मराठी पत्रकार

गोव्याच्या दैनिक नवप्रभाचे संपादक श्री. परेश प्रभू यांचा हा अधिकृत ब्लॉग समस्त पत्रकार मित्रांसाठी...

माध्यम चर्चा

पत्रकार मित्रांच्या आपल्या क्षेत्राबद्दलच्या जाणिवा अधिक प्रगल्भ व्हाव्यात या उद्देशाने हा ब्लॉग तयार करण्यात आला आहे. या ब्लॉगवर समाविष्ट करण्यासारखी माहिती आपल्या नजरेस आली, किंवा या ब्लॉगवरील एखाद्या लेखाविषयी प्रतिक्रिया द्यावीशी वाटली तर जरूर कळवा - goa.paresh@gmail.com


Wednesday, January 07, 2015

आपण आता डिजिटल जर्नलिझमच्या जमान्यात आहोत आणि प्रत्येक नागरिक हा जर्नलिस्ट आहे. याचा अर्थ सोशल मीडिया ही मुख्य प्रवाहातील मीडियाची जागा घेऊ शकेल असा मुळीच नाही. ते होणे शक्य नाही, कारण व्यावसायिक पत्रकार हे वेगळेच रसायन असते आणि सोशल मीडियामुळे तयार झालेले हौशी पत्रकार हा वेगळा प्रकार असतो. मात्र, व्यावसायिक पत्रकारितेला त्या हौशी पत्रकाराची पदोपदी जाणीवपूर्वक दखल घ्यावीच लागेल, कारण तो कधीही - कुठेही असू शकतो.


‘ब्रोकन’न्यूजचे संकट


प्रमोद आचार्य,संपादक, प्रुडण्ट मीडिया, पणजी


ओव्हरहर्ड न्यूजरूम नावाचे ट्विटरवर एक हँडल आहे. पत्रकार आणि वृत्तपत्र - वृत्तवाहिन्यांच्या न्यूजरूममध्ये होणाऱी विनोदी संभाषणे हे हँडल आपल्या फॉलोअर्सना पाठवते. त्यातलाच चटकन् लक्षात रहावा असा हा किस्सा -
या संभाषणातून प्रतीत होणारी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ‘सोशल मीडिया एडिटर’ नावाचे पद आता बहुतेक प्रसारमाध्यमांत तयार झाले आहे.
का?
काही वर्षांआधी प्रसारमाध्यमांच्या कार्यालयात फेसबुकवर चॅटिंग करणार्‍या कर्मचार्‍यांना ‘खडसावले’ जायचे. ट्वीटरवर वेळ ‘वाया’ घालवणे हा गुन्हा आहे. आधी काम करा, मग ट्वीटर, असे फतवे काढले जायचे. इन्स्टाग्रामवर फोटो अपलोड करणार्‍यांना ‘टवाळखोरां’च्या यादीत टाकले जायचे. पण काही तरी बदलले. खडसावणे बंद झाले. फतव्यांनी वेगळी दिशा धरली. टवाळखोरांची गरज भासू लागली.

तंत्रज्ञानाशी सलगी गरजेची

 आज आपल्या कार्यालयातील पत्रकार ट्वीटरवर नसेल तर त्याच्या कुवतीबद्दल संपादकाला चिंता वाटू लागते. मला फेसबुक आवडत नाही म्हणणारा न्यूजरूमसाठी धोकादायक वाटू लागतो. सोशल मीडियाला शिव्या घालत मुख्य प्रसारमाध्यमांचे गोडवे गाणारा कमअकली वाटू लागतो.
का?
ओसामा बिन लादेनला अमेरिकेने पाकिस्तानमध्ये घुसून ठार मारले ही त्या वर्षीची जगातली सर्वांत महत्वाची ब्रेकिंग न्यूज. आश्चर्याची गोष्ट म्हणजे ही न्यूज ट्वीटरवर ब्रेक झाली. घडले असे -
२०११ सालची गोष्ट. रात्रीचे ९.४५ वाजलेले. रविवारची रात्र. व्हाइट हाऊसचे संपर्क संचालक डॅन पीफिफर यांचा ट्विटरवर संदेश आला -  POTUS to address the nation tonight at 10:30 p.m. Eastern Time. 

‘पोटस’ म्हणजे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष. सगळे पत्रकार सतर्क झाले. एवढ्या रात्री बराक ओबामा का भाषण करताहेत याविषयी तर्कवितर्क सुरु झाले. सुट्टीवर असलेल्या सर्व पत्रकारांना तातडीने कामावर बोलावण्यात आले. निश्‍चित माहिती कुणालाच मिळत नव्हती. पण संदेशाची वेळ आणि अगतिकता बघून जगाला हादरवून सोडणारी घोषणा राष्ट्राध्यक्ष करू शकतात, याविषयी सर्वांची खात्री पटली.
 अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे भाषण सुरू व्हायला पाच मिनिटे असताना पुन्हा ट्विटर दणाणले. दहा वाजून पंचवीस मिनिटांनी अमेरिकेचे माजी संरक्षण सचिव (डिफेन्स सेक्रेटरी) डोनाल्ड रम्सफिल्ड यांचे चीफ ऑफ स्टाफ किथ उर्बाह्न यांच्या ट्वीटर हँडलवर पुढील शब्द झळकले -So I'm told by a reputable person they have killed Osama Bin Laden. Hot damn.

 न्यूज ब्रेक झाली. तीही ट्वीटरवर. राष्ट्राध्यक्षांच्या भाषणाच्या पाच मिनिटे आधी.
मात्र, हे सर्व घडण्याआधी, काय चाललेय याची जराही चुणूक नसताना अजाणतेपणी अमेरिकन नॅव्ही सिल्सची ती ऐतिहासिक रेड अबोट्टाबाद-पाकिस्तानमधील ओसामाचा शेजारी (आपण बिन लादेनचे शेजारी होतो हे त्याला नंतर कळले) आणि एक सामान्य मध्यमवर्गीय आयटी कन्सल्टंट शोएब अथरने लाइव्ह-ट्वीट केली.
किथ उर्बाह्नच्या ब्रेकिंग न्यूज ट्वीटच्या नऊ तास आधी शोएबने ही माहिती ट्वीटरवर टाकलेली. मात्र, ती रेड ओसामा बिन लादेनसंबंधी होती हे खुद्द शोएबला किथच्या ट्वीटनंतर उमगले.
आता ही आकडेवारी बघा- जगातल्या सर्वांत मोठ्या लोकशाही ऱाष्ट्राच्या निवडणुकीच्या काळात सोशल मीडियाने केलेली ही करामत.
* लोकसभा निवडणुकांच्या काळातील फेसबुकचा डाटा बघितला तर नरेंद्र मोदींची फेसबुकवरील लोकप्रियता एप्रिल ७ ते मे १२ च्या दरम्यान १४.८६ टक्क्यांनी वाढली.
* निवडणुका घोषित होऊन निकाल येईपर्यंत सुमारे ३ कोटी नागरिकांनी निवडणुकांसंबंधी २५ कोटी इंटरॅक्शन्स फेसबुकवर केली.
* फक्त निवडणुकीच्या दिवशी देशभरातील मतदारांच्या मूडवर चर्चा करणारी २ कोटी ट्वीटस् ट्वीटरवर नोंद झाली.

