्द येतात, मग ते बातम्यांत, लेखनात का नकोत असे आग्रहाने सांगण्यात येऊ लागले. आपल्या वृत्तपत्राला विद्वत्‌मान्यता नाही मिळाली तर काही बिघडत नाही, पण व्यापक समाजमान्यता हवी असे नवे मार्केटिंगचे तंत्र स्वीकारण्यात आले. संपादक हा राजकीय नेते, अन्य क्षेत्रांतील नेते यात थेट वावरणारा हवा आणि तो प्रभावी इव्हेंट मॅनेजर हवा असा हा बदल होता. म. टा. हा टाइम्स गटाचा, मुंबईहून प्रसिद्ध होणारा पेपर त्यामुळे त्याचे झटपट अनुकरण महाराष्ट्रातील विविध प्रादेशिक व जिल्हापत्रांनी केले आणि बघता बघता मराठी वृत्तपत्रव्यवसाय बदलून गेला.

रंगीत दूरदर्शनचा प्रभाव

१९८४ मध्ये दूरदर्शन रंगीत झाले, त्यामुळे वृत्तपत्रे रंगीत होण्याचे, त्याचे मोठ्या प्रमाणावर संगणकीकरण होण्याचे सत्र सुरू झाले. पीटीआय, यूएनआय यांचे टेलीप्रिंटर्स मोडीत गेले आणि नंतरच्या आठ-दहा वर्षांत इंटरनेटने अवघी मराठी पत्रसृष्टी व्यापून टाकली. २००५ नंतर तर मराठीत डझनभर वृत्तवाहिन्या निघाल्या. आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय व राज्य पातळीवरची रंगीत छायाचित्रे इंटरनेटमुळे सर्वांना मिळू लागली.
आज मराठी वृत्तपत्रसृष्टी आशय, स्वरूप, सादरीकरण या सर्वच आघाड्यांवर पूर्णतः बदलली आहे. पण रंगीत छपाई, अनेक आवृत्त्या, जिल्हा आवृत्त्या, गळेकापू स्पर्धा यामुळे खूप अडचणीत आहे. खप वाढत आहे; पण वाढता खप कागदाच्या वाढत्या किमतीमुळे आणि वाढत्या वाहतूक खर्चामुळे परवडत नाही. आक्रमक मार्केटिंगमुळे वृत्तपत्रे किमती वाढवत नाहीत आणि ग्राहकाची मानसिकताही स्वस्त वृत्तपत्रे मिळावित अशी झाली आहे. साबण, पेस्ट इतकेच काय बीअरप्रमाणे वृत्तपत्रांचे वितरण व मार्केटिंग केले जात आहे. ज्याची मार्केटिंग स्कीम चालू असेल ती पेस्ट किंवा तो चहाचा पुडा घ्यायचा ही वाचकांची किंवा ग्राहकांची सवय बनू पाहात आहे. चकचकीत, रंगीत पुरवण्या काढणे हे परवडत नसले तरी गरज बनले आहे. ‘टाइम्स ऑङ्ग इंडिया’ च्या एका अंकाचे निर्मिती मूल्य २२ रुपये ५० पैसे आहे आणि विक्रीची किंमत दोन रुपये आहे. ‘टाइम्स’ च्या मार्केटिंग यंत्रणेमुळे आणि प्रतिष्ठेमुळे त्यांना जाहिराती मिळतात; पण इतरांचे काय? त्यांचे निर्मितीमूल्यही आज दर अंकाला दहा रुपयांच्या आसपास आहे.

अस्तित्वाची लढाई

दुसरीकडे कंझ्युमर ड्युरेबल आणि प्रॉडक्ट म्हणजे ग्राहकोपयोगी उत्पादने व साधने यांच्या जाहिराती पूर्णपणे दूरचित्रवाणीकडे गेल्या आहेत. तेथेही एक वाहिनी चालविण्याचा सुमारे २५ कोटींचा वार्षिक खर्च आता परवडत नाही. ब्रिटनमध्ये १५-२० वर्षांपूर्वी वृत्तपत्रे जवळजवळ ङ्गुकट वाटली जात होती, आज बरीच वृत्तपत्रे बंद पडली आहेत. लंडनच्या बीबीसीचे वैभव आणि रुबाब केव्हाच संपला आहे. मराठीतील दिवाळी अंक एकेकाळी खूप समृद्ध होते, आज तरीही शंभरेक बर्‍यापैकी अंक निघत आहेत, पण येत्या पाच वर्षांत ङ्गारच मोजके अंंक निघतील.  मराठी वृत्तपत्राचे बदलते स्वरूप हे असे आहे. येत्या दहा वर्षांत वृत्तपत्राच्या अंतरंगात आणखी बदल होतील; पण ते मुख्यतः अस्तित्व टिकविण्यासाठीच असतील.





0 comments:

वाचनीय

  © Blogger templates The Professional Template by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP