तंत्रज्ञानाच्या दृष्टीने सर्वांत प्रगत मानल्या जाणार्या अमेरिकेत वर्तमानपत्रांचा वाचकवर्ग आणि वृत्तवाहिन्यांचा प्रेक्षकवर्गही घटू लागला आहे. सीएनएन, फॉक्स, एमएसएनबीसी या आघाडीच्या वृत्तवाहिन्यांच्या प्राइम टाइम प्रेक्षकांची संख्या अकरा टक्क्यांनी घटली आहे. न्यूज मॅगझीन तर कालबाह्य होण्याच्या वाटेवर आहेत. मुद्रित न्यूजविक डिजिटल आवृत्ती काढू लागले. इकॉनॉमिस्टचा खप सोळा टक्क्यांनी उतरला आहे. आज ८२ टक्के अमेरिकन नागरिक बातम्या आपल्या डेस्कटॉप वा लॅपटॉपवर वाचतात, पाहतात. ५४ टक्के लोक ताज्या बातम्या मोबाईलवर पाहतात...
नव्या माध्यमांची दुनिया
परेश प्रभू,
संपादक, दैनिक नवप्रभा, गोवा
गेल्याच आठवड्यातील गोष्ट. विद्यार्थी परिषदेचे काही जुने - नवे कार्यकर्ते हैदराबादहून आलेल्या एका मित्राच्या निमित्ताने एकत्र आले होते. एका नव्या कार्यकर्त्याच्या मोबाईलमधील व्हॉटस् ऍपवर त्या दिवशीच्या सदस्यता नोंदणीचे अपडेट्स येत होते.
‘‘आजची यांची विद्यार्थी आंदोलनेही व्हॉटस् ऍपवरच होत असावीत...’’ कोणी तरी टिप्पणी केली आणि हशा पिकला!
या हशाला कारण होते. जुन्या कार्यकर्त्यांना ते जुने दिवस आठवले. तेव्हा मोबाईल नव्हते, त्यामुळे फेसबुक, व्हॉटस् ऍप नव्हते. सगळ्यांपाशी फोनही नसायचा. बैठकीची निमंत्रणे पोस्टकार्डावर यायची. आंदोलनांचे निरोप एखाद्यापर्यंत पोहोचवण्यासाठी कोण यातायात करावी लागे. आज सगळे कसे सोपे झाले आहे. व्हॉटस् ऍपवर दिलेला मेसेज क्षणार्धात मिळून जातो. सगळे एकमेकांच्या सतत संपर्कात असतात. क्षणाक्षणाची हालहवाल एकमेकांना कळवत असतात.
तंत्रज्ञानाची ही प्रगती अचंबित करणारी आहे खरी, पण तरीही कोठे तरी काही तरी हरवले आहे. माणसे समूहाशी तंत्रज्ञानाने भले जोडली गेली असली तरी एकाकीच आहेत. आत्महत्यांचे प्रमाण वाढते आहे. आपण एकमेकांशी जोडले गेलो आहोत या निव्वळ भ्रमात आपण वावरतो आहोत. फेसबुकवर आपले हजारो ‘फ्रेंडस्’ असतील, पण त्यातल्या कितीजणांना आपण ओळखत असतो? पण तंत्रज्ञान जगाला जवळ आणण्यात योगदान देत राहिले आहे. जगाच्या एका कोपर्यात काही घडले, तर क्षणार्धात त्याची माहिती दुसर्या टोकाला पोहोचवण्याची विलक्षण क्षमता आज तंत्रज्ञानाने उपलब्ध करून दिलेली आहे.
पुण्यातल्या एका पत्रकाराचा किस्सा सांगतात. ट्रंक कॉलच्या जमान्यातली गोष्ट आहे ही. हे गृहस्थ मुंबईच्या वर्तमानपत्राचे पुण्याचे वार्ताहर होते. महत्प्रयासाने ट्रंक कॉल बुक करून त्यावरून ते मुंबईला आपल्या वर्तमानपत्राला बातम्या देत असत. एसटीडीची सुविधा उपलब्ध होण्यापूर्वीचे ते ‘ट्रंक कॉल’. त्यामुळे त्यांना त्या बातम्या किती मोठ्या आवाजात सांगाव्या लागत असतील त्याची कल्पना येईल. पुण्यातले बरेच पत्रकार म्हणे हे ‘डिक्टेशन’ चालले असताना खाली थांबून आरामात त्या बातम्या लिहून काढायचे! आता फॅक्स, ईमेलही जुने झाले. आज अनेक वार्ताहर व्हॉटस् ऍपवरून बातम्या आणि फोटो पाठवतात. मजकूर, फोटो, व्हिडिओ असाल तेथून पाठविण्याची सोय त्यांच्या स्मार्टफोनने उपलब्ध करून दिली आहे. थ्रीजी इंटरनेटची ही किमया आहे. आता तर फोर जी इंटरनेट येऊ घातले आहे आणि रिलायन्सचे ‘जियो’ बाजारात उतरण्यास सज्ज आहे.