सरकारही सोशल मीडियावर

नरेंद्र मोदींनी पंतप्रधानपदाची सूत्रे आपल्या हाती घेतल्यानंतर तर केंद्र सरकार ट्वीटर आणि फेसबुकवरुन जनतेशी सरळ संवाद साधू लागले. स्वत: पंतप्रधान, त्यांच्या कार्यालयाचे पीएमओ हँडल, त्यांचे कॅबिनेट सहकारी, महत्वाच्या खात्यांचे सचिव आणि पीआयबी आणि आयएमबी सारख्या केंद्र सरकाराच्या जनसंपर्क संस्थासुध्दा ट्वीटरवरुन माहिती प्रसारित करु लागल्या.
आता गोव्याचे बघूया.
 मुख्यमंत्री मनोहर पर्रीकरांचे ट्वीटरवर दीड लाख फॉलोअर्स आहेत. त्यांची फेसबुक पेज २ लाख नागरिक फॉलो करतात. त्यांच्या प्रत्येक पोस्टला सुमारे ५ हजार लाइक्स मिळतात. २०० च्या आसपास प्रत्येक पोस्ट शेअर केले जाते. प्रत्येक पोस्टखाली दीडशेपेक्षा जास्त कमेंट्स असतात.
कुठल्याही विषयावरचे आपले मत फातोर्ड्याचे आमदार विजय सरदेसाई ट्वीटर आणि फेसबुकवरच मांडतात. लोकांच्या प्रतिक्रिया घेतात. जनतेचा मूड समजून घेतात.
महत्वाची वक्तव्ये आता फेसबुकवरुन प्रसारित केली जातात. ट्वीटरवर नेमके, मार्मिक आणि अचूक मत मांडले जाते. याशिवाय, नरेंद्र सावईकर, श्रीपाद नाईक, विश्वजीत राणे, विष्णू वाघ, आम आदमी पार्टी-गोवा यांनीही ट्वीटर-फेसबुकवर बर्‍यापैकी जम बसवलेला आहे.
गोव्याची विधानसभा आता पूर्णपणे ऑनलाइन झालेली आहे. विधानसभेच्या कामकाजाचा संपूर्ण मजकूर आता कम्प्युटरवर एक क्लिक करून मिळू शकतो.
फेसबुकवर सध्या १२५ कोटी ऍक्टिव्ह युजर्स आहेत. ट्विटरवर सध्या २५ कोटी फॉलोअर्स आहेत आणि ही संख्या दर सेकंदाला वाढत आहे. यापैकी १७ कोटी यूजर्स मोबाईलवर ट्वीटर वापरतात, तर ८१ कोटी सदस्य मोबाईलवर फेसबुक वापरतात.

ऍप्सचा आहे जमाना

आता मोबाईलचा विषय आलाच आहे म्हणून...
ऍप्स आल्यापासून तर आपले विश्वच बदलून गेले आहे. मनोरंजनाचे वा गेम्सचे ऍप्स सोडा, फक्त बातम्या देणारे Aऍप्स पाहिले तरी डोके गरगरते. जगातल्या बहुतेक प्रसामाध्यमांचे आज आपले ऍप आहे. ऍप म्हणजे अप्लिकेशन. ते आपल्या फोनवर डाऊनलोड केले की झाले. आपला फोन कुठल्या ऑपरेटिंग सिस्टमवर चालतो त्यावर आपण कुठल्या प्लॅटफॉर्मवरुन ऍप डाऊनलोड करायचे ते कळते. चार प्रमुख प्लॅटफॉर्मस् आहेत. आय-फोनचा ऍप स्टोअर, गुगलचा गुगल प्लेे स्टाएर, ब्लॅकबेरीचा ब्लॅकबेरी वर्ल्ड आणि विंडोज फोन स्टोअर.
ऍप स्टोअर व प्ले-स्टोअरवर आजच्या घडीला दहा लाखांपेक्षा जास्त ऍप्स आहेत. विंडोज फोन स्टोअरने तीन लाखांचा टप्पा पार केलेला आहे तर ब्लॅकबेरीजवळ दीड लाखांच्या आसपास ऍप्स आहेत.
आज प्रत्येक बातमी, प्रत्येक ब्रेकिंग न्यूज तुमच्या मोबाईलवर येऊन धडकते. गोपिनाथ मुंडेंना अपघात झाला ही बातमी मला आधी माझ्या फोनवरील एका राष्ट्रीय वृत्तवाहिनीच्या ऍपवरून आलेल्या अपडेटमुळे समजली. मग मी ट्वीटर उघडले. तिथे एकेक ट्वीट रिअल टाइम अपडेट देत होते. मग मी मोबाईलवरच विविध संकेतस्थळे चाळून बघितली. तिथून जेवढी मिळेल तेवढी माहिती घेतली. नंतर मी टीव्ही चालू केला. एव्हाना टीव्ही चॅनल्सच्या ओबी व्हॅन्स घटनास्थळी पोचत होत्या. मी टीव्ही बघेपर्यंत एकेकाचे थेट प्रक्षेपण सुरू होत होते.
याचा अर्थ काय..?