विस्तारती पत्रकारिता
तंत्रज्ञानासरशी पत्रकारिता बदलत चालली आहे. विस्तारत चालली आहे. पत्रकारितेची माध्यमेही बदलत चालली आहेत. संगणकांनी जगात क्रांती घडवली, पण आज डेस्कटॉप, लॅपटॉपही कालबाह्य होण्याच्या वाटेवर आहेत आणि टॅब्लेटस् आणि स्मार्टफोन त्यांच्याएवढेच शक्तिमान बनत चालले आहेत. स्मार्टफोन अधिक स्मार्ट होत आहेत आणि त्याहून महत्त्वाचे म्हणजे स्पर्धेमुळे स्वस्त होत आहेत आणि त्यामुळे अधिकाधिक मोबाईल ग्राहक स्मार्टफोनधारक बनू लागले आहेत. म्हणजेच वृत्तमाध्यमांची पोहोच त्यामुळे वाढत चालली आहे. येणारा काळ कदाचित वेअरेबल डिव्हायसेसचा असेल. अद्ययावत स्मार्टफोनशी जोडली गेलेली घड्याळसदृश्य ‘वेअरेबल’ म्हणजे अंगावर परिधान करता येणारी उपकरणे बाजारात आली आहेत आणि त्यांच्या वापराची सुलभता लक्षात घेता भविष्यात ती अधिक विकसित होतील, तेव्हा लोकप्रिय ठरल्यावाचून राहणार नाहीत. साहजिकच पत्रकारितेलाही या बदलत्या माध्यमांची नोंद घेत पुढे जावे लागणार आहे.इंटरनेटचा विस्तार होत गेला तशी बहुतेक सर्व माध्यमसमूहांनी स्वतःची संकेतस्थळे काढली. आता मोबाईल स्मार्टफोनची लोकप्रियता वाढत चालली आहे, त्यासरशी आपली ऍप्स काढणे त्यांना अपरिहार्य बनले आहे. आज आपल्याकडेही आघाडीच्या सर्व माध्यमसमूहांची ऍप्स ‘गुगल प्ले स्टोअर’पासून ‘ऍप स्टोअर’पर्यंत सर्वत्र मोफत डाऊनलोडसाठी उपलब्ध आहेत. घडणार्या बातमीचे अपडेटस् क्षणाक्षणाला आपल्या ग्राहकाला तो जिथे असेल तिथे, तो जे काम करीत असेल त्यात फारसा व्यत्यय न आणता ती देत असतात. आजच्या गतिमान काळात स्वतःला अपडेट ठेवणे ही अत्यावश्यक बाब बनली आहे. त्यामुळे आपल्या अवतीभवती जगात काय घडते आहे याची नोंद जो ठेवणार नाही तो स्पर्धेच्या या युगात दूर फेकला जाईल.
कन्व्हर्जन्सचा जमाना
एक काळ मुद्रित माध्यमांच्या वर्चस्वाचा होता. त्यानंतर रेडिओ, टीव्ही आले. मग इंटरनेट आले आणि बघता बघता माध्यमांमधल्या सरहद्दी पुसल्या गेल्या. कन्व्हर्जन्सचा जमाना आला आहे. म्हणजे मजकूर, चित्र, छायाचित्र, व्हिडिओ, ऑडिओ या सर्व माध्यमांतून बातमी अधिकाधिक नेमकेपणाने आणि अधिकाधिक वेगाने आपल्या ग्राहकापर्यंत पोहोचवण्याची सोय उपलब्ध झाली आहे. त्यामुळे आज जेव्हा आपण एखादे मोठे वर्तमानपत्र वाचतो, तेव्हा सविस्तर बातमी आमच्या संकेतस्थळावर वाचा किंवा व्हिडिओ पाहा असे सर्रास सांगितलेले दिसते. ही ‘इंटरॅक्टिव्हिटी’ माध्यमे आणि वाचक या दोहोंसाठी फायद्याची आहे. माध्यमांना आपल्या वाचकांचा तात्काळ प्रतिसाद तेथे मिळू शकतो आणि वाचकांना ताजी बातमी घडल्या क्षणी येथे कळू शकते. आज बहुविध माध्यमांची मालकी स्वतःकडे घेण्याची अहमहमिका लागली आहे, त्या क्रॉस मीडिया ओनरशीपमागे सर्व माध्यमांवर आपले वर्चस्व ठेवण्याचाच अट्टहास आहे. ‘ट्राय’ ने गेल्या मंगळवारीच त्यासंदर्भात चिंता व्यक्त केलेली आहे.बदलत्या आवडीनिवडी
वर्तमानपत्राला असलेल्या आणि वृत्तवाहिन्यांना असलेल्या डेडलाईनच्या मर्यादा इंटरनेट सहज ओलांडू शकते आणि संगणक, टॅब्लेट, मोबाईलच्या माध्यमातून आपल्या ग्राहकापर्यंत तात्काळ पोहोचू शकते. वृत्तवाहिन्यांची सद्दीही लवकरच ओसरेल अशी चिन्हे दिसू लागली आहेत, कारण आजच्या वेगवान आयुष्यामध्ये निवांतपणे टीव्ही पाहण्याएवढा कोणाला वेळ नाही आणि या वाहिन्या विश्वासार्हता गमावू लागल्या आहेत.त्यामुळे हाताशी असलेला मोबाईल हा अधिक भरवशाचा सखा बनला आहे आणि वेअरेबल डिव्हायसेस अधिक सक्षम होऊन येतील तेव्हा तर ती आपल्या दैनंदिन जीवनाचा भागच बनून जातील. हे संक्रमण काहींना अतिशयोक्त वाटत असेल, परंतु भविष्याचा विचार करता आणि बदलत्या आवडीनिवडी लक्षात घेता आपल्या जीवनशैलीतील असे आमूलाग्र बदल अपरिहार्य आहेत. आजवर आपल्याला काही खरेदी करायची असेल तर बाजारात जाऊन ती खरेदी केली जायची. आज फ्लिपकाटर्र्, अमेझॉन, मिंत्रा, जबॉंग आपल्याला हवी ती वस्तू स्वस्तात थेट आपल्या घरापर्यंत पोहोचवतात. या बदलत्या सवयी सहज अंगवळणी पडत चालल्या आहेत. फ्लिपकार्ट आणि अमेझॉन अब्जावधी डॉलरची नवी गुंतवणूक करीत आहेत ती त्यामुळेच.
वैयक्तिक रूचीनुसार मजकूर
येथे आणखी एक बाब सांगण्याजोगी आहे. जेव्हा फ्लिपकार्ट, अमेझॉन किंवा तत्सम संकेतस्थळावर आपण एखादे उत्पादन पाहतो, तेव्हा आपण काय सर्फिंग करतो आहोत, त्याची नोंद घेत पूरक उत्पादनांच्या जाहिरातींचा मारा आपल्यावर होत असतो. याला मार्केटिंगच्या परिभाषेत ‘बिहेविअरल रि-टार्गेटिंग’ असे नाव आहे. त्यासाठी आपल्या इंटरनेट सर्फिंगचे ट्रॅकिंग होत असते, जे आपल्या कधी लक्षातही येत नाही. अशा प्रकारच्या ट्रॅकिंग सॉफ्टवेअरच्या मदतीने आपल्या वाचकाला त्याच्या आवडीनिवडीनुसार कंटेन्ट पुरवणे डिजिटल माध्यमांना सहजशक्य आहे. त्यामुळे येणार्या काळामध्ये डिजिटल वृत्तमाध्यमे अधिकाधिक व्यक्तिगत (‘पर्सनलाइज्ड’) होत जातील.तंत्रज्ञानाच्या दृष्टीने सर्वांत प्रगत मानल्या जाणार्या अमेरिकेत वर्तमानपत्रांचा वाचकवर्ग आणि वृत्तवाहिन्यांचा प्रेक्षकवर्गही घटू लागला आहे. सीएनएन, फॉक्स, एमएसएनबीसी या आघाडीच्या वृत्तवाहिन्यांच्या प्राइम टाइम प्रेक्षकांची संख्या अकरा टक्क्यांनी घटली आहे. न्यूज मॅगझीन तर कालबाह्य होण्याच्या वाटेवर आहेत. मुद्रित न्यूजविक डिजिटल आवृत्ती काढू लागले. इकॉनॉमिस्टचा खप सोळा टक्क्यांनी उतरला आहे. आज ८२ टक्के अमेरिकन नागरिक बातम्या आपल्या डेस्कटॉप वा लॅपटॉपवर वाचतात, पाहतात. ५४ टक्के लोक ताज्या बातम्या मोबाईलवर पाहतात. आशिया खंड वगळता उर्वरित जगात वर्तमानपत्रांचे खप घसरत चालले आहेत आणि मुद्रित माध्यमांऐवजी डिजिटल माध्यमांना वाचक/प्रेक्षकांची अधिक पसंती दिसू लागली आहे. अमेरिकेतील सर्वाधिक खपाच्या पंधरा वर्तमानपत्रांच्या एकूण वर्गणीदारांपैकी फक्त ५४.९ टक्के वर्गणीदार हे मुद्रित आवृत्तीचे ग्राहक आहेत. उर्वरितांनी डिजिटल आवृत्तीला पसंती दिली आहे. केवळ डिजिटल माध्यमांतून बातम्या पुरवणार्या तीस वृत्तसंस्था अमेरिकेत आहेत आणि त्यातील अनेकांचे विदेशांतही वार्ताहर आहेत. व्हाईस मीडियाच्या विविध देशांत पस्तीस शाखा आहेत आणि बझफीड, क्वार्टझ् वगैरेंनी मुंबईपासून बर्लिनपर्यंत आपले बातमीदार नेमले आहेत. याउलट अमेरिकेतील वर्तमानपत्रांच्या इतर देशांतील वार्ताहरांची संख्या कमी होत चालली आहे कारण त्यांना आता ते परवडत नाही.
मोदींची प्रचारमोहीम
सोशल मीडियाचा बोलबाला किती आहे हे तर सांगण्याची आवश्यकता नाही. नरेंद्र मोदींच्या निवडणूक प्रचार मोहिमेचा भर सोशल मीडियावर कसा होता, त्याचा त्यांना कसा फायदा झाला आणि आता आपले सरकारच सोशल मीडियावर कसे आले आहे हे सगळ्यांना ठाऊक आहे. सोशल मीडियातील यशस्वी प्रचारापासून त्रिमिती तंत्रज्ञानातील जाहीर सभांपर्यंत अनेक नवे पायंडे गेल्या निवडणुकीने पाडले. नरेंद्र मोदी यांची तंत्रज्ञानाधारित प्रचारमोहीम हा खरे तर स्वतंत्र अभ्यासाचा विषय आहे. एखाद्या घटनेला विलक्षण वेगाने जगाच्या कानाकोपर्यात पोहोचवण्याची ताकद या सोशल मीडियापाशी आहे. भाषा, संस्कृती, जीवनपद्धती, आचारविचार यांच्या सार्या सीमा उल्लंघून ही माध्यमे ‘अवघे विश्वचि माझे घर’ ही कल्पना प्रत्यक्षात उतरवू लागली आहेत. कोण कुठला साय रॅपर चित्रविचित्र नाचायचा. त्याची ‘गंगनम स्टाईल’ सोशल मीडियानेच जगभरात घरोघरी पोहोचवली. यू ट्यूबवर त्या नाचाचा व्हिडिओ २ अब्जवेळा पाहिला गेला आहे. हा जागतिक प्रेक्षक त्याला कसा मिळाला? सोशल मीडियाची ही ताकद विलक्षण आहे.व्हॉटस् ऍपचे युग
या माध्यमांमध्ये जसजशी अधिकाधिक सुलभता येत जाईल, तशी त्यांची लोकप्रियता कैक पटींनी वाढत जाणार आहे. फेसबुकने व्हॉटस् ऍप १९ अब्ज डॉलर एवढी भरभक्कम रक्कम मोजून विकत का घेतले? कारण व्हॉटस् ऍप त्याच्या वापरातील आत्यंतिक सुलभतेमुळे फेसबुकला वरचढ ठरेल हे त्यांना कळून चुकले होते. ब्लॉग जसे बघता बघता कालबाह्य झाले, तसे फेसबुकही काही काळाने मागे पडेल आणि व्हॉटस् ऍपसारखी मोबाईल - आधारित सुलभ, सोपी माध्यमे त्याची नक्कीच जागा घेतील. मग संगणकावर जाऊन लॉग इन करण्याची आवश्यकता भासणार नाही. आज स्मार्टफोनवर एसएमएसचा वापरही कमी होत चालला आहे, त्याऐवजी व्हॉटस् ऍप, हाइक आणि तत्सम संदेशकांना प्राधान्य दिले जाते आहे, कारण एक तर त्यासाठी पैसे मोजावे लागत नाहीत आणि दुसरे म्हणजे त्यावर आपण फोटो, व्हिडिओ फाइल्सही सहजपणे पाठवू शकतो.मनुष्य हा सामाजिक प्राणी आहे असे मानले जाते. आपल्याला कळलेली माहिती दुसर्याला सांगितल्याविना, त्यावर भाष्य केल्याविना त्याला चैन पडत नाही. मानवाची ही सहजप्रवृत्ती आहे. त्यामुळे आपण चक्षुर्वैसत्यम् जे पाहिले, ते जगाला सांगणारी माध्यमे हाताशी असताना त्याला स्वस्थ कसे बसवेल?
0 comments:
Post a Comment