‘लाइव्ह’ न्यूजचे मरण

दीड-दोन वर्षांआधी टीव्हीच्या लाइव्ह न्यूजचे आपल्याला थ्रिल होते. घटना जशी घडेल तसे वृत्तांकन, हा फॉर्म्युला आपल्याला चिक्कार आवडायचा. पण आज मुंडेंच्या अपघाताची ब्रेकिंग न्यूज देणारे ऍप,  त्यापेक्षा जास्त माहिती पुरवणारं ट्विटर वा फेसबुक हे दुसरे आणि सविस्तर माहिती सांगणारी वेबसाइट किंवा संकेतस्थळ हे तिसरे माध्यम झालेय. मग टीव्हीचा नंबर. म्हणजे टीव्ही चौथ्या क्रमांकावर.
 पण मी त्यावेळी घरी होतो म्हणून टीव्ही सुरू केला. पण मी प्रवास करत असतो तर...तर मी ही बातमी कुठे ‘बघितली’ असती...
आजच्या काळात उत्तर सोपे आहे. मी फोनवर कुठल्यातरी राष्ट्रीय वृत्तवाहिनीची वेबसाइट उघडली असती, तिथे लाइव्ह स्ट्रिमिंग म्हणून लिहिलेल्या पर्यायावर क्लिक केले असते आणि फोनवरच्या थ्रीजी कनेक्शनमुळे टीव्हीवर काय चाललेय हे मोबाईलवर लाइव्ह बघितले असते. म्हणजे, मी टीव्ही मोबाईलवर बघितला असता.
 एवढेच नव्हे तर कुठलीही मालिका किंवा कार्यक्रम टीव्हीवर बघायचा राहून गेला तरी मी रात्री उशिरा वा दुसर्‍या दिवशी सकाळी तो यु-ट्यूबवर बघितला असता.
आता आपल्या गोव्यातील प्रुडंटचेच बघा. टीव्ही हे आमचे प्रमुख माध्यम आहे, पण आमच्या बातम्या व कार्यक्रम तुम्हाला आमच्या संकेतस्थळावर बघायला मिळतील. प्रवास करत असाल तर तुमच्या मोबाईलवरील प्ले-स्टोअरमधील ऍपवर बघायला मिळतील. बातमी वाचायची असेल तर ती फेसबुक पेज किवा ट्वीटर हँडलवर जाऊन वाचता येईल. एवढेच नव्हे तर संपूर्ण व्हिडियो बुलेटिन आमच्या यू-ट्यूब चॅनलवर बघता येईल... तुम्हाला पाहिजे तेव्हा. एवढ्याने समाधान होत नसेल तर डिजिटल गोवा-प्रुडंट एमएमएस न्यूज सर्व्हीसच्या माध्यमातून ब्रेकिंग न्यूज थेट तुमच्या मोबाइलबर एसएमएस बनून तुमच्या इनबॉक्समध्ये येऊन थडकेल. प्रुडंट एवढे करत असेल तर न्यूयॉर्क टाइम्स, बीबीसी, एबीसी, फॉक्स काय-काय करत असतील याची कल्पनाच करवत नाही.
म्हणूनच मी म्हणतो, आपण आता डिजिटल जर्नलिझमच्या जमान्यात आहोत आणि प्रत्येक नागरिक हा जर्नलिस्ट आहे. याचा अर्थ सोशल मीडिया ही मुख्य प्रवाहातील मीडियाची जागा घेऊ शकेल असा मुळीच नाही. ते होणे शक्य नाही, कारण व्यावसायिक पत्रकार हे वेगळेच रसायन असते आणि सोशल मीडियामुळे तयार झालेले हौशी पत्रकार हा वेगळा प्रकार असतो. मात्र, व्यावसायिक पत्रकारितेला त्या हौशी पत्रकाराची पदोपदी जाणीवपूर्वक दखल घ्यावीच लागेल, कारण तो कधीही - कुठेही असू शकतो आणि त्याच्याकडे ओसामा बिन लादेन ते जीएमसीमधील रक्तचरित्र, या रेंजमधील कुठलीही महत्त्वाची बातमी असू शकते.

‘सिटीजन जर्नलिझम’

काही महिन्यांआधी आम्ही केलेले ‘ऑपरेशन रक्तचरित्र’ हे आमच्या रिपोर्टरने केलेले नव्हते. ते एका जागरुन नागरिकाने आपला नातेवाईक जीएमसीमध्ये असताना तिथल्या जाचाला आणि भ्रष्टाचाराला कंटाळून आपल्या मोबाईलवर चित्रित केलेले स्टिंग ऑपरेशन होते. त्या नंतर दुसरे स्टिंग ऑपरेशन आमच्या रिपोर्टरने केलं. पण पहिला मान हा त्या नागरिकाचा होता. म्हणजे, जीएमसीत जाणार्‍या सामान्य माणसांच्या वेदनाना वाचा फोडणारा कुणी व्यावसायिक पत्रकार नव्हता, तर एक सामान्य संवेदनशील नागरिक होता. तो एक सिटिझन जर्नलिस्ट होता. मोबाईल हा त्याचा ‘हिडन कॅमेरा’ होता.
म्हणूनच, सर्व प्रसारमाध्यमाना आपली कार्यपध्दती, धोरणे, योजना आणि रणनीती सध्याच्या मीडियातील या बदलाना अनुसरुन आखावी लागतेय. कारण, बिन लादेनच्या खातम्याची बातमी टीव्हीने दाखवून, त्यावर चर्चा करुन त्या बातमीचा पूर्णपणे चोथा झाल्यावर जर दुसर्‍या दिवशी वृत्तपत्रांनी ओसामा बिन लादेन ठार म्हणू हेडलाइन दिली तर त्याला काय अर्थ राहणार...?
त्यामुळे फक्त टीव्हीच नव्हे तर वृत्तपत्रानाही आपल्या कार्यशैलीत आमूलाग्र बदल करणे भाग पडणार आहे. आपल्या दर्शकांना किंवा वाचकांना जर या पारंपरिक प्रसारमाध्यमांत गुंतवून ठेवायचे असेल तर आपल्याला फक्त नव्या प्रसारमाध्यमांमध्ये गुंतवणूक करुन भागणार नाही तर आधल्या प्रसारमाध्यमाना नवसंजीवनी देण्यासाठी नवनवीन प्रयोग करावे लागतील. सर्जनशीलतेचे नवनवीन आयाम गाठावे लागतील.
यातील सर्वांत महत्वाची गोष्ट म्हणजे कन्टेन्ट. जे घडते तेवढेच घेऊन त्याचे चर्वितचर्वण करणे आणि एकाच विषयामागे चर्चेचे गुर्‍हाळ लावून धरणे हा आपला शिरस्ता झालाय. या डिजिटल जर्नलिझमच्या जमान्यात आपल्याला टिकायचे असेल तर फक्त घडणार्‍या बातम्यांमागे पिंगा घालत बसण्यापेक्षा नवीन बातम्या शोधून काढाव्या लागतील. शहराच्या कक्षा ओलांडून गावागावांत जाऊन जनसामान्यांच्या आयुष्यावर स्टोरीज् कराव्या लागतील. प्रत्येक रिपोर्टरला पुन्हा एकदा ‘ग्राऊंड झिरो’ बनावे लागेल. तेव्हाच सोशल मीडियाचा दबाव असतानासुध्दा आपण पूर्णपणे प्रोफेशनल जर्नलिझमचा दर्जा वाढवणार्‍या बातम्या देऊ शकू. सोशल मीडियाच्या तडाख्यातही काहीतरी ‘वेगळे’ देऊ शकू, कारण हे वेगळे देणे हाच आमचा धर्म बनणार आहे. ब्रेकिंग न्यूज सगळेच देतील. आपल्याला ब्रेकिंग न्यूजच्या नादात ‘ब्रोकन’ झालेली न्यूज पुन्हा जुळवावी लागेल.

0 comments:

वाचनीय

  © Blogger templates The Professional Template by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP